हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचे षड्यंत्र !
१. पोलीस, प्रशासन, धर्मद्रोही आणि पुरोगामी यांच्याकडून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्यात येणे
‘सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ‘विषारी किंवा प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घाला’, असा निर्णय दिला. ‘याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्या, तसेच त्याच्या कार्यवाहीसाठी राज्य सचिव उत्तरदायी रहातील’, असेही सांगितले. याला प्रसिद्धी मिळाली; कारण देशात हिंदूंविषयी काही घडल्यास त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळते. धर्मांधांनी कितीही वाईट कृत्ये केली, तरी यांच्या तोंडाला कुलपे लागतात किंवा त्यांची वाचा जाते. आज ज्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत, ते पहाता हिंदूंचे सण, उत्सव, धार्मिक चालीरिती, रूढी आणि परंपरा यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून नेहमीच हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी निर्बंध लावले जातात. त्यांच्याकडून काही सुटलेच, तर तथाकथित पर्यावरणवादी आणि पुरोगामी यांच्याकडून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त केले जाते. याचे अधिक स्वरूप समजून घेऊया.
१ अ. मकरसंक्रांत : हिंदू ‘मकरसंक्रांत’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. परंपरेचा एक भाग म्हणून यानिमित्त महिला मंदिरात जाऊन वाण देतात, तर काही पुरुष पतंग उडवतात. या सणाच्या वेळी अचानक पुरोगाम्यांचे पक्षीप्रेम उफाळून येते. ‘पतंगावर बंदी घाला, त्याने पक्ष्यांचे गळे चिरले जातात’, इत्यादी ओरड केली जाते; पण धर्मांधांकडून एकतर्फी प्रेमातून अनेक मुलींचा बळी घेतला जातो. मुलींना रॉकेल ओतून जाळणे किंवा त्यांच्यावर आम्ल (ॲसिड) फेकून त्यांना घायाळ करणे, अशा अनेक घटना सभोवताली घडत असतात. याविषयी कधीच कुणी याचिका करत नाहीत किंवा निवेदनही देत नाहीत.
बंगालमध्ये गंगासागरची प्रसिद्ध यात्रा असते. या यात्रेचे पुष्कळ मोठे महत्त्व आहे. त्याविषयी ‘हर तिरथ बार बार, गंगासागर एक बार !’, असे म्हटले जाते. जानेवारीमधील उत्सवाला अनुमती नाकारणे आणि यात्रेवर निर्बंध घालणे असे प्रकार घडले. या विरोधात अनेक याचिका उच्च न्यायालये आणि सर्वाेच्च न्यायालये येथे प्रविष्ट कराव्या लागल्या.
१ आ. होळी आणि धूलिवंदन : पर्यावरणवाद्यांकडून होळी आणि धूलिवंदन या सणांनाही लक्ष्य केले जाते. ‘झाडे तोडू नका, होळी पेटवू नका, पर्यावरणाचा विचार करा’, असे आवाहन केले जाते. थोडक्यात सण साजरा करू नये; म्हणून विरोध केला जातो. दुसरीकडे जंगलांची अनिर्बंध तोड करून सहस्रो आणि लाखो वृक्षसंपदा नष्ट केली जात असतांना त्याविषयी कुणीही चकार शब्द काढत नाही. केवळ पर्यावरणाचे निमित्त करून हिंदूंच्या सणाला विरोध करण्याचे उद्योग चालू असतात. त्यानंतर दुसर्याच दिवशीच धूलिवंदन येते. श्रीकृष्णाच्या काळापासून चालू असलेल्या या उत्सवाला विरोध करण्यासाठी ही मंडळी पुढे असतात. त्यांच्याकडून ‘दुष्काळसदृश्य स्थिती आहे, पाणी वाया घालू नका’, असे आवाहन केले जाते. मद्य बनवणारी आस्थापने आणि पशूवधगृहे यांच्यासारख्यांकडून प्रतिदिन जेवढे पाणी वाया घालवले जाते, त्यामानाने हिंदूंच्या एका दिवसाच्या सणासाठी १ टक्काही पाणी वापरले जात नसेल. असे असतांना हेच तथाकथित पर्यावरणवादी त्याविरोधात काहीही करत नाहीत. दुसरीकडे प्रशासन आणि पोलीस आदी बघ्याची भूमिका घेतात; कारण टेबलावरून आणि टेबलाखालून त्यांना पुष्कळ पैसा मिळतो, असे वाटल्यास चुकीचे ते काय ? ते अन्य पंथियांच्या सणाला मोठमोठ्या विज्ञापनांमधून शुभेच्छा देतात. पूर्वी त्यांच्याकडून इफ्तार मेजवान्या देण्यात येत असत. मोदी सरकार आल्यावर ही थेरं थांबली आहेत.
१ इ. पंढरीची वारी : आषाढ मासामध्ये ७०० वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी असते. या वारीला पायाभूत सुविधाही देऊ न शकलेली सर्वपक्षीय सरकारे विविध कारणांनी वारीला आडकाठी करतांना दिसतात. मागील २ वर्षांपासून कोरोनाचे कारण सांगून एकही वारी पायी जाऊ दिलेली नाही. याउलट निवडणुका आणि राजकीय पक्ष यांचे कार्यक्रम अन् मेळावे अलोट गर्दीसह पार पाडले जातात.
१ ई. श्रावण मास (महाशिवरात्र आणि नागपंचमी) : श्रावण मास आला की, हिंदूंच्या सणांची रेलचेल चालू होते. त्याच वेळी हिंदूंच्या प्रत्येक सणाला विरोध करण्यासाठी हे धर्मद्रोही सिद्ध असतात. श्रावण मासात नागपंचमी येते. तेव्हा ‘नागांची पूजा करू नका, त्यांना दूध पाजू नका’, असे आवाहनही केले जाते. श्रावण मासात केवळ शैवच नाही, तर वैष्णव तथा अन्य भक्त भगवान शिवाची पूजा आणि उपासना करतात. शिवाच्या दर्शनासाठी जात असतांना ते पिंडीवर वहाण्यासाठी दूध घेऊन जातात. ते दूधही धर्मद्रोह्यांकडूनच मागितले जाते. ‘आम्ही ते दूध गरिबांना देऊ’, अशा थापा मारल्या जातात. अशा वेळी धर्मशिक्षण नसलेले हिंदू बळी पडून त्यांच्याकडील दूध धर्मद्रोह्यांच्या स्वाधीन करतात.
१ उ. भाद्रपद मास (गणेशोत्सव) : भाद्रपद मासात मोठ्या उत्साहाने आपण गणेशोत्सव साजरा करतो; मात्र तेवढ्याच प्रमाणात धर्मद्रोही मंडळी त्यालाही आडकाठी घालायचा प्रयत्न करतात. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अनेक खेटे घातल्यावर अनुमती मिळते. त्यानंतरही रस्त्यावरच मंडप घातला, ध्वनीप्रदूषण केले, अशी अनेक कारणे देऊन हिंदूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी जेव्हा आपण श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करायला जातो, तेव्हा धर्मद्रोही मंडळीकडून ‘पाणी प्रदूषित करू नका’, ‘मूर्तीदान करा’ इत्यादी आवाहने केली जातात. अनेक शतकांपासून श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करायची परंपरा आहे. ‘आयआयटी’सारख्या कित्येक मोठ्या संस्था आणि पर्यावरणतज्ञ यांनी मान्य केले की, शाडूची मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित केल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही. असे असतांनाही मागील काही वर्षांपासून ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन करूच नये’, यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न केले जातात. यात पर्यावरणवादी पुढे असतातच. अनेक राजकीय पुढारीही त्यांना साथ देतात. धर्मद्रोह्यांच्या नादी लागून या पुढार्यांकडून जागोजागी विसर्जनासाठी हौद बांधले जातात. घरोघरी जाऊन श्री गणेशमूर्ती मिळवल्या जातात आणि धर्मशिक्षण नसलेले हिंदू याला बळी पडून त्यांची मूर्ती दान करतात. ज्या गणरायाची १० दिवस भावपूर्ण पूजा केली, त्या गणरायालाच धर्मद्रोह्यांच्या स्वाधीन केले जाते. त्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, धर्मद्रोही या मूर्ती विधीवत् विसर्जित करतात का ? त्यांची विटंबना तर केली जात नसेल ना ? कि दुसर्या वर्षी त्याच मूर्ती पुन्हा विकल्या जातात ?
१ ऊ. पितृ पंधरवडा (पितृपक्ष) : पितृ पंधरवड्यात हिंदू त्यांच्या पूर्वजांना श्रद्धेने विधीपूर्वक जेवू घालतात आणि श्राद्धकर्म करतात. या १५ दिवसांमध्ये पुरोगामी होईल तेवढी हिंदूंची हेटाळणी करतात आणि यातही आडकाठी आणतात. ते ‘कावळ्याला अन्न देऊन वाया घालवण्यापेक्षा अनाथ आणि गरीब मुलांना वह्या-पुस्तके द्या’, असे सुचवतात. त्यामुळे अनेक जन्महिंदू वृद्धाश्रम आदी ठिकाणी जाऊन पैसे देतात. जेव्हा क्रूरकर्मा औरंगजेब त्याच्या बापाला, म्हणजे शहाजहानला कारागृहात ठेवतो आणि त्याचे अन्न-पाणी बंद करतो, तेव्हा तो औरंगजेबाला पत्रात लिहितो की, बघ, हिंदु मुले मेल्यावरही त्यांच्या बापाला अन्न-पाणी देतात. तू तर मी जिवंत असतांना ते बंद केले. याची इतिहासात नोंद आहे. (हिंदूंचा गौरव होईल, असा भाग शिकवला जात नाही.)
१ ए. नवरात्रोत्सव आणि दसरा : आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून १० दिवस सर्वत्र शक्तीची आणि देवीची उपासना केली जाते. या वेळीही गणेशोत्सवाप्रमाणेच विविध प्रकारच्या अडचणी निर्माण केल्या जातात. बंगालमध्ये आश्विन मासात मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजा आणि दिवाळीमध्ये कालीमातेची पूजा केली जाते; पण हिंदूंना हे दोन्ही सण व्यवस्थितरित्या साजरे करू दिले जात नाहीत. तेथे देवीच्या विसर्जनावरही बंदी घातली जाते. या उत्सवाच्या काळात धर्मांधांचे सण आले, तर देवीचे विसर्जन थोपवून धरले जाते.
१ ऐ. दिवाळी : दिवाळीमध्ये सर्वत्र दिवे, पणत्या लावून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. (सनातन संस्थेसारख्या अनेक धार्मिक संस्थांनी प्रारंभीपासूनच फटाक्यांना विरोध दर्शवला आहे.) या फटाक्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये अनेक याचिका प्रविष्ट केल्या जातात. तेव्हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की, हिंदूंच्या प्रत्येक सणाला काही ना काही कारण काढून विरोध का केला जातो ? अशा प्रकारे इतर पंथियांच्या सणाला विरोध होतो का ? त्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालये काही निर्णय घेतात का ? समजा, काही निर्णय घेतलाच, तर त्या आदेशाची कार्यवाही झालेली दिसते का ? उदाहरणार्थ
१. प्रतापगडावरील अफझलखानाची कबर काढून टाकण्याचा उच्च आणि सर्वोच्च न्यायालये यांचा आदेश असतांना ती काढून टाकली गेली का ?
२. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यावर बंदी असतांना मशिदींमधून होणारी पहाटेची अजान बंद झाली का ?
२. निवडणुकांच्या वेळी कुणीही न्यायालयात न जाणे; पण कावड यात्रेवर बंदी घालण्यासाठी न्यायालयाने स्वतःहून याचिका प्रविष्ट करून घेणे, हे आश्चर्यजनक !
कोरोनाच्या निमित्ताने एप्रिल मासात झालेल्या कुंभमेळ्यावर अनेक बंधने घालण्यात आली. अनेकांनी कुंभमेळ्याला विरोध केला; परंतु त्याच काळात बंगाल, बिहार, केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या वेळी सहस्रो आणि लाखोंच्या संख्येत सभा घेण्यात आल्या; परंतु तेव्हा कोरोनाची भीती नाही वाटली ! या निवडणुकांच्या विरोधात कुणीही न्यायालयात गेले नाही, ना न्यायालयाने ‘सुमोटो’ (न्यायालयाने स्वतःहून प्रविष्ट करून घेतलेली याचिका) याचिका प्रविष्ट करून घेतली. हेच न्यायालय कावड यात्रेवर बंदी घालण्यासाठी ‘सुमोटो’ याचिका प्रविष्ट करून घेते, हे आश्चर्यच आहे.
३. कोरोनाच्या निमित्ताने हिंदूंच्या सणांवर बंदी घालणार्या केरळ सरकारने बकरी ईदच्या वेळी मात्र ३ दिवस दळणवळण बंदी उठवणे
जेथे कोरोनाच्या निमित्ताने हिंदूंच्या उत्सवांवर बंदी घातली जाते, तेथे मुसलमानांना बकरी ईद साजरी करायला ३ दिवस कोरोनाचे निर्बंध हटवून अनुमती दिली जाते. त्यासाठी ३ दिवस दळणवळणबंदी उठवण्यात आली. या निर्णयाविरुद्ध प्रविष्ट केलेली याचिका ही बंदी उठवण्याच्या दुसर्या दिवशी सुनावणीला आली. केरळ सरकारला म्हणणे मांडायला मुदत दिली गेली. स्थगिती नाही कि तंबी नाही. तिसर्या दिवशी याचिका न्यायालयात सुनावणीला आली. ३ दिवसांची मर्यादा संपत आली होती; कदाचित् असेल न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. केरळ सरकारला ५० लाख रुपयांचा दंड लावला असता तर ? सरकारने पुन्हा धर्मांधांचे लांगूलचालन करतांना विचार केला असता. त्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला दंड केला असता, तर पुढच्या वर्षी तरी असा निर्णय घेण्याचे सरकारचे धाडस झाले नसते. या सर्व प्रकरणात न्यायालयाविषयीचा आदर ठेवून इतकेच म्हणावेसे वाटते, ‘धर्मांधांचा विषय आला की, न्यायालय सावध भूमिका घेते’, असे हिंदूंना वाटले, तर ते चुकीचे होईल का ?
४. विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करणे
अ. काही दिवसांपूर्वी ‘करवा चौथ’ हा सण होऊन गेला. तेव्हा जाणीवपूर्वक विज्ञापनामध्ये समलिंगी लोक दाखवून हिंदूंना अपमानित केले गेले. जागृत हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे त्या आस्थापनाला विज्ञापन मागे घ्यावे लागले; परंतु न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी महिलांच्या एका कार्यक्रमात याचा उल्लेख केला. पुढे समलिंगी संबंधाविषयीही ते बोलले. हे अनावश्यक आहे. त्यामुळे ‘आपल्याला न्यायमूर्तींचा पाठिंबा आहे’, असे धर्मद्रोह्यांना वाटू शकते. अशाने हिंदूंना जाणीवपूर्वक डिवचणार्यांना प्रोत्साहन मिळते.
आ. या घटनेनंतर काही दिवसांनी मंगळसूत्राविषयीचे विज्ञापन आले. त्यात मंगळसूत्र घातलेल्या एका अर्धनग्न स्त्रीसमवेत अर्धनग्न पुरुष दाखवण्यात आला. हे जाणीवपूर्वक करण्यात येत नाही का ? एवढ्या पवित्र गोष्टीतही यांना अशी अश्लीलता कशी सुचते ? अशी विज्ञापने किंवा खोड्या धर्मांधांच्या सणाच्या वेळी केल्या जातात का ?
५. हिंदूंवरील अत्याचारांच्या वेळी न्यायमूर्ती बोलत का नाहीत ?
क्रिकेट खेळात पाकिस्तान जिंकल्यावर भारतातील धर्मांधांनी फटाके फोडले; म्हणून काही ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. यावर निवृत्त झालेले न्यायमूर्ती दीपक गुप्ता म्हणतात, ‘येथे राजद्रोह सिद्ध होत नाही !’ बरं, हे न्यायमूर्ती निवृत्तीच्या वेळी मोघमपणे म्हणाले होते, ‘मला सर्वोच्च न्यायालयात कामच करू दिले नाही.’ मग पदावर असतांना त्यांना कोण काम करू देत नव्हते ? तेव्हाच ते त्यांच्या विरुद्ध का बोलले नाही ? त्यांच्यापेक्षा न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा चांगल्या. त्या निवृतीच्या वेळी म्हणाल्या, ‘‘मी केलेल्या कामाविषयी समाधानी आहे.’’ न्यायमूर्ती चंद्रचूड आणि निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता हे बांगलादेशात झालेल्या अत्याचारांविषयी आणि त्रिपुरातील हिंदूंवरील आक्रमणाविषयी बोलतात का ? काही दिवसांपूर्वी घरात पूजेच्या वेळी शंख वाजवला; म्हणून एका हिंदूला त्याच्या धर्मांध शेजार्यांनी बेदम मारहाण केली. तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड आणि निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता बोलले का ?
६. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे, हाच एकमात्र पर्याय !
हिंदूंचे दुर्दैव आहे की, जेव्हा हिंदूंना अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा पोलीस, प्रशासन (किंवा न्यायालय ?) हिंदूंची बाजू घेत नाहीत. याउलट धर्मांधांना साहाय्य होईल, अशीच त्यांची कृती आणि निर्णय असतात. यावर हिंदूंची मोठ्या प्रमाणावर जागृती करणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आपले आध्यात्मिक बळ वाढवणे, हा एकच पर्याय आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु !’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (३.११.२०२१)