धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !
आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन
मुंबई, १८ डिसेंबर (वार्ता.) – धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय’ अथवा ‘चॅरिटेबल’ हा शब्द नमूद करण्यास तसेच तो प्रसिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. याविषयी आरोग्य साहाय्य समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली असता, काही रुग्णालयांकडून वरील आदेशानुसार कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांत धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहे.
धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. काही धर्मादाय रुग्णालयांनी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शासनाकडून वेळोवेळी लागू केलेल्या विविध योजनांची माहिती देणारे (धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटांची संख्या, सवलतीच्या दरात मिळणार्या आरोग्य सुविधा इत्यादींचे) प्रसिद्धी फलक लावले नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
२. जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय’ अथवा ‘चॅरिटेबल’ असा उल्लेख करण्याविषयीची पूर्तता त्वरित व्हावी आणि त्याची पूर्तता झाल्याचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी ‘बाँबे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट’च्या कलम ४१ ‘अ’ आणि ४१ ‘ड’ खाली आदेश देण्यात यावेत.
३. सदर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असून शासनाकडून वेळोवेळी घोषित केलेल्या आरोग्य योजना त्या रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत, याची प्रसिद्धी करण्याचेही आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात यावेत, जेणेकरून सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ मिळेल.