आश्वासन देऊनही अभियांत्रिकीची बनावट पदविका घेतलेल्या कर्मचार्यांची चौकशी चालू केली नाही ! – आम आदमी पक्षाचा आरोप
पुणे – मान्यता नसलेल्या संस्थांमधून अभियांत्रिकीची बनावट पदविका मिळवून काही कर्मचार्यांनी महापालिकेत पदोन्नती मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आश्वासन देऊनही प्रशासनाने चौकशी चालू केली नाही, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. पुणे महापालिका सेवा नियम २०१४ अन्वये महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या २५ टक्के जागा ५ वर्षांचा अनुभव आणि विहित शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचार्यांकडून भरल्या जातात. (प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे हे द्योतक आहे. अशा भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. – संपादक) ‘महापालिकेमध्ये अनुमाने ४२ बनावट अभियंते (इंजिनियर) असून त्यांनी विकसित केलेल्या पायाभूत सुविधांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते’, असे मोरे यांनी सांगितले, तसेच पुरंदर तालुक्यात बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करण्याचा कारखाना आहे. महापौर कार्यालयातील एक कर्मचारीही बनावट पदाधिकार्यांच्या सूचीत आहे. असेही ते म्हणाले.