‘नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स’ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना गौरवणार !
ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि वीणाताई गावडे यांना जीवनगौरव पुरस्कार !
मुंबई – ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स’ (राष्ट्रीय पत्रकार संघ) यांच्याकडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. २४ डिसेंबर या दिवशी संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे. या वेळी हा गौरव सोहळा पार पडेल. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि वीणाताई गावडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. संघाच्या वतीने प्रथमच जीवनगौरव पुरस्कार दिला जात आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, तसेच मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित रहाणार आहेत. या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत हे भूषवणार असून स्वागताध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर असतील. या वेळी पत्रकारांसह विविध क्षेत्रांत सामाजिक बांधिलकीतून कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्सच्या अध्यक्षा सौ. शीतल करदेकर यांनी या सोहळ्याला सर्वांना उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.