ई-आस्थापनाकडून केली जाणारी स्फोटकांची खरेदी आणि देशाची सुरक्षा !

१. आतंकवादी आक्रमणासाठी आतंकवाद्यांनी ‘ॲमेझॉन’ या ई-आस्थापनाकडून स्फोटके खरेदी करणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !

१ अ. ॲमेझॉनच्या साहाय्याने स्फोटक पदार्थांची विक्री होत असल्यास दोषींना शिक्षा होणे आवश्यक ! : ‘मध्यंतरी एक धक्कादायक वृत्त समोर आले होते. पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये ४० सैनिकांना जीव गमवावा लागला होता, त्या आक्रमणासाठी लागणारी स्फोटके आतंकवाद्यांनी ‘ॲमेझॉन’ या ई-आस्थापनाकडून खरेदी केली होती, असा आरोप त्या वृत्तात केला होता. यासमवेतच ‘भारतात अफू, गांजा अन् चरस या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तेही ॲमेझॉनच्या साहाय्याने पाठवण्यात आले आहेत’, असा दुसरा आरोप करण्यात आला आहे. या गोष्टींचे अन्वेषण होऊन दोषींना कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे.

१ आ. स्फोटक आणि त्यासंबंधित वस्तू आतंकवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी वापरली जाणारी मोठी साखळी ! : स्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके, बॅटरी, ट्रिगर या वस्तू देशाबाहेरून, म्हणजे पाकिस्तान, चीन किंवा अन्य शत्रूराष्टे येथून भारतीय सीमेवर येतात. तेथून त्या भू, आकाश किंवा समुद्री यांपैकी कोणत्याही सीमेवरून आत आणल्या जातात. त्या वस्तू देशात आणल्यावर ठरलेल्या ठिकाणी पोचवण्यासाठी एक साखळी निर्माण करण्यात आली आहे, उदा. एखादी वस्तू काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरून भारताच्या आत कुरिअरच्या माध्यमातून श्रीनगरपर्यंत पोचते. दुसरा कुरिअरवाला ते पुलवामापर्यंत पोचवतो आणि तेथून शेवटी ते घातपात करणार्‍या आतंकवाद्यांपर्यंत पाठवले जाते. या साखळीमध्ये त्यांच्या विविध समर्थकांचा वापर केला जातो. या वस्तू एकाच व्यक्तीच्या माध्यमातून पाठवल्या, तर सुरक्षा संस्थांकडून त्या व्यक्तीला पकडण्याचा धोका असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून या वस्तू आणल्या जातात.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

आता ॲमेझॉनसारख्या ‘ई-कॉमर्स’ आस्थापनाने चांगली सोय केलेली आहे. ॲमेझॉनच्या माध्यमातून पार्सल पाठवले; पण त्यांच्या माणसांना कुणीही पडताळत नाही. त्यामुळे कोणत्याही अडचणीविना आतंकवाद्यांचे समर्थक त्यांना हवी असलेली स्फोटके, बॅटरी, रिमोट, ट्र्रिगर यांसारखे साहित्य ॲमेझॉनच्या माध्यमातून कुठेही पाठवू शकतात. त्याचप्रमाणे अफू, गांजा आणि चरस हे अमली पदार्थही ॲमेझॉनच्या माध्यमातून पाठवता येऊ शकतात.

समजा, भू सीमेवरून मणिपूरच्या सीमेमध्ये अमली पदार्थ आले, तर कुरिअरवाला ते मणिपूरची राजधानी इंफाळपर्यंत पोचवतो, तर दुसरे कुरिअर तेथून गुवाहाटीपर्यंत आणि तिसरे कोलकातापर्यंत पोचवतो. चौथा कुरिअरवाला ते देहली किंवा अन्य महानगरांमध्ये पोचवतो. ही मोठी साखळी असते. पहिल्या कुरिअरवाल्याला कल्पना नसते की, तो नेमके काय घेऊन जात आहे. प्रत्येक जण स्वतःकडील साहित्य एकमेकांना हस्तांतरित करत जातो. या प्रक्रियेमध्ये वेळ, पैसा आणि प्रचंड नियोजन यांची आवश्यकता असते; परंतु आता ॲमेझॉनमुळे एकच कुरिअर इंफाळपासून भारतात हवे तेथे कुठेही पोचवता येते. त्यामुळे अल्प व्ययात काम होते.

२. ‘ई-कॉमर्स’ आस्थापनांविषयीचे नियम आणि कायदे निश्चित करणे आवश्यक !

दुर्दैवाने ‘ई-कॉमर्स’ आस्थापनांविषयीचे काही कायदे आणि नियम अस्पष्ट आहेत. त्या काय घेऊन जाऊ शकतात ? आणि काय घेऊन जाऊ शकत नाहीत ? ही स्फोटके कुणी आणि कशी पाठवली ? यांविषयी अन्वेषण संस्था निश्चितपणे अन्वेषण करत असतील. या साखळीमध्ये सहभागी असणार्‍यांना शिक्षा देणे आवश्यक आहे. आतंकवादी आणि त्यांचे समर्थक हे आतंकवादी आक्रमणे करण्यासाठी, तर अमली पदार्थांचे तस्कर देशात त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विविध कल्पक पद्धतींचा वापर करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतात. सुरक्षा संस्थांनी त्यांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ते ज्या नवनवीन पद्धती वापरतात, त्यांचा अभ्यास करून उपाय शोधले पाहिजेत आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे. तेव्हाच स्फोटके आणि अमली पदार्थ यांच्या तस्करीवर अन् आतंकवादावर प्रतिबंध घालता येईल. आज सर्वांनी कान आणि डोळे उघडे ठेवून देशाला सुरक्षित करणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.