कोरोनाची तिसरी लाट येणार ?
संपादकीय
मानवी प्रयत्नांच्या आवाक्याबाहेर असलेल्या महामारीच्या संकटातून तरण्यासाठी साधनाच आवश्यक !
गेले १ वर्षे १० मास कोरोनाशी झुंज देत असतांना जगभरातील देशांची कोरोना विषयत परिस्थिती निवळल्याने थोडा विसावा मिळतो न मिळतो, तोच ‘ओमिक्रॉन’चे (कोरोनाचा एक प्रकार) नवे संकट उभे राहिले आहे. जगभरात ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेले सहस्रो रुग्ण मिळत असून यातील २ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तज्ञांच्या मतानुसार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही. असे जरी असले, तरी रुग्णसंख्या वाढत आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. ‘नेदरलँड’ सरकारने ‘ओमिक्रॉन’च्या संकटामुळे ‘लॉकडाऊन’ (दळणवळण बंदी) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर जगभरातील अनेक नागरिकांनी लसीच्या २ मात्रा (डोस) घेतल्या. याचा प्रभाव काही दिवसच असल्याने ‘बूस्टर डोस’ (लसीचा तिसरा डोस) घेणेही आवश्यक असल्याचे कालांतराने पुढे आले. हा ‘बूस्टर डोस’ घेतलेल्या काही जणांनाही ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ‘ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझिनेका’च्या कोरोनाविरोधी लस (कोविशिल्ड) संदर्भात ‘लँसेट जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे, ‘लस घेतल्यानंतर तिचा परिणाम ३ मासांतच न्यून होऊ लागतो. या काळात रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत दुप्पट होते. दुसरा डोस घेतल्याच्या ४ मासांनी ही शक्यता तिप्पट होते.’ यावरून लस घेतलेले आणि न घेतलेले हे एकाच वर्गवारीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकंदरित स्थिती पहाता, संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना महामारीची मोठी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे, अशी शक्यता निर्माण झाली आहे. महामारीमुळे सर्वच यंत्रणा कशा प्रकारे कोलमडतात ? याचा कटू अनुभव जगभरातील जवळपास सर्वच देशांनी घेतला. ती महाभयंकर स्थिती ओढवू नये, यादृष्टीने प्रत्येक देश आपापल्या परीने प्रयत्नरत असला, तरी संकटाची तीव्रता अधिक आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. सध्याचा कालखंड, हा जगभरातील भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेला आपत्काळाचा कालखंड आहे. या आपत्काळाविषयी वर्तवली गेलेली भाकिते वर्तमान स्थितीत लागू होतांना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना काय किंवा आताचे ‘ओमिक्रॉन’चे संकट काय, त्यावर मात करणे, हे मानवी प्रयत्नांच्या आवाक्याबाहेर आहे, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मानवी प्रयत्नांना मर्यादा असून अशा संकटांतून तरण्यासाठी साधना करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे समजून घेतले पाहिजे. भारत हे आध्यात्मिक साधनेचे उगमस्थान आहे. त्यामुळे भारतात सरकारने नागरिकांना संकटातून तरण्यासाठी आणि सावरण्यासाठी साधना शिकवायला हवी. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या अनुभवातून शिकून सरकारी पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात, जेणेकरून संभाव्य तिसर्या लाटेची अल्प प्रमाणात झळ बसू शकेल. ‘कालाय तस्मै नम: ।’ (काळ हा शक्तीशाली असल्याने त्याला नमस्कार असो) ही जाणीव ठेवून भारत सरकारने काळानुसार आवश्यक असलेली साधना समाजाला शिकवायला हवी, तसेच योग्य त्या उपाययोजनांची तात्काळ कार्यवाही करून नव्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहायला हवे !