फिरोजपूर (पंजाब) येथे सीमा सुरक्षा दलाने पाकमधून आलेले ड्रोन पाडले !

चंडीगड – पंजाबच्या फिरोजपूर येथील पाक सीमा क्षेत्रामध्ये अल्प उंचीवरून उडणार्‍या एका ड्रोनला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी खाली पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे होते. त्याला खाली पाडण्यात आल्यानंतर आता त्याविषयी अन्वेषण केले जात आहे. यापूर्वी पाकिस्तानकडून ड्रोनच्या साहाय्याने सीमेवर भारताच्या हालचालींकडे लक्ष ठेवणे, अमली पदार्थांची तस्करी करणे, तसेच खलिस्तान्यांना शस्त्रसाठा पाठवणे, यांसाठी केला गेला आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडून काँग्रेस सरकारवर टीका

नवज्योतसिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांना पंजाबला त्रास न देण्याविषयी सांगावे !

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह

राज्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करून राज्यातील सरकारवर टीका करतांना म्हटले आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिवसभर भांगडा करण्यापेक्षा त्यांच्या गृहमंत्र्यांना सल्ला दिला पाहिजे की, त्यांनी सक्रीय व्हावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना (नवज्योतसिंह सिद्धू यांना) (जर ते तुमचे बोलणे ऐकत असतील, तर) सांगितले पाहिजे की, तुमचा मोठा भाऊ इम्रान खान यांना सांगावे की, सीमावर्ती पंजाब राज्याला त्रास देणे बंद करावे. पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू आहेत. त्यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना ‘मोठा भाऊ’ म्हटले आहे.