महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी कर्नाटक सरकारचे प्रयत्न !
बेळगाव, २१ डिसेंबर – सीमाभागात मराठी भाषिकांच्या अधिकारासाठी लढणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान आणि त्यासंदर्भात झालेल्या घडामोडींवर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ‘‘सातत्याने कन्नड लोकांचा अवमान करणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी’’, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘‘बेंगळुरू, बेळगाव, खानापूर येथील सर्व घटनांचे सखोल अन्वेषण केले जाईल. बेळगाव विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे उभारले जातील, असे उत्तर दिले.