अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत ! – रामदास कदम, शिवसेना
मुंबई – माझ्या मुलाचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी अनिल परब मागील ३ दिवस दापोलीत प्रचार करत आहेत. अनिल परब यांची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याप्रमाणे आहे. अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील नेते रामदास कदम यांनी १८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.
या वेळी रामदास कदम म्हणाले, ‘‘आम्ही कधीही शिवसेनेच्या विरोधात काम करणार नाही. मी शिवसेनेतून कधीच बाहेर पडणार नाही. माझी मुले निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मला पक्षातून काढले, तरी मी शिवसैनिक म्हणून जगेन. मी भगव्याशी प्रामाणिक आहे. मागील २ वर्षांत मी मातोश्रीवर गेलो नाही. मी भाजपमध्ये जात आहे, अशा बातम्या छापून आणल्या गेल्या. उद्धवजींशी बोलून मी निर्णय घेईन.’’
याविषयी पक्षप्रमुख निर्णय घेतील ! – अनिल परब, परिवहनमंत्री
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाविषयी पत्रकारांनी अनिल परब यांना विचारले असता ‘मी शिवसैनिक आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांविषयी मी पक्षप्रमुखांशी बोलेन. तेच निर्णय घेतील’, असे म्हटले.