मार्गशीर्ष मासातील (१९.१२.२०२१ ते २५.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘५.१२.२०२१ दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. २१.१२.२०२१ या दिवसापासून उत्तरायण चालू होणार आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. उत्तरायणारंभ : ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने असतात. २१ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत उत्तरायण काल असतो. या काळात सूर्य उत्तरेकडे झुकण्याचा काळ चालू होतो. उत्तरायणाला ‘देवांचा दिवस’ म्हणतात. उत्तरायण जप, तप आणि साधना यांसाठी अनुकूल असते. उत्तरायणकाळात शुभ कार्ये करतात. अयन पुण्यकाल २२.१२.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.
२ आ. मकरायण : २१.१२.२०२१ या दिवशी रात्री ९.२९ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) मकर राशीत प्रवेश करत आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २१.१२.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.५६ पासून २२.१२.२०२१ या दिवशी दुपारी ४.५३ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच २५.१२.२०२१ या दिवशी रात्री ८.१० पासून २६.१२.२०२१ या दिवशी सकाळी ८.१४ पर्यंत विष्टी
करण आहे.
२ ई. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’, असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २२.१२.२०२१ या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८.४८ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा, तसेच या दिवशी गणपति अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ उ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २२.१२.२०२१ या दिवशी उत्तररात्री १२.४५ पासून २३.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.२८ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ऊ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २२.१२.२०२१ या दिवशी बुधवार असून सायंकाळी ४.५३ पर्यंत तृतीया तिथी असल्याने
‘दग्धयोग’ आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – इष्टी, दग्धयोग, घबाड मुहूर्त आणि भद्रा (विष्टी करण) यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – बाजूला दिलेल्या सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.१२.२०२१)