शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे निलंबित !

डावीकडून वर्षा गायकवाड आणि तुकाराम सुपे

पुणे – आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) झालेल्या अपव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे यास अनुमती असणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. (केवळ निलंबन नको, तर बडतर्फ करा !)

प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक आणि माध्यमिक) पुणे, संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील, तर पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य सचिव असतील.