पूजाविधीविषयी पुरोहित आणि समाज यांचा दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता !

श्री. संदीप जगताप

१. पूजाविधी उरकणे, हा अयोग्य दृष्टीकोन नको !

सध्या मनुष्य हा पूर्वीच्या तुलनेत अध्यात्मापासून दूर गेला आहे. पूर्वी लोकांमध्ये ईश्वराप्रती भाव आणि श्रद्धा अधिक प्रमाणात होती. त्यामुळे ते मंदिरांना, तसेच विधी करणार्‍या पुरोहितांना दक्षिणा स्वरूपात धन अन् वस्तू अर्पण करत असत. सध्याच्या काळात विधी करणारे बहुतांश पुरोहित, मंदिरांचे पुजारी यांची सात्त्विकता न्यून झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे पूजा किंवा विधी यांची परिणामकारकताही न्यून झाल्याचे दिसून येते. बहुतांश वेळा पूजा करणे, याकडे व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहिले जाते. धार्मिक भागाच्या विचारांना डावलून ‘न्यूनतम दक्षिणा देऊन पूजा कशी करून घेता येईल’, असा लोकांचा अयोग्य दृष्टीकोन विकसित होतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे अल्प वेळेत विधी अथवा पूजा उरकून अधिकाधिक पैसे मिळवण्याचा प्रयत्न काही पुरोहित अन् पुजारी यांच्याकडून होतांना दिसत आहे.

२. ‘पूजाविधी करणे ही आध्यात्मिक उन्नतीची संधी’, याकडे पुरोहितांनी लक्ष देणे आवश्यक !

भारत देश हा संपूर्ण विश्वाचा आध्यात्मिक गुरु समजला जातो. या भूमीत असे अपप्रकार होणे सर्वथा अनुचित आहे. यजमानास ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देण्यामध्ये पुरोहित आणि पुजारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी समाजाला धर्मशिक्षण देऊन योग्य दिशादर्शन करणे अपेक्षित आहे. सध्याचा समाज धर्मापासून दूर जात आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे समाजामध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव ! अज्ञानाचा अंध:कार दूर झाल्याविना हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि त्यानुसार आचरण करण्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. आपली मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे व्हायला हवीत. ज्यातून हिंदूंमध्ये आपल्या धर्मातील प्रत्येक विधी आणि कृती यांविषयी संवेदनशीलता निर्माण होऊन ते धर्मशास्त्रानुसार कृती करण्यास प्रवृत्त होतील. हिंदु धर्मात सांगितलेल्या चार वर्णांपैकी पहिला वर्ण म्हणजे ब्राह्मण ! पुरोहित आणि पुजारी सतत ईश्वराशी संबंधित कृती करत असतात. त्यांना याद्वारे स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करण्याचीही संधी या माध्यमातून ईश्वरानेच उपलब्ध करून दिली आहे, याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे.

३. क्षणिक भौतिक सुखासाठी व्यय करण्यापेक्षा सत्पात्रे दान करा !

सध्याच्या काळात सामान्य व्यक्ती क्षणिक भौतिक सुखासाठी बर्‍याच अनावश्यक चैनीच्या गोष्टींवर आर्थिक व्यय करतांना दिसतो. त्या तुलनेत सत्पात्री असलेले पुरोहित, मंदिरे, आध्यात्मिक संस्था यांना दान केले, तर सर्व स्तरांवरच व्यक्तीला लाभ होईल. (हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागे पौरोहित्याकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले जावे, हा एकमेव उद्देश आहे ! – संपादक)

– श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२१)