राष्ट्र आणि धर्म संकटांत असतांना प्रदूषणासह रज-तम पसरवणारे फटाके कोणत्याही प्रसंगी वाजवू नयेत ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना फटाके न वाजवण्याची नम्र विनंती !
‘भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात समाजाभिमुख असलेले हिंदु धर्मीय आणि इतर पंथीय त्यांचे सण अन् उत्सव साजरे करतांना, एवढेच काय, तर क्रिकेटचे सामने जिंकल्यावर, सर्वाेच्च न्यायालयाचा एखादा ऐतिहासिक निकाल लागल्यावर, तसेच विवाहप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करतांना दिसतात; पण काही ‘पुरो(अधो)गामी’ केवळ हिंदु सणांच्या वेळीच ‘फटाके वाजवू नका. त्यामुळे प्रदूषण होते’, अशी हिंदु धर्मविरोधी सोयीची भूमिका घेत जणू ‘आम्हालाच (पुरोगाम्यांनाच) समाजहिताचा पुळका आहे’, असे भासवतात. सर्व समाज वर्षभर विविध प्रसंगी सर्रास फटाके वाजवत असतांना केवळ ‘हिंदु धर्मातील सणांच्या वेळी फटाक्यांमुळे प्रदूषण होते’, असे वक्तव्य करणे, हा दुटप्पीपणा नव्हे का?’
फटाक्यांमधील आरोग्यविघातक आणि ज्वालाग्रही रसायनांमुळे ध्वनी अन् वायू प्रदूषण होते. इतकेच नव्हे, तर काही वेळा फटाक्यांमुळे आग लागून होणार्या अपघातांमुळे अपरिमित जीवित आणि वित्त हानीही होते. सर्वप्रकारच्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते. त्यासह फटाके वाजवल्याने वातावरणातील रज-तमही वाढते. त्यामुळे अध्यात्मशास्त्रानुसारही फटाके वाजवणे अयोग्य आहे. हे लक्षात घेऊन ‘फटाके न वाजवणे’ हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समिती गेली १८ वर्षांहून अधिक काळ समाजहितासाठी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबवत आहे. या समाजाभिमुख मोहिमेला समाजातून प्रतिसादही चांगला मिळत आहे. सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना फटाके वाजवायलाच नको. चिनी बनावटीचे फटाके वाजवणे, हा तर देशद्रोहच होईल. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समिती केवळ हिंदूंचे सणच नाही, तर ख्रिसमस, ख्रिस्ती नववर्ष (१ जानेवारी), विवाह, क्रिकेटचे सामने जिंकणे, आदी सर्वच प्रसंगी फटाके वाजवण्यास विरोध करते आणि करत राहील.’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (२१.१२.२०२१)