प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन
२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. भाव ठेवून सेवा केल्यावर देवाचे साहाय्य मिळते !
‘आपण सर्वांनी भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण अनुसंधानात रहातो. जेव्हा आपण परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करतो; त्यांच्या चरणी व्यक्त कृतज्ञता करतो किंवा त्यांना शरण जातो, तेव्हा ‘ते आपल्याला कसे साहाय्य करतात ? कशा अनुभूती देतात ?’, ते आपण अनुभवतच आहोत. आपण कुणी काहीच करत नाही. तेच आपल्याकडून सर्वकाही करवून घेतात.
२. ‘प्रत्येक कृती प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव यांच्या चरणांपर्यंत पोचायला हवी’, यासाठी प्रयत्न करायला हवेत !
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हे सर्व कार्य आधीच झाले आहे. आपण केवळ निमित्तमात्र आहोत’, असे आधीच सांगितले आहे. ‘माझी प्रत्येक सेवा प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणांपर्यंत पोचायला हवी’, यासाठी प्रयत्न केले, तर तसे होणारच आहे.
३. साधनेत भाव आणि तळमळ महत्त्वाची आहे. भाव आणि तळमळ वाढल्यावर ईश्वराचे साहाय्य मिळतेच. ते आता तुम्ही अनुभवतच आहात.
४. आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्णकाळ असल्याने त्याचा लाभ करून घ्या !
एवढ्या आपत्काळातही गुरुदेवांनी आपल्याला सेवा दिली आहे. हा आपत्काळ असूनही साधकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया.’
– (सद्गुरु) सत्यवान कदम, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)