अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सनातनच्या ‘३५० व्या ग्रंथा’च्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
‘एकदा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले एका सत्संगात म्हणाले होते, ‘सर्वसामान्य साधकाने लोकांना अध्यात्माविषयी बुद्धीच्या स्तरावर कितीही पटवून सांगितले, तरी त्याचा लोकांवर परिणाम व्हायला वेळ लागतो; परंतु संतांनी एक वाक्य जरी सांगितले, तरी त्यांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे लोकांच्या अंतर्मनावर संस्कार होऊन त्यांच्यावर लवकर परिणाम होतो.’ सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भातही हेच तत्त्व लागू होते; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अत्युच्च कोटीतील संत सनातनचे ग्रंथ संकलित करत असल्याने ते ग्रंथ म्हणजे साक्षात् चैतन्याचे स्रोतच आहेत. सनातनचे ग्रंथ अनेक अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे अद्वितीय ठरत आहेत. ग्रंथांच्या या वैशिष्ट्यांमुळे अध्यात्मातील जिज्ञासूंसाठी ज्ञानाचे एक अभिनव दालनच निर्माण झाले आहे. हे ग्रंथ विविध साधनामार्गांतील साधकांसाठी दीपस्तंभही ठरत आहेत.
वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. अजून ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे. सप्टेंबर २०२१ पासून सनातन संस्था राबवत असलेल्या ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातनच्या ग्रंथांचा भारतभर व्यापक प्रमाणावर प्रसार केला जात आहे. या अभियानाला सर्वत्रच उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसादही लाभत आहे. या अभियानाच्या अंतर्गत अवघ्या ३ मासांतच मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ३,५८,९८० ग्रंथांची विक्री झाली आहे ! हे अभियान चालू असतांनाच सनातनचा ३५० वा ग्रंथ प्रकाशित होणे, हा दुग्धशर्करायोगच आहे.
सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृताच्या आधारे साधना करून नोव्हेंबर २०२१ पर्यंत ११५ साधकांनी ‘संतपद’ प्राप्त केले आहे आणि १ सहस्राहून अधिक साधक ‘संतपदा’च्या दिशेने वाटचाल करत आहेत. ‘ईश्वरी नियोजनानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि नंतर अनंत काळ सनातनचे ग्रंथ वेदांसारखे ‘धर्मग्रंथ’ म्हणून मान्यता पावतील’, असा आशीर्वाद ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’द्वारे महर्षींनी दिला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या दैदीप्यमान ग्रंथकार्याचा संपूर्ण भारतवर्षालाच अभिमान वाटला पाहिजे.
‘अखिल मानवजातीला या ज्ञानगंगेत न्हाऊन निघून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेता यावे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक
(१५.१२.२०२१)
१. गुरूंच्या आशीर्वादाने परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथकार्याचा आरंभ !
‘वर्ष १९८७ मध्ये मी अध्यात्मावर लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्र’ हा चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) ग्रंथ माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना आवडला. ते मला म्हणाले, ‘‘माझ्या गुरूंनी मला आशीर्वाद दिला होता, ‘तू किताबों के उपर किताबे लिखेगा ।’
मी भजनाचे एकच पुस्तक लिहिले. माझ्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला देतो.’’ या आशीर्वादाचीच फलश्रुती म्हणून माझ्याकडून आजपर्यंत अध्यात्म, साधना, ईश्वरप्राप्तीसाठी कला, धर्मजागृती इत्यादी विषयांवरील ग्रंथ संकलित झाले आहेत. प.पू. बाबांच्या कृपेने हे कार्य पुढील काही पिढ्या चालू रहाण्यासाठी आवश्यक असे साधक प.पू. बाबांच्याच आशीर्वादाने सिद्ध होत आहेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले (१३.६.२०२१)
‘गुरूंचा आशीर्वाद फलद्रूप होण्यासाठी शिष्यामध्ये ‘गुरूंविषयी दृढ श्रद्धा, गुरुचरणी समर्पित भाव, आज्ञाधारकपणा, लोककल्याणाची तीव्र तळमळ, गुरुकार्यातील निःस्वार्थता’ इत्यादी गुण असावे लागतात. परात्पर गुरु डॉक्टर हे अशा आदर्श शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत; म्हणूनच केवळ २६ वर्षांमध्ये सनातनच्या प्रकाशित झालेल्या ग्रंथांची संख्या ३५० झाली आहे !’ – (पू.) संदीप आळशी
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी शून्यातून निर्माण केलेले ग्रंथकार्य !
‘सनातनचे ग्रंथनिर्मितीचे कार्य आरंभ झाले, ते एका साधकाने अर्पण केलेल्या एका साध्या क्षमतेच्या संगणकावर ! सनातन संस्थेच्या आरंभीच्या कार्यकाळात परात्पर गुरु डॉक्टरांनी मुंबईतील स्वतःचे रहाते घर ‘सेवाकेंद्र’ म्हणून वापरायला दिल्याने आणि तेथे साधकांच्या निवास-भोजनाची सोय केल्याने तेथे ग्रंथकार्याचा आरंभ होऊ शकला. त्या काळात ग्रंथांच्या मुद्रणासाठी येणारा व्यय (खर्च) परात्पर गुरु डॉक्टर स्वतः करत असत. काही वेळा ग्रंथांची छपाई करण्यासाठी पैसेही नसायचे; पण लगेच कुठूनतरी अर्पणनिधी यायचा अन् ग्रंथछपाईची सोय व्हायची. प्रारंभी परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच ग्रंथांसाठी लेखन, संकलन, मुद्रितशोधन इत्यादी सर्व करायचे. त्यानंतर त्यांनी हळूहळू ग्रंथसेवा करणार्या साधकांनाही व्याकरणाचे साधे साधे नियम शिकवण्यापासून ‘सात्त्विकतेच्या दृष्टीने ग्रंथ कसा सिद्ध करायचा’, हे शिकवण्यापर्यंत अविरत परिश्रम घेतले. याचीच फलश्रुती म्हणजे, ग्रंथनिर्मितीचे कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेताही आज अनेक साधक चांगल्या प्रकारे ग्रंथसेवा करू शकत आहेत !
‘गुरु सर्व करतीलच’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या दृढ श्रद्धेमुळेच ग्रंथकार्य आजपर्यंत संपन्न झाले आहे आणि पुढेही होत राहील !’
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथकार्याची व्याप्ती !
३ अ. विपुल आणि बहुभाषिक ग्रंथसंपदा ! : जगाच्या पाठीवर आतापर्यंत काही संतांचेच ‘अध्यात्म’ या विषयावरील काही ग्रंथ काही भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याउलट परात्पर गुरु डॉक्टरांचे अवघ्या २६ वर्षांत (नोव्हेंबर २०२१ पर्यंत) विविध विषयांवर ३५० ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. यांतील काही ग्रंथांच्या मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, इंग्रजी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ८३ लाख ५८ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर अजूनही ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित करता येतील, एवढे लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांनी संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवलेले आहे !
३ आ. बहुविध विषयांवरील ग्रंथसंपदा ! : परात्पर गुरु डॉक्टरांनी केवळ ‘अध्यात्म’ या एकाच विषयावरील नव्हे, तर हिंदु धर्म, संस्कृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, राष्ट्र, बालसंस्कार, आध्यात्मिक स्तरावरील उपाय, आपत्काळातील जीवितरक्षण यांसारख्या विविध विषयांवर ग्रंथ संकलित केले आहेत.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथकार्याची ठळक अंगे !
४ अ. सर्व स्तरांवरील जिज्ञासूंसाठी लाभदायक असणारे ग्रंथ ! : ‘सर्वसाधारण लेखकांचे अध्यात्मावरील ग्रंथ सर्वसाधारण व्यक्तींसाठी असतात. त्यामध्ये मानसिक आणि बौद्धिक स्तरावर अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ हे आध्यात्मिक स्तरावर असून ते अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांविषयी शास्त्रीय परिभाषेत मार्गदर्शन करणारे आहेत. ते अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आहेत. त्यामुळे अध्यात्मातील सर्व स्तरांवरील जिज्ञासूंना या ग्रंथांचा लाभ होत आहे. विविधांगी विषयांवर ग्रंथ असल्याने या माध्यमातून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळू शकतात.
४ आ. विविध साधनामार्गांतील साधकांना मार्गदर्शन करणारे ग्रंथ ! : बहुतेक संतांचा त्यांच्या संप्रदायातील साधनामार्गाचा अभ्यास असतो. ते त्यावर आधारित काही ग्रंथही लिहितात. अशा ग्रंथांमुळे केवळ त्यांच्या साधनामार्गातील साधकांना मार्गदर्शन होते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे विविध साधनामार्गांतील, उदा. नामसंकीर्तनयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांसारख्या विविध साधनामार्गांतील साधकांना त्यांच्या साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. या समवेत ते विविध कलांच्या माध्यमातून, उदा. संगीतकला, चित्रकला इत्यादी माध्यमांतून साधना करणार्या साधकांनाही मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांतील साधकांची आध्यात्मिक प्रगतीही होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा विविध साधनामार्गांशी संबंधित ग्रंथही संकलित केले आहेत.
४ इ. अन्य संप्रदाय किंवा संस्था यांच्या संतांविषयीही ग्रंथ ! : परात्पर गुरु डॉक्टर अन्य संप्रदाय किंवा संस्था यांच्या संतांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण साधना, कार्य किंवा त्यांची शिकवण समाजाला कळण्यासाठीही ग्रंथ संकलित करतात. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायपद्धती शिकवणारे श्री मलंगशाहबाबा, संख्याशास्त्राचे थोर अधिकारी प.पू. भाऊ मसूरकर, सिद्धींचे अद्भुत सामर्थ्य असणारे प.पू. शामराव महाराज, कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन अशा काही संतांचे ग्रंथ परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केले आहेत.
४ ई. समाज, राष्ट्र अन् धर्म यांची दुःस्थिती पालटण्यासाठी मार्गदर्शक ग्रंथ ! : सध्या कलियुगांतर्गत कलियुग चालू आहे. या कलियुगात धर्म आणि संस्कृती यांची होणारी पायमल्ली, धर्मद्रोह, भ्रष्टाचार आदी समस्या शिगेला पोचल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला सुखकर जीवन जगणेही जेथे कठीण झाले आहे, तेथे निश्चिंत मनाने साधना करणे दूरच ! समाज, राष्ट्र अन् धर्म यांची ही दुःस्थिती पालटण्यासाठी वैध मार्गाने ‘हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य, म्हणजे ईश्वरी राज्य)’ स्थापन करणे, हाच एकमात्र उपाय ठरतो. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार आवश्यक समष्टी साधनाच आहे. यासंदर्भात समाजाला मार्गदर्शन होऊन तो कृतीशील होण्यासाठी ग्रंथ लिहिणारे परात्पर गुरु डॉक्टर हे एकमेवच आहेत !’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) संदीप आळशी, (सनातनच्या ग्रंथांचे संकलक)
(२४.४.२०२१)