संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन !
ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे गैरप्रकार थांबवण्याविषयी अभियान
संभाजीनगर, २२ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखणे, तसेच यानिमित्ताने फटाके फोडण्यावर बंदी आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. एम्.के. देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शशिकांत हदगल यांनी निवेदन स्वीकारले.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, अमलीपदार्थांचे सेवन, मद्यपान करून स्त्रियांची-मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात घडतांना दिसतात. हे बंद व्हावेत, तसेच राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान आणि मेजवान्या करण्यास प्रतिबंध आणावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला आपले नववर्ष साजरे केले जाते, याचे प्रबोधन आजच्या तरुण पिढीला करणे आवश्यक आहे.