सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर गुडघ्यांचे शस्त्रकर्म टळल्याची साधिकेला आलेली अनुभूती
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
१. गुडघेदुखीचा त्रास चालू झाल्यावर आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सुचवणे आणि औषधांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर गुडघेदुखी न्यून होणे
‘२ मासांपूर्वी मला गुडघेदुखीचा त्रास चालू झाला. माझ्या गुडघ्यांतील गादी फाटली (Knee Meniscus tear) असल्याचे निदान झाले. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली. अस्थिरोग तज्ञांनी (‘Orthopedic Surgen’नी) क्ष-किरण तपासणी आणि ‘एम्.आर्.आय्.’ यांचे अहवाल पाहून एक मासानंतर शस्त्रकर्म करण्याचे सुचवले. तेव्हा मी औषधे घेतली आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘शून्य’ हा नामजप नियमितपणे १ घंटा केला. त्यामुळे माझी गुडघेदुखी न्यून झाली आणि मी घरातील सर्व कामे, उदा. केर काढणे, लादी पुसणे, स्वयंपाक करणे इत्यादी करू लागले, तसेच मी आश्रमातील नेहमीची सेवाही करू लागले. तेव्हा ‘देवाने मला फुलासारखे जपले’, असे वाटते.
२. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर भाव जागृत होणे
एक मासाने मी अस्थिरोग तज्ञांची भेट घेतली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘गुडघ्यांत चांगली सुधारणा (recovery) झाली आहे. शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता वाटत नाही.’’ तेव्हा माझा भाव जागृत झाला. केवळ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळेच हे सर्व होऊ शकले.
३. ‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे’, याची प्रचीती येणे
‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे !’, याची मला अनुभूती आली. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला गुडघेदुखीवर संतांकडून नामजपादी उपाय मिळाले आणि नामजपाचे श्रेष्ठत्व शिकण्याची संधी मिळाली. ‘आपत्काळात वैद्यकीय साहाय्य मिळाले नाही, तरी नामजपानेही बरे वाटू शकते’, याची मला प्रचीती आली’, याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्राची रोहन मेहता, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२१)
हिंदु राष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांतून विविध आजारांसाठीची आध्यात्मिक उपचारपद्धत शिकवली जाईल !‘कोणत्याही आजारासाठी आध्यात्मिक स्तरांवरील उपाय, म्हणजे प्राणशक्तीवहन पद्धतीने त्या रुग्णासाठी शोधून काढलेली मुद्रा, न्यास आणि नामजप होय. ही आध्यात्मिक स्तरावरील उपचारपद्धत बिनऔषधांची आणि बिनखर्चिक आहे. या संदर्भात अनेकांना सकारात्मक अनुभव आले आहेत; परंतु सरकार अशा पद्धतींच्या संदर्भात कधीच जिज्ञासा दाखवत नाही. त्यामुळे त्या कुणाला शिकवल्याही जात नाहीत. हिंदु राष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे शिकवले जाईल. हे उपाय आध्यात्मिक स्तरावरील असल्यामुळे ते कळण्यासाठी सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. यासाठी येथे केवळ साधना करणारे आणि सूक्ष्मातील जाणणारे साधक अन् साधक-विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जाईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१२.२०२१) |
|