गोवा मुक्तीचा षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळा साजरा
लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) – लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणखी थोडा काळ जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता, असे महत्त्वपूर्ण विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात आयोजित केलेल्या गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केले. भारत स्वतंत्र होऊन तब्बल १४ वर्षांनी म्हणजे १९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या अत्याचारातून मुक्त झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केले. या वेळी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रीमंडळातील मंत्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘भारतावर मोगल राज्य करत असतांना गोवा पोर्तुगालच्या राजवटीखाली आले; मात्र पोर्तुगिजांच्या जोखडात शेकडो वर्षे राहूनही गोमंतकीय नागरिक भारतीयत्व विसरले नाहीत किंवा भारतालाही गोव्याचे विस्मरण झाले नाही. (पोर्तुगीजधार्जिणे गोमंतकीय भारतीयत्व विसरले होते. असे धर्मांतरित गोमंतकीय अजूनही आहेत. त्याचप्रमाणे भारतातील काँग्रेसवाल्यांना गोव्याचे विस्मरण झाले होते. – संपादक) गोवा मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले आहे. संपूर्ण देश गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहिला आणि येथील हुतात्मा स्मारके, हे याचे प्रतीक आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गोव्याचे कौतुक !
गोव्याचे कौतुक करतांना मोदी म्हणाले, ‘‘सुशासनात गोवा राज्य सध्या अग्रेसर आहे. खुल्या जागेत शौच न करणे, प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, मुलींसाठी शाळा, जन्मनोंदणी करणे, पात्र लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आदी अनेक उपक्रमांमध्ये गोवा राज्याला १०० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सुशासन, दरडोई उत्पन्न आदी गोष्टींतही अव्वल आहे. यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अन्य मंत्री आणि गोमंतकीय नागरिक अभिनंदनास पात्र आहेत. गोव्यातील लोक किती प्रामाणिक, प्रतिभावान आणि कष्टाळू आहेत, हे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तीरेखेतून देशाने पाहिले आहे. राज्याच्या विकासासाठी आणि आपल्या लोकांप्रती शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ कसे राहू शकतो, हे स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या जीवनातून सर्वांना शिकवले आहे.
‘India saw Goans’ sincerity in Parrikar’s commitment’https://t.co/zAP5woiagX
via NaMo App pic.twitter.com/o9f1vBjktJ
— narendramodi_in (@narendramodi_in) December 20, 2021
स्व. मनोहर पर्रीकर यांनी चालू केलेला विकासाचा वेग विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायम ठेवला आहे. सध्याच्या युवकांची मोठी स्वप्ने आहेत आणि यासाठी व्यापक दृष्टी असलेले सरकार असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार असे व्यापक दृष्टी असलेले सरकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले.
या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आम्हाला गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवासाठी ३०० कोटी रुपये मिळाले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना आम्ही पारदर्शी पद्धतीने राबवली आहे. गोव्याचा पायाभूत विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणोक्षणी साहाय्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवभारत निर्मितीसाठी मी जनतेसमवेत सातत्याने काम करत रहाणार आहे.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील काही अन्य महत्त्वाची सूत्रे
१. गोव्याला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्षे स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे पोर्तुगालमध्ये कारावासात होते. या सूत्राचा भाजपचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपयी यांनी पाठपुरावा केला, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सहस्रोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. लोकांना बसण्यासाठी आयोजकांना अतिरिक्त मंडप घालून सोय करावी लागली.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या प्रारंभी कोकणी भाषेतून गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.