‘सेवा हा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने सेवा करणार्या सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी !
‘सेवा हा गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, या भावाने सेवा करणार्या पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी !
सिंहगड रस्ता (पुणे) येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (कै.) श्रीमती प्रभा मराठेआजी (देहत्यागासमयीचे वय ८४ वर्षे) यांनी २२.९.२०२१ या दिवशी देहत्याग केला. २१.१२.२०२१ या दिवशी पू. आजींचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त पू. आजींचे पुणे येथील कुटुंबीय आणि साधिका यांना पू. आजींकडून शिकायला मिळालेली आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
लेखिका – सौ. गायत्री श्यामाप्रसाद नरगुंदे (मुलगी), पुणे
१. ‘पू. आई सतत आनंदी आणि उत्साही असायची.
२. तिची स्मरणशक्ती चांगली होती.
३. ती शांत स्वभावाची होती. तिने लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कधी कुणाला दुखावले नाही.
४. तिच्यामध्ये पुष्कळ सहनशक्ती होती. तिला कितीही त्रास होत असला, तरी ती तो सहन करायची.
५. पू. आईचे ‘नामस्मरण करणे आणि स्तोत्र म्हणणे’ अखंड चालू असायचे.’
लेखक – श्री. प्रसाद व्यंकटेश मराठे (धाकटा मुलगा), पुणे
‘पू. आई उतारवयातही स्वतःची कामे स्वतःच करत असे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.१२.२०२१)
साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
लेखिका – सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सिंहगड रस्ता, पुणे.
१. सर्व साधकांच्या ‘सनातन आई’ असलेल्या पू. मराठेआजी !
‘पू. मराठेआजी प्रत्येक साधकामध्ये गुरुदेवांचे रूप बघत असत. साधक त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होत असे. त्या प्रत्येक साधकाशी हसतमुखाने आणि प्रेमाने बोलत असत अन् प्रत्येकाला काहीतरी खाऊ देत असत. त्या प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करत असत. त्यांनी साधकांना आईचे प्रेम दिले. त्यामुळे त्या सर्वांच्या ‘सनातन आई’ होत्या.
२. पू. आजींचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते.
३. सेवेची तळमळ
मला पू. मराठेआजी यांच्या समवेत सेवा करण्याची संधी अनेक वेळा मिळाली. त्यांचे वय अधिक असूनही प्रसाराची सेवा करतांना त्या मोठ्या इमारतींच्या पायर्या चढत असत. त्या मला नेहमी म्हणायच्या, ‘‘सेवा म्हणजे गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे.’’ त्यांनी मला सेवेतील बारकावे शिकवून ‘सेवा ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ कशी करायची ?’, हे शिकवले. ‘सेवा करतांना ती परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी अचूक, अहंविरहित आणि परिपूर्ण करायला हवी’, हे मला पू. आजींकडून शिकायला मिळाले.
४. पू. आजींना प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेले ‘इतुके दे मजला ।’ हे भजन पुष्कळ आवडायचे. त्या स्वतः हे भजन आवडीने म्हणत असत.
५. पू. आजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. त्यांच्या मुखात सतत ‘परम पूज्य, परम पूज्य’, हे शब्द असायचे.
६. पू. आजींच्या देहत्यागाच्या आदल्या दिवशी झालेली त्यांची हृद्य भेट !
‘पू. आजींच्या देहत्यागाच्या आदल्या दिवशी मी आणि सौ. राधा सोनवणे, आम्ही दोघी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेतला. त्या वेळी मला त्यांच्या हाताचा स्पर्श कापसासारखा मऊ जाणवला. त्यांचा तोंडवळा लहान बालकाप्रमाणे निरागस, हसतमुख आणि आनंदी दिसत होता.
‘हे गुरुमाऊली, ‘अशा प्रीतीस्वरूप पू. आजींविषयी तुम्हीच माझ्याकडून सूत्रे लिहून घेतलीत’, याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
लेखिका -सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे
१. प्रीतीचे मूर्तीमंत रूप असलेल्या पू. मराठेआजी !
‘साधारण वर्ष २०१० मध्ये मी पुण्यात आले. तेव्हापासून मला पू. आजींचा सहवास लाभला. त्या इतक्या प्रेमळ आहेत की, त्या बोलत असतांना मी त्यांच्याकडे पहातच रहायचे. ‘त्यांचे बोलणे माझ्या आत जात आहे’, असे मला जाणवायचे.
२. प.पू. गुरुदेवांनी पू. आजींसाठी पाठवलेला प्रसाद त्यांनी सर्वांना देणे
सेवेच्या निमित्ताने पू. आजींना भेटायला गेल्यावर त्या ‘तुम्ही आधी प्रसाद घ्या’, असे म्हणून प.पू. गुरुदेवांनी त्यांच्यासाठी पाठवलेला प्रसाद आम्हालाही द्यायच्या. तेव्हा ‘आपल्यालाही गुरुदेवांचा प्रसाद मिळाला’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटायची.
३. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. पू. आजींनी देहत्याग केल्याचे कळल्यावर आम्ही पू. आजींच्या अंत्यदर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्यांच्या देहाकडे पाहून मला प्रसन्न वाटत होते.
आ. त्या वेळी ‘आपण देवतेचे दर्शन घेत आहोत’, असे मला जाणवत होते. तेव्हा माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती.
इ. थोड्या वेळाने ‘माझा देह हलका झाला आहे’, असे मला जाणवत होते.
ई. एरव्ही मला अशा ठिकाणी गेल्यानंतर भीती वाटते आणि तेथील वातावरण नकोसे वाटते; पण पू. आजींच्या अंत्यदर्शनाला गेल्यावर मला वाटले, ‘माझे मनच नाही.’ इतके मला हलके वाटत होते.
‘पू. आजींचे चैतन्य ग्रहण करायला मिळाले’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला पू. आजींच्या सहवासात जे काही शिकता आले आणि जे माझ्या अल्प बुद्धीला समजले, ते सर्व त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ११.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |