घणसोली येथे शाळेत १८ विद्यार्थी कोरोनाबाधित !
२६ डिसेंबरपर्यंत शाळा बंद
नवी मुंबई – घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत १८ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून त्यांना उपचारासाठी वाशी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. १८ डिसेंबर या दिवशी ही घटना उघडकीस आली. कोरोनाबाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. ज्या विद्यार्थ्यामुळे इतर विद्यार्थी कोरोनाबाधित झाले, त्याच्या जिनोम सिक्वेन्स चाचणीचा अहवाल अद्याप आला नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित विद्यार्थी हे इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या वर्गातील आहेत. या शाळेतील इयत्ता ११ वीत शिकणार्या एका विद्यार्थ्याचे वडील कतार येथून परतले होते. त्या वेळी घरातील सदस्यांची कोरोनाची चाचणी केली असता मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आणि अन्य सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली. तत्पूर्वी हा विद्यार्थी शाळेत आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वच विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १८ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी २६ डिसेंबरपर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक आर्.बी. जाधव यांनी दिली.