व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर !
व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या भिलाई नगर (छत्तीसगड) येथील कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !
‘१४.११.२०२१ पासून आमची आई श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) रुग्णाईत होती. तिला २ वेळा रुग्णालयात भरती करावे लागले. ९.१२.२०२१ या दिवशी आईला देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी तिच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
(आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) ((कै.) श्रीमती प्रभा कानस्कर यांचा मोठा मुलगा), भिलाई नगर, जिल्हा दुर्ग (छत्तीसगड)
‘आईचे लहानपणापासून बरेचसे आयुष्य कष्टात गेले होते. आम्ही लहान असतांनाच आमचे वडील गेले. तेव्हाही तिने तिला वडिलांच्या जागेवर लागलेली नोकरी करून २ मुलगे आणि १ मुलगी यांना मोठे केले. वर्ष २००२ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने भिलाई येथे सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसारासाठी आलेले साधक श्री. श्रीकांत पाध्ये अन् सौ. अंजली पाध्ये यांच्या माध्यमातून आम्हाला साधनेचे मार्गदर्शन मिळाले. सनातन संस्थेमध्ये आल्यावर आईचे पूर्ण आयुष्य हळूहळू पालटले. त्यामुळे नंतरचे तिचे आयुष्य गुरुकृपेने समाधानाने आणि आनंदाने सनातनमय झाले. तिने पुष्कळ गांभीर्याने साधना आणि सेवा केली.
१. आईने नातींवर केलेले संस्कार : कु. शर्वरी (माझी लहान मुलगी, वय १४ वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) लहान असतांना आई तिला मांडीवर घेऊन पूजा करायची. ती तिच्याकडून आरती, स्तोत्र आणि श्लोक म्हणवून घ्यायची. त्यामुळे शर्वरीला लहानपणापासून देवपूजेची आवड आहे. तिने कु. अंजली (माझी मोठी मुलगी, वय २२ वर्षे) आणि कु. शर्वरी या दोन्ही नातींवरही साधनेचे चांगले संस्कार केले आहेत.
२. साहाय्य करण्याची वृत्ती : पत्नी सौ. अनुपमा आणि मुली अंजली अन् शर्वरी रामनाथीला असतांनाही कोरोनाच्या काळामध्ये तिने तिचे व्यष्टी अन् समष्टी साधनेचे सर्व प्रयत्न काटेकोरपणे पूर्ण केले आणि तिला घरातील जी कामे जमत होती, ती करून मलाही साहाय्य केले.
३. आईची व्यष्टी साधनेची ओढ
अ. ती दिवसातून तीन वेळा प्रार्थना करायची आणि आम्हा सर्वांनाही प्रार्थना करण्याची आठवण करून द्यायची.
आ. काही मासांपासून तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळच चांगले आणि चिकाटीने होत होते. ती रुग्णाईत झाल्यावर तिला बसून नामजप करणे जमत नव्हते; म्हणून तिने पू. अशोक पात्रीकर यांना विचारून घेतले आणि तिने पलंगावर आडवे पडून नामजप करायला आरंभ केला. नामजप करतांना झोप लागू नये; म्हणून ती प्रतिदिन रामरक्षा स्तोत्र, देवीकवच, बगलामुखी आणि कोरोनापासून प्रतिबंधन करण्यासाठी असलेला ‘दुर्गादेवी-दत्त-शिव’ हा नामजप हे सर्व ती पुटपुटत करायची.
इ. घरी आईच्या खोलीमध्ये एका ‘टीपॉय’वर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ हा ग्रंथ ठेवला आहे. आई काहीही खातांना किंवा पाणी पितांना त्यांच्या समोर ते थोडा वेळ ठेवून ती त्यांचा प्रसाद या भावाने ते ग्रहण करायची.
ई. ती सारणीलिखाण (प्रतिदिन स्वतःकडून होणार्या चुका आणि त्यावरील स्वयंसूचना लिहिणे) केल्याविना कधीही झोपत नसे. १४.११.२०२१ या दिवशी संध्याकाळी आईला बरे वाटत नसल्यामुळे मी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो होतो. तिथून घरी आल्यावर आई दमल्याने झोपली. ती कधीही लिखाण केल्याविना झोपत नाही. त्यामुळे थोड्या वेळाने ती पलंगावरून बाजूच्या पटलावर असलेली तिची लिखाणाची वही घेण्यासाठी उठली आणि चक्कर येऊन पडली. तेव्हाही ती ‘मला लिखाण करायचे आहे’, असे म्हणत होती. पू. पात्रीकरकाकांना तिच्याशी बोलायला सांगितल्यावर त्यांनी तिला आराम करायला सांगितला. तेव्हा तिने ऐकले.
४. आईने केलेली समष्टी साधना आणि त्या संदर्भात तिची जाणवलेली तळमळ
४ अ. साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणे
१. आई प्रतिदिन काही साधकांचा भ्रमणभाषवरून व्यष्टी साधनेचा आढावा घेत होती. तेव्हा त्यांचे प्रयत्न अल्प झाले, तर ती त्यांना प्रेमाने प्रयत्न वाढवायला सांगून ती साधकांना प्रोत्साहन द्यायची.
२. प्रतिवर्षी होणार्या पंचांग वितरणाच्या सेवेला ती अन्य साधकांच्या समवेत दुकानात जाऊन पंचांग वितरणाची सेवा आनंदाने करायची. ती सेवेसाठी साधिकांना प्रोत्साहित करून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करायची.
४ आ. आनंदाने सेवा करणे : आमच्या मुलींच्या समवेत जवळपासच्या मुलांना आमच्या घरी बोलावून ती त्यांचा बालसंस्कार वर्ग घ्यायची. बालसंस्कार वर्ग घेणे, जिज्ञासू किंवा साधक यांना संपर्क करणे या सेवा ती आनंदाने करायची. आमच्या घरी सनातनची सात्त्विक उत्पादने वितरणासाठी उपलब्ध असल्यामुळे अनेक जण उत्पादने घेण्यासाठी घरी यायचे. ती त्यांना आनंदाने सर्व प्रसारसाहित्य दाखवण्याची सेवा करायची. सेवा करतांना तिला अत्यंत उत्साह आणि आनंद वाटायचा.
४ इ. सेवेची तळमळ
१. भिलाई येथे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी मारुति मंदिरामध्ये उत्पादनांचा कक्ष लावला जातो. ती त्या कक्षावर नियमित सेवा करायला जायची.
२. वर्ष २००८ पासून विदर्भामध्ये धर्मजागृती सभा व्हायला लागल्या. तेव्हा ती नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी धर्मजागृती सभेला सेवा करायला आमच्या समवेत आली होती. तिला धर्मजागृती सभेसाठी सेवा करायला फार आवडायचे आणि आनंद व्हायचा.
३. दुर्ग-भिलाई येथे झालेल्या २ धर्मजागृती सभांमध्ये आणि २ राज्यस्तरीय हिंदू राष्ट्र अधिवेशनांमध्ये ती सेवेला आली होती. तिने तेथील प्रदर्शन कक्षावर भावपूर्ण सेवा केली.
४. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या राजिम कुंभमेळ्यामध्येही तिने पूर्णवेळ थांबून सेवा केली.
५. १५.३.२०२० मध्ये छत्तीसगड येथील रायपूरमध्ये झालेल्या दुसर्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनामध्येही तिने पूर्णवेळ सेवा केली.
६. आई नातेवाईकांकडे जातांना ती तिच्या समवेत ‘सनातन पंचांग’ आणि सनातनचे ग्रंथ ठेवायची. ती नातेवाईकांना ते घेण्यासाठी उद्युक्त करायची. ती नेहमी सनातनचे ग्रंथ आणि इतर साहित्य तिच्या समवेत ठेवायची. वर्ष २०१५ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात आलो होतो, तेव्हाही तिने रेल्वेमध्ये सहप्रवाशांना ग्रंथ वितरण करण्याची सेवा आनंदाने आणि भावपूर्ण केली होती.
७. आईकडे घरी नामपट्ट्यांचे दायित्व होते. आई नामपट्ट्यांचे वास्तूसंच करून ठेवायची आणि त्याचा हिशोब ठेवायची. ती साधकांना वास्तूसंचाविषयी माहिती सांगायची.
८. भिलाई येथे प्रतिवर्षी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात मोठा भंडारा होतो. तिथे सनातनचे मोठे ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांचा वितरण कक्ष लागतो. तेव्हा आई घरातील पूजा इत्यादी सर्व लवकर आटोपून दिवसभर आणि रात्री शेवटपर्यंत सेवेला थांबायची. एक वर्षी तिचे एका डोळ्याचे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले होते आणि तिच्या डोळ्याला हिरवी पट्टी लावली होती, तरीही ती हनुमान जयंतीच्या सेवेसाठी आली होती.
५. आईचे शेवटचे आजारपण ! : १६.११.२०२१ ते १८.११.२०२१ पर्यंत ती रुग्णालयात भरती झाली होती; मात्र तीन दिवसांनी ती बरी होऊन घरी परत आली. तिने घरी आल्यावर नियमित आपले घरचे नित्यकर्म चालू केले. नंतर परत तिला त्वचेच्या विकारासाठी दाखवायला २२.११.२०२१ या दिवशी रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी तिला त्वचेवर ‘ॲलर्जी’ येत असल्यामुळे रुग्णालयात भरती व्हायला सांगितले. तिथे तिचे त्वचेचे विकार बरे झाले; पण पोट साफ न झाल्यामुळे पोट फुगत होते. तिची प्रकृती बरी नसल्यामुळे तिचे पोटाचे शस्त्रकर्म करण्यात आले.
६. आई रुग्णालयात भरती असतांना जाणवलेली सूत्रे !
अ. ४.१२.२०२१ या दिवशी तिला पुष्कळच त्रास होत होता. तिला एवढा त्रास होत असतांनाही तिने दुसर्या दिवशी, म्हणजे रविवारी तुळस तोडता येणार नाही; म्हणून त्या दिवशीच पूजेसाठी तुळस तोडून ठेवायला सांगितली.
आ. पू. इंगळेकाका आणि पू. पात्रीकरकाका आईला भेटायला रुग्णालयात आले होते. तेव्हा पू. पात्रीकरकाकांशी बोलतांना आई तिच्या व्यष्टी आढाव्याविषयीच बोलत होती.
इ. २३.११.२०२१ या दिवशी पू. पात्रीकरकाकांनी छत्तीसगड येथील साधकांना एका बैठकीत मार्गदर्शन केले. तेव्हा आईनेही रुग्णालयातून त्या मार्गदर्शनाला जोडून पू. पात्रीकरकाकांना आपल्या साधनेचा आढावा दिला.
ई. तिच्या बोलण्यातून तिला ‘तिचा अंतकाळ जवळ आला आहे’, याची चाहूल लागली होती’, असे माझ्या लक्षात आले. ४.१२.२०२१ या दिवशी बोलतांना तिने मला सांगितले, ‘‘आशामावशीला ५० सहस्र रुपये दे आणि त्या पैशांची तिच्या मुलाच्या नावावर पावती करून घे, असे तिला सांग.’’(आमची सर्वांत लहान मावशी हिची आर्थिक स्थिती फारच बेताची आहे.)
उ. माझे अंतिम संस्कार आणि श्राद्ध शिवनाथ नदीवर करायचे. अस्थि विसर्जनही इथेच करायचे. बाहेर कुठे जायची आवश्यकता नाही. सर्व गंगा-यमुना इथेच आहेत. आम्ही तिच्या इच्छेप्रमाणे सर्व करत आहोत.
ऊ. शेवटी तिची काहीही इच्छा राहिली नव्हती. ती शेवटी सनातनमय आणि गुरुमय होऊन झाली होती. केवळ ‘ती आणि तिची व्यष्टी अन् समष्टी साधना’ हेच तिच्या जीवनातील सूत्र होते.
७. संतांची अनुभवलेली अपार कृपा !
अ. आई रुग्णालयात भरती असतांना पू. पात्रीकरकाका नेहमी भ्रमणभाष करून मला तिच्या प्रकृतीविषयी विचारायचे आणि तिच्याशीही बोलून तिला मार्गदर्शन करायचे.
आ. आईचे शस्त्रकर्म चालू असतांना आणि त्यानंतर ती अतिदक्षता विभागात असतांना पू. पात्रीकरकाका सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून आम्हाला विविध मंत्र अन् न्यास सांगायचे. त्याप्रमाणे आम्ही नामजपाचे उपाय करत होतो.
इ. आई अतिदक्षता विभागामध्ये असतांना पू. इंगळेकाकांची प्रकृती बरी नसतांनाही ते प्रतिदिन सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास आईच्या प्रकृतीविषयी विचारपूस करायचे.
८. स्वप्नात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सगळ्यांशी आणि आईशी बोलत आहेत’, असे दिसणे : ६.१२.२०२१ या दिवशी मला स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले (परात्पर गुरुदेव) यांचे दर्शन झाले. स्वप्नात मला ‘परात्पर गुरुदेव सर्व साधकांशी आणि आईशी हसत बोलत आहेत’, असे दिसले. आईला रामनाथी आश्रमात जाऊन परात्पर गुरुदेवांना भेटायची इच्छा होती. ‘आजारपणामुळे आई आश्रमात जाऊ शकत नाही; म्हणून मला स्वप्नात ‘परात्पर गुरुदेव आईशी बोलत आहेत’, असे दिसल्याचे जाणवले.
९. आईचे अखेरचे दर्शन !
९ अ. आईला ‘बरे वाटावे आणि आधार वाटावा’, यासाठी तिला ‘तू बरी आहेस; पण सतत गुरुस्मरणात राहून संतांनी सांगितलेला ‘निर्गुण’चा नामजप करत रहा’, असे सांगणे : ८.१२.२०२१ या दिवशी संध्याकाळी आधुनिक वैद्यांनी मला काही मिनिटांसाठी आईला भेटण्याची अनुमती दिली. तेव्हा आई अतिदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर’वर होती. मी तिला हाक मारल्यावर तिने माझ्याकडे डोळे उघडून बघितले. तेव्हा मी तिला समजावत ‘तिला बरे वाटावे आणि आधार वाटावा’ यासाठी म्हणालो, ‘‘अंजली, शर्वरी, अनुपमा आणि प्रशांत (माझा भाऊ) हे सर्व जण बाहेर उभे आहेत. तू बरी झाली आहेस. तू आता केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या स्मरणात रहा. पू. पात्रीकरकाकांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून तुला ‘निर्गुण’ हा नामजप करायला सांगितला आहे. तो नामजप तू करत रहा. परम पूज्यांनी तुला बरे केले आहे.’ तिला ‘व्हेंटिलेटर’ लावला असल्यामुळे बोलता येत नव्हते. तिने डोळे बंद करून उघडले. तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते. ही माझी आईची शेवटचीच भेट होती. दुसर्या दिवशी सकाळी (९.१२.२०२१ (गुरुवार)) आईचे निधन झाले.
१०. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
अ. काही दिवस तिला शारीरिक त्रास होत असल्यामुळे तिच्या चेहर्यावर त्रास दिसायचा. तिने देह ठेवल्यानंतर त्रास न जाणवता ‘ती ध्यानस्थ असून गुरुस्मरणात आहे’, असे मला जाणवले.
आ. तिला घरी घेऊन आल्यावर तिचे डोके मांडीवर ठेवल्यावर ‘आई श्वास घेत आहे’, असे मला वाटले.
११. ‘श्री. श्रीकांत क्षीरसागर यांच्या मुलाकडून स्वतःचे अंतिम क्रियाकर्म व्हावे’, असे सांगणे : काही वर्षांपूर्वी आई बरी असतांना श्री. श्रीकांत क्षीरसागरकाका इकडे प्रसाराला यायचे. तेव्हा ‘त्यांचा मुलगा श्री. आशिष क्षीरसागर श्राद्धकर्मे करतो’, असे तिच्या लक्षात आले. तेव्हा आईने त्यांना सांगितले, ‘‘माझे निधन होईल, तेव्हा तुमच्या मुलालाच श्राद्धकर्म करण्यासाठी पाठवा. त्याच्याकडूनच माझे सर्व श्राद्धविधी आणि श्राद्धकर्म करवून घ्यायचे.’’ आईच्या इच्छेप्रमाणे आम्ही तसे करत आहोत.
परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेने आईविषयीची ही सर्व सूत्रे लक्षात आली. यासाठी मी परम पूज्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
(१६.१२.२०२१)
क्रमशः
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |