समर्थ रामदास स्वामी यांचे भित्तीशिल्प न हटवल्यास ते तोडणार ! – संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांची पत्रकार परिषदेत धमकी
सातार्यात राजवाडा बसस्थानक परिसरात हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या भित्तीशिल्पाचे लोकार्पण
|
सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – हिंदुत्वनिष्ठांकडून २० डिसेंबर या दिवशी येथील राजवाडा बसस्थानक परिसरात निर्माण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या भित्तीशिल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला; मात्र काही राष्ट्र्रद्रोही लोकांनी यापूर्वीच भित्तीशिल्पाला आक्षेप घेतल्यामुळे पोलिसांनी तात्काळ हे शिल्प पुन्हा झाकून ठेवत नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्यासह १२ हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतले. (महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी यांच्या भित्तीशिल्पाचे लोकार्पण करणार्यांवर कारवाई करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक) या संदर्भात नेहमीप्रमाणे हिंदुविरोधी भूमिका घेत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी २१ डिसेंबर या दिवशी शिल्पाला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे सांगत भित्तीशिल्प न हटवल्यास ते तोडण्याची धमकी दिली.
या संदर्भात झालेला घटनाक्रम असा
१. २० डिसेंबर या दिवशी शहरातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते राजवाडा बसस्थानक परिसरामध्ये एकत्र झाले. त्यांनी शिव-समर्थांच्या भित्तीशिल्पावर झाकण्यात आलेला प्लास्टिकचा कागद काढला. या वेळी पू. शहाजीबुवा रामदासी, समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि भाजपचे नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्या वतीने जलाभिषेक, नंतर दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’, ‘भारतमाता की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हे वृत्त शाहूपुरी पोलिसांना कळताच पोलिसांनी राजवाडा येथे धाव घेतली आणि भित्तीशिल्प झाकून घेत हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतले. याविषयी रात्री विलंबापर्यंत कारवाई चालू होती.
२. या संदर्भात आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी आणि विद्रोही चळवळीच्या कार्यकर्त्यांनी २१ डिसेंबर या दिवशी सातारा शहरात पत्रकार परिषद घेतली. ‘‘सातार्यात असे शिल्प उभारणे हा संघाचा डाव आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभाग, नगरपालिका, एस्.टी. महामंडळ यांनी गेल्या वर्षीच हे शिल्प उभारण्यास विरोध केला होता; मात्र असे असतांना प्रशासनाने गेल्या १ वर्षांत कोणतीच भूमिका घेतली नाही. उलट हे उद्घाटन होऊ दिले. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आम्हाला संशय आहे. ‘रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते’, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. याला आम्ही कायमच विरोध करत आलो आहोत.’’, असे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.