भरती केंद्रासह सैनिकी रुग्णालय आणि वैद्यकीय उपकेंद्र चालू करा !
भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी
सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – सैनिकी वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यात सैनिक भरती केंद्र चालू करावे, तसेच आजी-माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय यांसाठी सैनिकी रुग्णालयात किंवा कमांड रुग्णालयाच्या नियंत्रणामध्ये वैद्यकीय उपकेंद्र चालू करावे, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा ज्याप्रमाणे साधू-संतांचा, शूरवीरांचा आणि महाराष्ट्राच्या राजधानीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तसाच तो आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शामुळे पावन झालेल्या या भूमीतील युवक सैन्यात भरती होण्यासाठी आसुसलेला असतो; मात्र काही तांत्रिक अडचणी, अनेक मर्यादा यांमुळे भरतीची संधी हुकते. यामुळे सातारा येथे सैन्य भरती केंद्र व्हावे, ही सातारावासियांची इच्छा आहे, तसेच सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणार्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात सैनिकी रुग्णालय असणे आवश्यक आहे. किमान कमांड रुग्णालयाच्या नियंत्रणात सातारा येथे एक उपकेंद्र चालू करावे.