फलटण (जिल्हा सातारा) येथील प्रांताधिकार्यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याची धमकी !
वाळू माफियांचा उद्दामपणा कुणाच्या तरी जिवावर बेतण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. प्रांताधिकार्यांना मिळालेली धमकी संतापजनक आणि चिंताजनक आहे. – संपादक
सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – फलटण (जिल्हा सातारा) शहरातील गिरवी नाका येथून वाळू घेऊन जाणारा ट्रक प्रांताधिकारी यांनी अडवून त्याच्यावर कारवाई केली. तेव्हा प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना धक्काबुक्की करत जिवंत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रांताधिकार्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता एक बैठक संपवून प्रांताधिकारी आणि त्यांचे सहकारी यांना गिरवी नाका येथून वाळू घेऊन जाणारा ट्रक दिसला. त्यांनी ट्रक अडवून चालक कैलास महादेव ननावरे यांना कागदपत्रे आणि अन्य माहिती मागितली असता त्यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १७ डिसेंबर या दिवशी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले, तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याविषयी फलटणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये महसूल कर्मचारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ‘महा ई सेवा’ केंद्र कर्मचारी आदी सहभागी झाले होते. (वाळू माफियांकडून धक्काबुक्की होणे आणि ‘काम बंद’ आंदोलन करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणे याचा काय संबंध ? महसूल विभागातील कर्मचारी यांनी सामान्य नागरिकांची गैरसोय टाळून न्यायासाठी योग्य ठिकाणी दाद मागणे जनतेला अपेक्षित आहे. – संपादक)