ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी यांचा ‘कीर्तनभीष्म कृतार्थता’ पुरस्काराने गौरव !

गोंदी येथे मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करतांना मान्यवर

बीड, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र गोंदी येथे चालू असलेल्या श्री दत्तजयंती महोत्सवाच्या वेळी मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बीड येथील प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार वैकुंठवासी ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या सहधर्मचारिणी ह.भ.प. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांना वैकुंठवासी कीर्तनभीष्म ह.भ.प. अच्युत गणेश मुळे (गोंदिकर) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी ‘कीर्तनभीष्म कृतार्थता’ सन्मानाने गौरवण्यात आले.

गोंदी येथील श्रीगुरुदत्तधाम येथे दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वैकुंठवासी कीर्तनभीष्म ह.भ.प. अच्युत गणेश मुळे (गोंदीकर) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव घेण्यात येतो. ते सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांचे प्रशिष्य आणि प्रख्यात कीर्तनकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून देशसेवा केली.

या वेळी रामानंद स्वामी संस्थान श्रीक्षेत्र गोंदीचे श्री. नारायण महाराज मठपती आणि स्वानंदसुखनिवासी जोग महाराज मंदिर अंकुशनगर येथील डॉ. अर्जुन महाराज जाधव, तसेच श्रीगुरुदत्तधाम श्रीक्षेत्र गोंदीचे ह.भ.प. प्रकाश महाराज मुळे (गोंदीकर) यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी ह.भ.प. प्रदीप महाराज मुळे यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. श्रीपाद मुळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. योगीराज मुळे यांनी आभार मानले.

परमेश्वरप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय ! – ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी

मनुष्य म्हणून जन्मास आलेल्या प्रत्येकाचे परमेश्वरप्राप्ती हेच अंतिम ध्येय असायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी यांनी कीर्तनातून केले. ‘जन्मा येऊनि काय केले तुवा मुद्दल गमविले’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करून त्यांनी समर्थ रामदासस्वामींना दत्तदर्शन कसे घडले ? हे आख्यानातून सांगितले. हा पुरस्कार त्यांनी प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार वैकुंठवासी ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या पावन स्मृतीस समर्पण करत असल्याचे सांगितले.