विधानसभेत विधानसभा अध्यक्ष निवडीवरून खडाजंगी; नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग !
विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने होणार !
मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. याला विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. अध्यक्ष निवडीचे नवीन नियम सिद्ध करण्याच्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमचा वैधानिक अधिकार डावलल्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत’, असे सांगितले. त्यानंतर भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्ताधारी गटाकडे बहुमताचा आकडा मोठा असतांनाही ते वेगळ्या पद्धतीने अध्यक्षांची निवड का करत आहेत ? निवड करण्याच्या नियमात पालट करण्याची सत्ताधार्यांकडून घाई का केली जाते ? सत्ताधारी आमदारांवर एवढा अविश्वास का ? केवळ १ दिवसाचा कालावधी का देण्यात आला ? कालावधी अल्प करण्याचा नियम आपल्याला पालटता येणार नाही. जर रेटून नेणार असाल, तर आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. अध्यक्ष निवडीचे नियम पालटायचे असतील, तर नियमाने करा. विचार करण्यासाठी १० दिवसांची मुदत द्या. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवडणुकीला व्हीप लागू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सरकार १० दिवसांचा कालावधी १ दिवसावर का आणत आहे ? सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे.’’
यावर आमदार नाना पटोले म्हणाले, ‘‘घोडेबाजार’ बंद व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. विधानसभेत प्रथमच नियम पालटले जात नाहीत. यापूर्वीही वेळोवेळी चुकीचे नियम पालटले आहेत. हा नियम पालटण्यास आमचा पाठिंबा आहे.’’
पटोले यांनी ‘घोडेबाजार’ हा शब्द वापरल्यामुळे विरोधी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. यावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ‘बेईमानी’ आहे. नाना पटोले यांनी ‘बेईमानी’ शब्दाला आक्षेप घेतला.
अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, ‘क्रॉस वोटिंग’ होऊ नये म्हणून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवड नियम पालटण्याचा निर्णय घेतला होता. किमान त्यांच्या निर्णयाचा तरी आदर करा. सर्वांनी हरकत न घेता एकमताने हा विषय संमत करा.