देहलीतील रोहिणी न्यायालयातील बाँबस्फोटाच्या प्रकरणी ‘डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’च्या शास्त्रज्ञाला अटक !

अधिवक्त्याशी झालेल्या वादातून त्याला ठार मारण्यासाठी ठेवला होता बाँब !

सैन्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार्‍या ‘डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’मध्ये कार्यरत असलेला शास्त्रज्ञ जर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असेल, तर ते समाजासाठी धोकादायक ! – संपादक

नवी देहली – येथील रोहिणी न्यायालयात ९ डिसेंबरला झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी एका शास्त्रज्ञाला अटक केली आहे. त्यानेच ‘कोर्ट क्रमांक १०२’ मध्ये बाँब ठेवला होता. भारत भूषण कटारिया असे या शास्त्रज्ञाचे नाव असून तो ४७ वर्षांचा आहे.‘डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’मध्ये (डी.आर्.डी.ओ. अर्थात् संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये) तो ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञाचा त्याच्या शेजारी रहाणार्‍या एका अधिवक्त्याशी वाद झाला होता आणि त्याला ठार करण्यासाठी त्याने हा बाँब ठेवला होता, असे अन्वेषणातून समोर आले आहे. पोलिसांना या शास्त्रज्ञाच्या विरोधात अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यानंतरच त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तो एकटाच सहभागी होता, असे समोर आले आहे.