स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर, तर २७ टक्के जागांसाठी १८ जानेवारी या दिवशी निवडणूक होणार !
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर या दिवशी, तर २७ टक्के जागांसाठी १८ जानेवारी २०२२ या दिवशी निवडणूक घेण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली. ज्या २७ टक्के जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव होत्या, त्यांवरील आरक्षण उठवून सर्वसाधारण प्रवर्गातून तेथे निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.
सर्व जागांसाठीची मतमोजणी १९ जानेवारी २०२२ या दिवशी होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या आधीच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व निवडणूक २१ डिसेंबर या दिवशी घेण्याचे घोषित केले होते. यामध्ये २७ टक्के जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव होत्या; मात्र सर्वाेच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय समाजाची सर्वंकष माहिती सादर करण्याचा आदेश दिला आहे. ती आल्यानंतरच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयीचा निर्णय न्यायालयात होईल. सर्वंकष माहिती गोळा करण्यासाठी न्यायालयाने ३ मासांची समयमर्यादा दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून ही माहिती घेण्यात येईल.