सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्या कै. (श्रीमती) निर्मला अविनाश भावसार (वय ७३ वर्षे) !
सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या चंदननगर (जिल्हा पुणे) येथील कै. (श्रीमती) निर्मला अविनाश भावसार (वय ७३ वर्षे) !
चंदननगर, पुणे येथील श्रीमती निर्मला भावसार यांचे भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी (२९.९.२०२१) या दिवशी रात्री १२.१५ वाजता निधन झाले. त्यांची धाकटी सून सौ. शिल्पा आशुतोष भावसार आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सौ. शिल्पा आशुतोष भावसार (धाकटी सून), मुंबई
१. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ : ‘माझ्या सासूबाई श्रीमती निर्मला भावसार साधारणतः तीस वर्षांपूर्वी सनातनच्या संपर्कात आल्या. तेव्हापासून त्यांनी सर्वांना कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व पटवून द्यायला आरंभ केला. संभाजीनगरमध्ये असतांना त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाची सेवा व्यवस्थितरित्या सांभाळली. तिथेही त्या सर्व साधकांना प्रिय होत्या. वर्ष २००८ पासून पुण्याला आल्यावर त्यांनी ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्य पुष्कळ तळमळीने केले.
२. हसतमुख, सुसंस्कृत आणि मितभाषी : सासूबाई पहिल्यापासूनच हसतमुख, सुसंस्कृत आणि मितभाषी होत्या. माझ्याकडून चुका झाल्या, तरी त्या मला प्रेमाने समजावून सांगायच्या.
३. प्रेमभाव : त्या संपूर्ण जीवन परेच्छेने वागल्या. २६ वर्षे सततच्या सहवासाने आमच्यात मायलेकीचा भावबंध निर्माण झाला होता. त्यांनी कधीही माझा सासुरवास केला नाही.
४. प्रारब्धभोग म्हणून आजारपण हसतमुखाने स्वीकारणे आणि अखंड नामस्मरण करणे : जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या फुप्फुसामध्ये बिघाड झाला. जून २०२१ मध्ये त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. सासूबाईंनी हसतमुखाने प्रारब्धभोग म्हणून आजारपण स्वीकारले. त्यांच्या मुखी नेहमी नामस्मरण असे. रात्री झोपतांनाही त्यांच्या भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा तारक नामजप चालू असे.
५. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. सासूबाईंच्या निधनानंतर दुसर्या दिवशी सकाळी ९.३० च्या सुमारास अंत्यदर्शनासाठी सनातनच्या काही साधिका घरी आल्या. सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला.
आ. निधन होऊन ९ – १० घंट्यांनंतरही त्यांचे शरीर कडक झाले नव्हते. त्यांच्या तोंडवळ्यावर प्रसन्नता आणि तेज अन् शरिरात चैतन्य जाणवत होते. तेव्हा ‘त्या झोपल्या आहेत आणि आता उठतील’, असे वाटत होते.
इ. अंत्यसंस्काराच्या वेळी कुठेही दाब जाणवत नव्हता.
ई. निधनानंतर पाचव्या दिवशी नाशिक येथे अस्थी विसर्जनाच्या वेळी पूजा करतांना गोदावरी नदीला पाणी नव्हते; परंतु पूजा चालू झाल्यावर नदीचे पाणी वाढायला लागले. पाणी नंतर इतके वाढले की, अस्थी ठेवलेल्या ताटाला पाण्याने स्पर्श केला. त्या वेळी विधी करणारे गुरुजीही म्हणाले, ‘‘महान आत्मा होता.’’
सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१. सेवेची तीव्र तळमळ : ‘भावसारकाकूंचे वय ७३ वर्षे असूनही दळणवळण बंदीच्या कालावधीत काकूंनी संगणकीय पद्धतीने साधनेचा आढावा देणे, सत्संगांच्या वेळी संगणकीय प्रणालींना जोडणे हे सर्व शिकून घेतले होते. समष्टीचे कुठलेही सूत्र असू देत, उदा. ‘ऑनलाईन’ ‘हिंदु-राष्ट्र जागृती’ सभा, गुरुपौर्णिमा, ज्ञानशक्ती अभियान, अर्पणसेवा त्यात त्या सहभागी होत असत. पुष्कळ वेळा त्यांना ‘‘तुमच्या वयानुसार जमेल तेवढे करून तुम्ही विश्रांती घ्या’’, असे सांगितल्यावरही त्या ‘माझ्याकडून सेवा व्हायला पाहिजे. जी सेवा आली आहे, तो गुरुसंदेशच आहे’, या भावाने सेवा करायच्या. ‘मी साधनेत आणखी काय प्रयत्न करू ?’, अशी त्यांची तळमळ होती.
२. मृत्यूकडे स्थिर राहून साक्षीभावाने पहाणे : काही कालावधीपासून काकू रुग्णाईत होत्या. त्यांना दिलेले नामजपादी उपाय त्या भावपूर्ण करत असत. २७.९.२०२१ या दिवशी काकूंच्या निधनाच्या २ दिवस आधी काकूंशी माझे भ्रमणभाषवर बोलणे झाले होते. तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘दत्तगुरु मला न्यायला आले आहेत. मी दत्तगुरूंचे स्मरण करत आहे. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) दत्तगुरूंच्या समवेत आहेत.’’
३. ‘काकूंचे निधन झाले’, हे मला दुसर्या दिवशी समजल्यावर ‘काकू दत्तगुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या अनुसंधानात होत्या. साधना आणि सेवा यांच्या तीव्र तळमळीमुळे त्यांच्या लिंगदेहाचा पुढचा प्रवास उच्च लोकांकडे होत आहे’, असे मला दिसले.’
सौ. जानकी युवराज पवळे, चंदननगर
१. सेवेची तळमळ : ‘काकूंना सेवेची पुष्कळ तळमळ होती. एकदा त्यांनी दत्तजयंतीच्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनकक्षावर आलेल्या एका ख्रिस्ती जिज्ञासूला साधना समजावून सांगून त्यांना इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार के ले होते.
२. मृत्यूसमयीही गुरुस्मरणात राहून स्थिर असणे : काकूंचे निधन होण्याच्या २ दिवस आधी त्यांना माझी पुष्कळ आठवण येत होती; म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी त्या अत्यवस्थ असूनही ‘‘गुरुदेव आहेत माझ्या समवेत आहेत. ते मला दर्शन देत आहेत’’, असे मला सांगत होत्या. ‘त्यांचा आवाज ऐकल्यावर त्या पुष्कळ स्थिर आहेत’, असे मला जाणवले.
३. काकूंच्या निधनानंतर मी आणि माझी आई (सौ. कमल कुटे) त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा जाणवलेली सूत्रे
अ. काकूंच्या तोंडवळ्यावर हास्य होते.
आ. काकूंची त्वचा पुष्कळ कोमल होती.
इ. तेथील वातावरण शांत होते. काहीच त्रास जाणवला नाही.
श्री. रामदास बाबुराव मेमाणे, चंदननगर
१. ‘भावसारकाकूंचा मला गेली १५ – १६ वर्षे सहवास लाभला. मी त्यांच्यासह जिज्ञासूंना संपर्क करण्यास जात असे. ‘शांत स्वभाव’ आणि ‘मुद्देसूद बोलणे’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
२. त्या माझ्या आध्यात्मिक आई होत्या. घरी काही प्रसंग झाला, तर त्या मला मार्गदर्शन करायच्या. त्यांच्यामुळेच माझ्यात चांगले पालट होत गेले.
३. ‘सहसाधकांची साधना व्हावी’, अशी त्यांना तळमळ होती.
श्री. युवराज पवळे, चंदननगर
१. ‘पुणे येथील वडगाव शेरी या भागात वर्ष २००९ – २०१० मध्ये झालेल्या ‘हिंदु जनजागृती सभे’च्या माध्यमातून मी हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आलो. माझे साधनेचे प्रयत्न वाढण्यासाठी भावसार काकू घरी येऊन नामजपादी उपाय सांगत असत. त्या करत असलेल्या साहाय्यामुळे साधनेतील अडथळे न्यून होत असत.
२. काकूंच्या घरी गेल्यानंतर त्या नेहमी खाऊ दिल्याविना पाठवत नसत.
श्रीमती शालन निंबाळकर, चंदननगर
काकूंचे घर म्हणजे आश्रमच वाटणे : ‘वर्ष २०२० पासून चालू झालेल्या दळणवळण बंदीपूर्वी त्यांच्या घरीच सत्संग, प्रसारातील सेवेचे नियोजन करणे यांसाठी साधक एकत्र यायचे. ‘त्यांचे घर म्हणजे आश्रमच आहे’, असे मला वाटायचे.’
‘काकूंची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आणि भाव होता. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काकूंकडून तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करायची ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – चंदननगर येथील सर्व साधक
सौ. राजश्री खोल्लम, पुणे
श्रीमती निर्मला भावसारकाकू यांच्या संदर्भात आलेली अनुभूती : ‘साधारण ८ – ९ वर्षांपूर्वी सेवेच्या निमित्ताने माझा काकूंशी परिचय झाला. दळणवळण बंदीच्या काळात चंदननगर येथील साधकांच्या ‘ऑनलाईन’ व्यष्टी आढावा सत्संगाला मी काही मास उपस्थित होते. त्यामुळे काकूंचे साधनेचे प्रयत्न लक्षात यायचे आणि काही वेळा त्यांच्याशी अनौपचारिक बोलण्याचा भागही होत असे. ३०.९.२०२१ या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे मला कळले. त्याच रात्री अकस्मात् मला त्यांची आठवण आली. तेव्हा मी घरात जिथे उभी होते, तिथे काकू सूक्ष्मातून माझ्यासमोर अगदी जवळ आल्याचे मला दिसले. त्यांनी पांढरी रेशमी साडी परिधान केली होती. त्यांचा नेहमी दोन्ही खांद्यांवरून पदर असायचा. तशाच त्या मला दिसत होत्या. त्यांच्या मुखावर हास्य आणि आनंद होता. मी त्यांना म्हणाले, ‘‘काकू, तुम्ही इथे कशा काय ? तुम्ही गुरुचरणांशी आहात ना ?’’ त्यावर त्या आनंदाने ‘‘हो’’, असे म्हणाल्या. त्यांनी पटकन माझे हात हातात घेतल्याचे मला क्षणभर जाणवले. त्या वेळी ‘जणू त्या मला भेटायला आल्या होत्या’, असे मला जाणवले.
काकू रुग्णाईत असल्याने आणि त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याने मी त्यांना भ्रमणभाष केला नव्हता. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काकूंना भेटण्याची माझी इच्छा या अनुभूतीच्या माध्यमातून पूर्ण केली’, असे मला वाटले. त्यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’
(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १.१०.२०२१)