आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्याच्या प्रकरणी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मान्यता !

कुंपणच शेत खात असून घोटाळ्यात प्रशासकीय यंत्रणा अडकली आहे ! – संपादक

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत प्रश्‍नपत्रिका फुटल्याचा, तसेच या प्रकरणी परीक्षा घेणार्‍या आस्थापनाच्या अधिकार्‍यांचाच सहभाग असल्याच्या प्रश्‍नावरून २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. हा घोटाळा मंत्र्यांच्या पाठिंब्याने होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर टीका केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘आरोग्य विभागाच्या ‘ड’ श्रेणीच्या भरतीप्रक्रियेत ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या नैतिकतेला धरून नाहीत. यामध्ये पालट करणे आवश्यक आहे. ही परिस्थिती कलियुग असल्याचे द्योतक आहे. कुंपणच शेत खात आहे’, असे नमूद करत आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात प्रशासकीय यंत्रणा अडकली असल्याचे मान्य केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. यावर उत्तर देतांना टोपे यांनी वरील वक्तव्य केले.

१. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांचे अन्वेषण आणि विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप यांविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोचले असल्याविषयी विरोधी पक्षाने चौकशीची मागणी केली.

२. परीक्षेविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झालेल्या ऑडिओमध्ये मंत्र्यांची नावे आहेत, याविषयी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावर टोपे यांनी ‘या ऑडिओची सत्यता सायबर यंत्रणेकडून पडताळण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले.

३. परीक्षा घेण्यासाठी आस्थापनाची निवड करतांना न्यूनतम १० लाख परीक्षार्थींची परीक्षा घेण्याची अट आहे; मात्र शासनाने ही अट ५ लाख परीक्षार्थींपर्यंत शिथिल केली. ‘न्यासा’ या आस्थापनाला ठेका देण्यासाठी ही अट शिथिल केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी निवड प्रक्रियेमध्ये स्पर्धा असावी, यासाठी निविदा शिथिल करण्यात आल्याचे म्हटले. ‘आवश्यकता वाटल्यास या प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांद्वारे चौकशी केली जाईल’, असे आश्‍वासन टोपे यांनी दिले.

ही परीक्षा घेण्यासाठी काढलेली निविदा १८ आस्थापनांनी भरल्या होत्या. त्यामध्ये १० आस्थापने अपात्र ठरली. २ आस्थापने काळ्या सूचीत होती. उर्वरित ६ आस्थापनांमधून ‘न्यासा’ या आस्थापनाची निवड करण्यात आली आहे. सध्याचा प्रकार पहाता भविष्यात शासकीय भरती प्रक्रियेची परीक्षा घेतांना ऑनलाईन पद्धतीने किंवा राज्य परीक्षा आयोग यांच्याद्वारे परीक्षा घेण्याविषयी सरकार सकारात्मक आहे, असे या वेळी राजेश टोपे यांनी म्हटले.