आणखी ११ एस्.टी. कर्मचारी बडतर्फ, संपकरी ठाम !

२२ डिसेंबर या दिवशी मंत्रालयावर मोर्चा

मुंबई – विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या आणखी ११ कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बडतर्फ केले आहे. आतापर्यंत २२ कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. संघर्ष एस्.टी. कामगार युनियनने विलीनीकरणाच्या मागणीसाठी २२ डिसेंबर या दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे घोषित केले आहे.

१६९ कर्मचार्‍यांना १६ डिसेंबर या दिवशी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित कर्मचार्‍यांची संख्या १० सहस्र ६५० झाली आहे. निलंबित कर्मचार्‍यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात येते; मात्र त्याला प्रतिसाद न देणार्‍या कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास महामंडळाने प्रारंभ केला आहे. १६ डिसेंबर या दिवशी महामंडळाच्या ३५ कर्मचार्‍यांना बडतर्फीची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. अशा प्रकारे नोटीस बजावलेल्यांची संख्या २९२ झाली आहे. रोजंदारीवरील एकूण २ सहस्र ५५ कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. २ सहस्र ७६४ कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.