पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करायला प्रारंभ केला पाहिजे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मंगेशी येथे पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर

फोंडा, २१ डिसेंबर (वार्ता.) – गोवामुक्तीच्या ६१ व्या वर्षी पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करायला आता प्रारंभ केला पाहिजे. यासाठी मी तुमच्याकडे दुसरे काही मागत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आम्हाला राज्यात हिंदु संस्कृती आणि मंदिर संस्कृती पुनर्स्थापित करण्यासाठी शक्ती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मंगेशी येथे पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात मंदिराजवळ ५८ दुकाने, शौचालय आणि वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मंगेशी येथे पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,

‘‘काही राजकारणी स्वार्थासाठी माणसाची तुलना श्री शांतादुर्गामातेशी करत आहेत. नागरिकांनी या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. मानवाची तुलना देवतांशी करता येणार नाही. गोवा शासन दुसर्‍या टप्प्यात मंगेशी येथे २२ कोटी रुपये खर्च करून पर्यटन विकासासाठी आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहे.’’

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘प्रियोळ मतदारसंघात सर्वाधिक मंदिरे असल्याने या ठिकाणी ‘मंदिर शहर प्रकल्प’ उभारण्याची योजना शासनाने आखली आहे. नवीन राजकीय पक्षांकडून मासिक ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्याची योजना राबवली जाणार असल्याची खोटी आश्‍वासने दिली जात आहेत आणि याला नागरिकांनी बळी पडू नये.’’