केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी
|
नवी देहली – केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. धार्मिक स्थळांचा वापर करून पंजाबमधील वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ईशनिंदेसारख्या घटनांमुळे पंजाबमधील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असे सरकारने म्हटले आहे. यानंतर सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाबमध्ये अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात, तसेच कपुरथळा येथे गुरुद्वारामध्ये विटंबना करण्याच्या दोन घटना घडल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या सूचना केल्या आहेत. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये गुरु ग्रंथ साहिबचा (शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा) अवमान करण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला, तर कपुरथळा येथे शिखांच्या पवित्र ध्वजाची विटंबना करणार्या तरुणाची स्थानिक गावकर्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला.
केंद्र सरकार ने भेजा पंजाब सरकार को अलर्ट, राज्य के सभी धार्मिक स्थलों की सुरक्षा बढ़ाने के निर्देशhttps://t.co/rU3Qrro8Ii
— India TV Hindi (@IndiaTVHindi) December 20, 2021
पंजाबचे आतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी सर्व पोलीस आयुक्त आणि साहाय्यक पोलीस अधीक्षक यांना मंदिरांची सुरक्षा भक्कम करण्यासाठी एक योजना पाठवली आहे. सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षाव्यवस्था कडक करावी. काही अनियमितता आढळल्यास त्वरित कडक कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत.