अचूक बिंदूदाबनाने केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर उपचार करणार्या डॉ. संगीता म्हात्रे !
डॉ. संगीता म्हात्रे यांनी बिंदूदाबन, निसर्गाेपचार आदी १० हून अधिक उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी एक प्रभावी उपचारपद्धत शोधून तिला स्वतःच्या मुलीच्या ‘अनुपमा’ या नावावरून ‘अनु नेचर क्युअर’, असे नाव दिले आहे. त्या म्हणतात, ‘‘शरिरावरील विशिष्ट बिंदू विशिष्ट पद्धतीने दाबून कोणताही विकार बरा करता येतो. एवढेच नव्हे, तर या उपचारांनी स्वभावदोष निर्मूलनासाठीही साहाय्य होते. त्यामुळे ‘आध्यात्मिक प्रगती होण्यासाठीही उपचारपद्धत साहाय्यकारक आहे.’’ एखाद्या उपचारपद्धतीचा स्वभावदोष निर्मूलनासाठी अभ्यास करणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
त्यांनी आपल्या उपचारपद्धतीचे कुठेही विज्ञापन न करता गेल्या २५ वर्षांत असंख्य रुग्णांवर उपचार केले आहेत. त्या केवळ सात्त्विक व्यक्तींवरच उपचार करतात. त्या वारंवार सांगतात की, ‘त्यांनी ही उपचारपद्धत शोधली आहे, ती केवळ श्री गुरूंची कृपा आहे.’ त्यांनी ही उपचारपद्धत शोधण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. काही सहस्र रुग्णांवर उपचार केल्यावर त्यांनी या उपचारपद्धतीतील दाबबिंदू निश्चित केले आहेत. त्यांना ‘सनातनच्या साधकांनी सर्व उपचार नीट शिकून घ्यायला हवेत’, अशी पुष्कळ तळमळ आहे. त्यांनी काही साधकांना ही उपचारपद्धत शिकवली. त्या वेळी साधकांना उपचारपद्धतीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि डॉ. संगीता म्हात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. उपचारपद्धत पूर्ण आकलन झाल्यावरच पुढच्या टप्प्याचे शिकवणे : ‘या उपचारपद्धतीमध्ये रुग्णाला कोणतेही औषध द्यावे लागत नाही. त्या ही उपचारपद्धत ५ टप्प्यांमध्ये शिकवतात. पहिल्या टप्प्यातील बिंदूदाबनानेही सर्व रोगांवर उपचार करता येतात. त्यांनी सांगितले, ‘‘पुढचे पुढचे टप्पे मनाच्याही पलीकडच्या पातळीवर काम करतात.’’ एक टप्पा झाल्यावर विद्यार्थ्याने न्यूनतम १०० जणांवर उपचार केल्यावरच त्याला पुढचा टप्पा शिकवला जातो. त्या शिकवत असतांना मला पुढीलप्रमाणे जाणवले.
अ. डॉ. संगीताताई प्रत्येक साधकावर स्वतः बिंदूदाबन करून ‘त्या बिंदूवर किती दाब द्यायला हवा ?’, ते अनुभवण्यास सांगतात. ‘त्या प्रत्येक साधकाला हात धरून कुठे चुकत आहे ?’, ते शिकवतात आणि स्वतःसमोर प्रत्यक्ष सरावही करवून घेतात.
आ. ही उपचारपद्धत सोपी; पण सराव आवश्यक असलेली आणि परिणामकारक आहे.
२. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे : डॉ. संगीताताई केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही निदान करतात. त्यांना सूक्ष्मातून बर्याच गोष्टी समजतात.
३. त्यांच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.
४. त्या सतत सांगतात, ‘श्री गुरूंनीच त्यांना हे सर्व शिकवले आहे आणि श्री गुरूंनीच मला इथे आणले आहे.’ यातून त्यांच्यात कृतज्ञताभाव जाणवतो.’
सुश्री (कुमारी) सुगुणा गुज्जेट्टी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘डॉ. संगीताताई सकारात्मक राहून रुग्णांवर उपचार करत असल्यामुळे ‘त्यांचे उपचार पुष्कळ परिणामकारक आहेत’, असे मला जाणवले.
२. आपण रुग्णांवर उपचार करत असतांना त्या सांगतात, ‘‘एक आई बाळाला सांभाळते, तसे रुग्णांना सांभाळून त्यांच्यावर उपचार करायला पाहिजेत.’’ त्यांच्यामध्ये मला आईसारखा वात्सल्यभाव असल्याचे जाणवले.’
वैद्य भरत मधुकर बुगडे, रायगड
१. ‘संगीताताईंची आपल्याकडे असणारे संपूर्ण ज्ञान धर्मकार्यासाठी अर्पण करण्याची तळमळ जाणवली.
२. सनातनच्या कार्याशी अल्पावधीत एकरूप होणे : देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या साधिका सौ. आनंदीताई पांगूळ या डॉ. संगीताताई यांच्या भगिनी आहेत. दळणवळण बंदीच्या काळात दोघी बहिणी काही काळ एकत्र रहात होत्या. त्या वेळी डॉ. संगीताताई यांनी सौ. आनंदीताई यांच्याकडून सनातन संस्थेची आणि कार्याची माहिती जाणून घेतली. डॉ. संगीताताई यांच्या बोलण्यातून ‘त्या अल्पावधीत सनातनच्या कार्याशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे ‘कोणीतरी बाहेरची व्यक्ती नाही, तर एक साधकच आम्हाला शिकवत आहे’, असे मला जाणवत होते.
३. भाव : डॉ. संगीताताई यांच्या बोलण्यातून त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव जाणवतो.’
सौ. वैशाली संदेश गावडे, सावंतवाडी
१. त्या अतिशय प्रेमाने आणि पुष्कळ वर्षांपासून ओळख असल्याप्रमाणे सर्वांशी वागतात.
२. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील नसूनही ही उपचारपद्धत त्यांनी आम्हाला आमच्या बौद्धिक पातळीला येऊन ‘आम्हाला समजेल’, अशा सोप्या भाषेत शिकवली.
३. रुग्णाचे निदान करतांना त्यांचे सतत देवाशी अनुसंधान असल्याचे जाणवले. ‘रुग्णांवर उपचार करतांनाही त्या नामजप करतात’, असे माझ्या लक्षात आले.’
गव्यसिद्ध (कु.) कल्पिता गडेकर (वय २३ वर्षे) (पंचगव्य आणि बिंदूवेधन (ॲक्युपंक्चर) उपचारक)
१. ‘डॉ. संगीताताईंनी निर्माण केलेल्या ‘अनु नेचर क्युअर’ या उपचारपद्धतीमध्ये केलेल्या बिंदूदाबनामुळे शारीरिक त्रास लगेच न्यून होतात’, असे मला जाणवले.
२. ‘प्रत्येक साधकाला योग्य बिंदू अचूक मिळाला पाहिजे’, अशी त्यांची तळमळ आहे.’
श्री. किसन राऊत
सोप्या भाषेत शिकवणे : ‘ही उपचारपद्धत शिकवतांना त्या साध्या आणि सोप्या भाषेत काही व्यावहारिक उदाहरणे देऊन पटवून देतात. त्या सांगतात, ‘‘आपले आरोग्य चांगले रहाण्यासाठी आहार-विहार आणि आचार चांगले असायला हवेत.’’
कु. प्रतिमा अविनाश लोणे, जिल्हा पुणे
१. साधकांमध्ये आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करणे : ‘साधकांवर बिंदूदाबन करतांना त्या स्पर्शज्ञान, त्यांच्यातील निरीक्षणक्षमता आणि त्यांची रुग्णाशी संवाद साधण्याची पद्धत यांद्वारे रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. त्या साधकांमध्ये सातत्याने ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली आहोत, तर तेच सगळे नीट करणार आहेत’, अशी श्रद्धा निर्माण करतात. त्या शिकवत असतांना त्यांच्या बोलण्यात स्थिरता जाणवली.
२. संगीताताईंनी साधिकेवर बिंदूदाबन केल्यावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर पालट होणे : ताईंनी माझ्यावर बिंदूदाबन केल्यावर मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर पालट जाणवला. मला शरिरात हलकेपणा आणि स्थिरता जाणवली. मानसिक स्तरावर शांतता जाणवली. आध्यात्मिक स्तरावर ‘माझ्यावरील आवरण निघून जाऊन उपाय होत आहेत’, असे जाणवले.’
कु. अदिती तवटे (वय २१ वर्षे), सिंधुदुर्ग
डॉ. संगीताताईंनी बिंदूदाबन केल्यावर थकवा जाऊन हलकेपणा जाणवणे आणि नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता जाणवणे : ‘डॉ. संगीताताईंनी माझ्या शरिरावरील बिंदू दाबण्याआधी मला थकवा जाणवत होता. माझे डोके आणि पाय दुखत होते; पण त्यांनी बिंदूदाबन केल्यावर मला अतिशय हलके वाटले अन् माझ्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आधी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार असायचे. त्यांनी बिंदूदाबन केल्यावर माझी नकारात्मकता न्यून होऊन मला माझ्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले.’
सौ. काव्या कुणाल चेऊलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. डॉ. संगीताताई रुग्णाचा त्रास शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक स्तरावरचा आहे ?, हे पाहून तसे उपचार करत असणे : ‘संगीताताई ‘रुग्णाला होणारा त्रास कोणत्या स्वरूपाचा आहे ?’, हे समजून घेऊन त्रासानुसार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील बिंदू शोधून त्यावर उपचार करतात. त्या ‘व्यक्तींमधील स्वभावदोषांमुळेही तिला काही रोग झालेले असतात’, हे अचूक ओळखून त्या स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास प्रोत्साहन देतात.
२. ‘आपली साधना चांगली असेल आणि आपले अंतर्मन शुद्ध असेल, तरच आपण अचूक उपचार करू शकतो’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
३. संगीताताईंची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता
अ. त्यांनी बिंदू दाखवल्यावर मी एका ठिकाणी बिंदूदाबन केले. त्यानंतर मला हलकेपणा जाणवला. रात्री या संदर्भात चिंतन करत असतांना ‘काही वर्षांपूर्वी एका संतांनी मला त्याच ठिकाणी अनिष्ट शक्तींनी स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले होते’, ते आठवले.
आ. दुसर्या दिवशी त्यांनी माझ्यावर बिंदूदाबन केल्यावर मला पूर्वी होणारा त्रास आठवला. पूर्वी त्याच ठिकाणी मला असह्य वेदना होत असल्याने तिथे दाबल्यावर मी जोरजोरात किंचाळत असे; परंतु संगीताताईंना हे मी न सांगताच समजले.
श्री. कार्तिक साळुंके, फोंडा, गोवा.
देवाने दिलेल्या शरिराची योग्य काळजी घेण्यास सांगणे : ‘संगीताताई नेहमी सांगतात, ‘देवाने दिलेले शरीर फार सुंदर आहे. ती पंचतत्त्वांनी बनलेली एक सृष्टीच आहे. आपले शरीर प्रत्येक प्रकारचे औषध बनवू शकते आणि आपण निरोगी राहू शकतो. त्यामुळे थोडे लक्ष देऊन शरिराची काळजी घेतली पाहिजे.’
होमिओपॅथी वैद्या (सौ.) ममता देसाई, नवी मुंबई.
अचूक निदान : ‘संगीताताईंना या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. काही साधकांचे बिंदूदाबन करतांना, त्यांच्याशी बोलून किंवा नुसते एकदा हात लावल्यावर त्या त्यांच्या आजाराचे अचूक निदान करत होत्या. त्या पायानेही अगदी प्रभावशाली बिंदूदाबन करतात.’
श्री. सोहम मुरुकटे, मुंबई
‘डॉ. संगीता म्हात्रे यांनी आम्हाला त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीमागील शास्त्र समजावून सांगितले.’
सौ. कल्पना गडम, परभणी
१. ‘डॉ. संगीताताई उपचारपद्धत शिकवत असतांना त्याचा शरिरावर त्वरित परिणाम दिसत होता. तेव्हा ‘ही एक दैवी उपचारपद्धतच आहे’, असे आम्हाला अनुभवता आले.
२. इतर पद्धतींमध्ये आजार झाल्यावर उपचार करण्याची क्षमता असते. या पद्धतीमध्ये ‘आजार होण्यापूर्वीच आपण तो न्यून करू शकतो’, एवढी क्षमता आहे.’
डॉ. संगीता म्हात्रे यांचे विद्यार्थी वसई (जिल्हा पालघर) येथील श्री. चंदन सासवडे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. हसतमुख : ‘श्री. चंदन यांचा तोंडवळा नेहमी हसतमुख असतो.
२. विचारण्याची वृत्ती : ते संगीताताईंना विचारल्याविना कोणतीही गोष्ट करत नाहीत.
३. परिपूर्ण शिकवणे : श्री. चंदन यांनी ‘शिबिरातील साधकांना बिंदू नेमकेपणाने कसा ओळखावा ?’, याचे बारकावे शिकवले. श्री. चंदन म्हणाले, ‘‘एखादा बिंदू सापडला नाही, तरी काही फरक पडत नाही’, असा दृष्टीकोन असेल, तर आपण कधीही शिकू शकणार नाही. ‘काहीही झाले, तरी आपल्याला परिपूर्णच शिकायचे आहे’, असाच आपला दृष्टीकोन हवा.’’
सौ. वैशाली संदेश गावडे, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
१. त्वरित शंकानिरसन करणे : ‘बिंदूदाबनाच्या सरावाच्या वेळी चंदनदादांना कोणतीही शंका विचारली, तरी त्याचे त्वरित निरसन करण्याची त्यांची पद्धत फारच चांगली आहे. ‘शरिरावर संबंधित बिंदू कुठे आहेत ?’, हे लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्याकडून अतिशय सोप्या युक्त्या शिकायला मिळाल्या.
२. सराव करतांना साधकांना ‘विषयाचा ताण येऊ नये’; म्हणून दादा वातावरण खेळकर ठेवण्याचा प्रयत्न करत.
श्री. कार्तिक साळुंके, फोंडा, गोवा.
१. आज्ञापालन : ‘ताईंनी सांगितलेल्या सूचना दादा तंतोतंत पाळतात. त्यांनी सांगितले, ‘‘आपण मनाने करून काहीच उपचार होत नाहीत. ‘ताई सांगतील, तसे ऐकल्यावरच उपाय होतात.’’ त्यांच्या वागण्यातून ‘शिष्य कसा असायला हवा ?’, हे लक्षात आले.
२. इतरांची काळजी घेणे : सराव करतांना आम्ही साधक एकमेकांवर बिंदूदाबनाचा सराव करत होतो. ते पाहून दादांनी आम्हाला सांगितले, ‘‘एका साधकावर एकदाच उपचार होतील’, असे पहा. बिंदूदाबनाने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरिरात रोग बरा होण्यासाठीची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे एखाद्यावर सारखे बिंदू दाबल्याने साधकाला त्रास होऊ शकतो.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक १९.१२.२०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |