‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे भारताला इस्लामीकरणाकडे नेणारा ‘आर्थिक जिहाद’ ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

कणूर (तालुका वाई) मठाचे मठाधिपती पू. ब्रह्मानंद स्वामी यांना श्री दत्तजयंती विशेषांक भेट देतांना (डावीकडून) हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती स्मिता भोज, श्री. राजेंद्र सांभारे आणि श्री. हेमंत सोनवणे

सातारा, २२ डिसेंबर (वार्ता.) – ज्यांचे स्वप्न भारतावर राज्य करायचे आहे, ते सरकारकडून एक मागणी पूर्ण झाली की, शांत न बसता दुसरी मागणी करत आहेत. काही वर्षांपूर्वी भारतामध्ये इस्लामिक बँक चालू करण्याची मागणी चालू झाली होती. ती मोदी सरकारने फेटाळून लावली. बँक स्थापन करण्यासाठी सरकारी अनुमती लागते; मात्र कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. त्या आधारे मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. आतातर त्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ (सर्टिफिकेट) घेणे अनिवार्य बनले आहे. ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे भारताला इस्लामीकरणाकडे नेणारा ‘आर्थिक जिहाद’च म्हणावे लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केले. वाई तालुक्यातील कणूर येथील पू. ब्रह्मानंद स्वामी यांच्या मठात श्री दत्तजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी मठाचे मठाधिपती पू. ब्रह्मानंद स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र सांभारे, श्रीमती स्मिता भोज उपस्थित होते.

श्री. सोनवणे म्हणाले की, हलाल अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेएवढा समांतर टप्पा गाठला आहे. ‘हलाल’ने अनेक राष्ट्रांमध्ये घट्ट पाय रोवले आहेत. ५७ इस्लामी राष्ट्रे या व्यापार पद्धतीमध्ये सहभागी झाली आहेत. यावरून हलाल पद्धतीमागील षड्यंत्र लक्षात येते. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी हा ‘आर्थिक आतंकवाद’ मोडीत काढला पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक समितीचे श्री. राजेंद्र सांभारे यांनी, आभारप्रदर्शन श्रीमती स्मिता भोज यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ ११० हून अधिक भाविकांनी घेतला.

क्षणचित्रे

१. या वेळी पू. ब्रह्मानंद स्वामी यांनी उपस्थितांना ‘राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी प्रतिदिन १ घंटा द्या’ असे आवाहन केले.

२. हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना आयुरारोग्य आणि दिर्घायुष्य लाभण्यासाठी, तसेच सनातन संस्थेचे कार्य संपूर्ण विश्वात पसरण्यासाठी महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केली.

३. प्रत्येक मासातील पौर्णिमेला मठात सनातनच्या साधकांनी येऊन उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती महाराजांनी केली.

सनातनच्या साधकांच्या आचरणातून हिंदु धर्माची शिकवण अनुभवायला मिळते ! – पू. ब्रह्मानंद स्वामी

सनातन संस्थेचे आश्रम आहेत; म्हणून कुठेतरी हिंदु धर्म टिकून आहे. मी सनातनचा आश्रम जवळून पाहिला आहे. सनातनच्या साधकांच्या वाणीतून आणि आचरणातून हिंदु धर्माची शिकवण प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. सनातन समाजाला धर्मशिक्षण देते. त्यामुळे युवतींना हिंदु धर्मातील शास्त्रीय कृती का ? आणि कशा करायच्या ? याचे ज्ञान मिळते. मुसलमान मुली बुरखा घालूनच घराबाहेर पडतात; मात्र हिंदु युवतीला कुंकू तर सोडाच; परंतु टिकली लावायचीही लाज वाटते. ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे ‘समांतर अर्थव्यवस्था’ मोडून काढण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने पंतप्रधानांना निवेदन दिले पाहिजे.