भारतीय सैनिकांनी सातत्याने केलेल्या आक्रमणांमुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवणे
१९७१ च्या युद्धामध्ये भारताने पाकवर विजय मिळवल्याच्या घटनेला १२ डिसेंबर २०२१ या दिवशी ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने..
वर्ष १९७१ च्या लढाईमध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान !
‘वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने लढाई लढली. या युद्धात माझे ३ सैनिकी मित्र सुभेदार मेजर आणि ‘ऑननरी’ कॅप्टन जयराम मुळीक, सुभेदार मेजर अन् ऑननरी कॅप्टन दयानंद मांढरे आणि सुभेदार मेजर, तसेच ‘ऑननरी’ कॅप्टन विजयकुमार मोरे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पूर्व पाकिस्तानमध्ये (आताच्या बांगलादेशमध्ये) मार्च-एप्रिल मासामध्ये प्रचंड हिंसाचार झाला. १ कोटीहून अधिक लोक पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले. ४५ लाख लोकांना ठार मारण्यात आले. तेथे पाकिस्तान्यांनी बांगलादेशी लोकांचे शिरकाण करणे चालू केले होते.
त्या वेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, तर फिल्डमार्शल माणेक शॉ हे सैन्याचे प्रमुख होते. त्यांनी ६ मास युद्धाची सिद्धता केली. त्यानंतर ३ डिसेंबर १९७१ या दिवशी हे युद्ध चालू झाले. १२ डिसेंबर २०२१ या दिवशी या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.
१६ डिसेंबर या दिवशीच्या भागात आपण ‘युद्धाला ३ डिसेंबर या दिवशी प्रारंभ’ आणि ‘सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन विजयकुमार मोरे यांचे अनुभव’ पाहिले. आज सैनिकी मित्रांचे अनुभव पाहू.
(उत्तरार्ध)
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.
या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/535579.html
३. सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन दयानंद मांढरे
३ अ. पाचागडवर आक्रमण करण्यासाठी कमांड अधिकार्यांनी रेकी करण्यासाठी संबंधित सैनिकांना पाठवणे; पण ती व्यवस्थित न होणे : युद्ध चालू होण्यापूर्वी आमची ‘एम्.एम्.जी. प्लॅटून’ (एम्.एम्.जी. शस्त्र चालवणारा सैनिकांचा गट) आणि ‘मोर्टर प्लॅटून’ (गोळे हवेत उंच उडवणारी उखळी तोफ चालवणार्या सैनिकांचा गट) शत्रूवर गोळीबार करून त्यांना त्रस्त करायची. आम्ही त्यांना विश्रांतीच घेऊ द्यायचो नाही. त्यांच्यावर गोळीबार केला की, आम्ही ते ठिकाण सोडून परत यायचो. अशा प्रकारे आम्ही काही दिवस शत्रूला त्रास देण्याचे काम केले. त्यानंतर काही दिवसांनी आमच्या युनिटला पाचागडवर आक्रमण करण्याचा आदेश मिळाला. हे करण्यासाठी कमांड अधिकार्यांना रेकीची आवश्यकता होती. रेकीसाठी आपले रेकी प्लॅटून (रेकी करणार्या सैनिकांचा गट) जाऊन आले होते; परंतु शत्रूने गोळीबार न केल्यामुळे त्यांच्या ठिकाणाची रेकी व्यवस्थित झाली नाही.
३ आ. कमांडर मेजर कारखानीस यांच्या नेतृत्वाखाली पाचागडवर जाऊन सैनिकांनी गोळीबार करणे आणि त्यामुळे शत्रूचे ठिकाण कळणे : नंतर हे ध्येय (टास्क) आमच्या ‘अल्फा’ कंपनीला मिळाले. या प्लॅटूनला माझे ‘एम्एम् १’ विभाग जोडलेला होता. अल्फाचे कंपनी कमांडर मेजर कारखानीस आम्हाला दुपारच्या वेळी एका ठिकाणी घेऊन गेले. त्यांनी आम्हाला कमांड अधिकार्यांचा आदेश समजावून सांगितला. त्याप्रमाणे आम्हाला शत्रूच्या ठिकाणावर जाऊन गोळीबार करायचा होता. त्यासाठी शत्रूच्या ठिकाणाची माहिती मिळवणे आवश्यक होते. आम्ही कमांडर मेजर कारखानीस यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळच्या वेळी शत्रूच्या पाचागडवर धावा बोलल्याप्रमाणे गोळीबार केला. ‘मोठे आक्रमण झाले आहे’, असे वाटून शत्रूने त्यांचा संपूर्ण गोळीबार आमच्यावर डागला. त्यांनी सर्व तोफखानेही आमच्यावर सोडले. त्यामुळे आम्हाला शत्रूच्या मशीनगन आणि त्यांचे तोफखाने कुठे आहेत ? तसेच शत्रू किती परिसरात तैनात आहे ? यांविषयी संपूर्ण माहिती मिळाली. आमचे काम झाले होते. त्यानंतर आम्ही माघारी आलो आणि आमच्या प्रत्येक सैनिकाने तेथील सर्व माहिती कमांड अधिकार्यांना दिली. त्या आधारावर त्यांनी नियोजन केले.
३ इ. पाचागडच्या चौकीवर आक्रमण करण्याची सिद्धता करून ते आक्रमण पूर्ण करणे आणि त्यात एक सैनिक हुतात्मा होणे : २६ नोव्हेंबर या दिवशी सर्व युनिट्सनी सायंकाळी पाचागडवर आक्रमण करण्याची सिद्धता केली. ठरल्याप्रमाणे कारखानीससाहेबांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशी घोषणा दिली. या घोषणेला सर्व युनिटने एकत्र प्रतिसाद दिला आणि एकदम शत्रूवर आक्रमण केले. शत्रूच्या समोरच्या भागात तागाचे गोडाऊन होते. ते गोडाऊन कह्यात घेण्याचे ध्येय ‘अल्फा’ कंपनीला मिळाले आणि ते पूर्ण करण्याचे दायित्व प्लॅटून कमांडर दत्ता शिंदेसाहेब यांच्याकडे होते. ज्या वेळी आम्ही ‘शत्रूवर धावा’ असे बोललो, तेव्हा शत्रूच्या गोडाऊनमधून आमच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला; परंतु आम्ही अल्फा कंपनी आणि १ प्लॅटून यांनी त्याची पर्वा न करता शत्रूवर तुटून पडलो. त्यामुळे शत्रूचे सैनिक शस्त्रांसह गोडाऊनमधून पळून गेले. अशा पद्धतीने आम्ही गोडाऊन कह्यात घेतले. आमच्या डावीकडून ‘ब्राव्ह’ कंपनीचे काही प्लॅटून शत्रूच्या दिशेने आगेकूच करत होते. त्यांच्यातील ग्यानू आत्माराम चव्हाण हा सैनिक रात्रीच्या वेळी रांगत रांगत शत्रूच्या मशीनगनच्या बंकरजवळ गेला आणि त्याने स्वत:जवळील हॅन्ड ग्रेनेड फेकून बंकर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ते ग्रेनेड फुटले नाही. त्यामुळे शत्रूने सावध होऊन जवळच गोळीबार केला. त्यात ग्यानू आत्माराम चव्हाण हे हुतात्मा झाले. त्यानंतर शत्रूचे सैनिक बंकर सोडून पळून गेले. त्यांच्यावर आम्ही गोळीबार केला. अशा पद्धतीने दुसर्या दिवशी पाचागडच्या चौकीवर आक्रमण पूर्ण केले.
३ ई. शत्रूने उद्ध्वस्त केलेले पूल भारतीय सैन्याच्या अभियंत्यांनी जोडणे आणि कांतानगर पुलावर आक्रमण करण्यापूर्वी एक सैनिक हुतात्मा होणे : त्यानंतर आम्हाला ठाकूरगाव आणि बोदागाव या गावांच्या दिशेने आगेकूच करण्याचा आदेश मिळाला. त्याप्रमाणे आम्ही शत्रूवर गोळीबार करत आगेकूच चालू ठेवली. त्यामुळे आम्हाला शत्रूची ठिकाणे कळत गेली. आमची आगेकूच चालू असतांना शत्रूने नदीवरील सर्व पूल उद्ध्वस्त केले होते. अशा स्थितीत भारतीय सैन्याचे अभियंते त्वरित त्या ठिकाणी पोचून नदीवर लोखंडी पूल जोडायचे. त्यामुळे आमच्या वाहनांची वाहतूक सुरळीत होत होती. शत्रूने नदीवरील मोठमोठे पूलही उडवले होते. तेव्हा भारताच्या अभियंता रेजिमेंटने एका रात्रीत लोखंडी पूल जोडून उभे केले होते. त्यामुळे सैन्याला पुढे जाता आले. अशा पद्धतीने आमची घौडदौड चालू होती. कांतानगर पुलावर आक्रमण करण्यापूर्वी आमच्या अल्फा कंपनीला ‘रणगाड्यांसह जाऊन शत्रूच्या ठिकाणावर आक्रमण करायचे आणि परत यायचे’, हे ध्येय मिळाले. यात लान्सनायक तुकाराम करांडे हे शत्रूच्या आक्रमणात घायाळ झाल्याने हुतात्मा झाले.
३ उ. सहकारी सैनिकाचा मृतदेह पाहून सैनिकांचे मन हळवे होऊन त्यांना जेवण्याची इच्छा न होणे आणि अधिकार्यांनी समजावल्यावर सैनिक पुढच्या मोहिमेसाठी सिद्ध होणे : ही आमच्या ‘७ मराठा इन्फंट्री’च्या एम्.एम्.जी. विभागाची पहिली दुर्घटना होती. त्यामुळे तो आमच्यासाठी मोठा आघात होता. त्या दिवशी आमच्यासाठी जेवण आले होते; पण आमच्या एका सहकार्याचा मृतदेह समोर असल्याने आमची जेवण करण्याची इच्छा होत नव्हती. हे कमांडर मेजर कारखानीस यांनी पाहिले. त्यांनी आम्हाला समजावले की, ‘आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. इतके दु:ख मानून मन हळवे करायचे नाही.’ त्यानंतर आम्ही जेवण करून पुढच्या मोहिमेला सिद्ध झालो.
३ ऊ. कांतानगरवर भारतीय सैनिकांनी नदीच्या पात्रातून जाणे आणि त्याही स्थितीत केलेले आक्रमण यशस्वी होणे : आमचे दुसरे आक्रमण शत्रूच्या कांतानगरवर झाले. त्यावर आक्रमण करण्यासाठी आम्हाला नदीच्या पात्रातून जावे लागले. त्यामुळे आमच्या अंगावरील कपडे आणि शस्त्रे सर्व भिजली होती. हे आक्रमण दिवसाचे होते. त्यामुळे आमच्यावर शत्रूचा गोळीबार व्हायचा. आमचे कपडे भिजले असतांनाही आम्ही शेतीच्या बांधाचा आडोसा घेऊन शत्रूवर गोळीबार करायचो. त्यानंतर आमचे आक्रमण यशस्वी झाले. सर्वजण चिखलाने माखलेले होतो. आम्हाला अंघोळ करण्यासाठीही वेळ नव्हता. अशा स्थितीत आमच्या कमांडिंग अधिकार्यांच्या आदेशाने आम्ही आमचे सर्व कपडे गोळा करून नदीवर धुवायला पाठवले. १६ डिसेंबर या दिवशी युद्ध समाप्तीची घोषणा झाली. त्यानंतर आम्ही शत्रूच्या मुख्य ठिकाणावर थांबलो आणि त्यांची सर्व शस्त्रे गोळा करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी सर्व शस्त्रे जवळच्या तळ्यामध्ये टाकून दिली होती. भारतीय सैनिकांनी ती सर्व शस्त्रे तळ्यामध्ये उड्या मारून बाहेर काढली. अशा पद्धतीने आम्ही या युद्धाचा शेवट केला.
४. सुभेदार मेजर आणि ऑननरी कॅप्टन जयराम मुळीक
४ अ. पाचागडच्या लढाईमध्ये प्लॅटून कमांडर विष्णु पाटील बेपत्ता होणे आणि पुढे त्यांचा थांगपत्ता न लागणे : मी ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ मध्ये वर्ष १९६३ मध्ये सेवेत रुजू झालो आणि १९९० पर्यंत कर्तव्य बजावले. वर्ष १९७१ च्या युद्धामध्ये आमचे कर्नल बेडकेकर कमांडिंग अधिकारी होते. आम्ही नागालँडवरून पाचागडला रवाना झालो. त्यानंतर बागडोगरा येथे दोन दिवस प्रशिक्षण झाले. आम्ही पहिले आक्रमण २६ नोव्हेंबर या दिवशी पाचागडवर केले. त्या वेळी आमचे कंपनी कमांडर मेजर कारखानीस आणि प्लॅटून कमांडर विष्णु पाटील होते. आक्रमण झाल्यानंतर आमची बटालियन आणि आमचा संपर्क तुटला. त्यामुळे मेजर कारखानीस आणि २६ जण पाचागडच्या गोडाऊनच्या मागे लपून बसलो. पुढे एकत्र येऊन घौडदौड चालू ठेवली. या लढाईमध्ये आमचे प्लॅटून कमांडर विष्णु पाटील हे बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह मिळाला नाही आणि तेही सापडले नाहीत.
कांतानगर पुलावरील आक्रमणाच्या वेळी पाकिस्तानने जोरात आक्रमण केले. त्यात अनेक भारतीय सैनिक हुतात्मा झाले आणि काही जण घायाळ झाले. आमच्या सैनिकांनी त्यांचे काम पूर्ण केले आणि बागडोगरा येथे शस्त्रसंधी झाली.
५. सुभेदार मेजर विजयकुमार मोरे
५ अ. घायाळ झालेल्या सैनिकांना कॅप्टन डॉ. तांबे यांनी औषधोपचार करून बरे करणे आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना सरकारने सैन्यपदक देऊन सन्मानित करणे : आम्ही युद्धामध्ये घौडदौड करत होतो. तेव्हा आमचे अनेक सैनिकही पुष्कळ घायाळ होत होते. त्यांना परत नेण्यासाठी आमच्याकडे हवे तसे मनुष्यबळ नव्हते; परंतु आमचे वैद्यकीय अधिकारी कॅप्टन डॉ. तांबे प्रत्येक मोर्चामध्ये येऊन कुणाला लागलेले आहे ?, हे पाहून त्यांच्यावर औषधोपचार करायचे. कुणाला लागले असेल, तर त्यांच्या जखमा बांधायचे. त्यांनी पुष्कळ सुंदर काम केले. (अनेकांना डॉ. तांबे हे देवदूत वाटायचे. डॉ. तांबे यांच्याकडे सैनिक घायाळ होऊन आला की, त्याला आपण निश्चित बरे होणार, असे वाटायचे. – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन) संपूर्ण बटालियनमध्ये कॅप्टन डॉ. तांबे यांचा कर्मचारीवर्ग सर्व साहित्य घेऊन फिरत होता. त्यांचे काम पाहून भारत सरकारने त्यांना सैन्यपदकाने अलंकृत केले होते. त्यांनी अतिशय जगावेगळे काम केले होते. ते आमच्यासमवेत आघाडीवर रहायचे आणि आमचे धैर्य वाढवायचे. ते पाहून आम्हाला पुष्कळ चांगले वाटायचे.
६. सुभेदार मेजर जयराम मुळीक
६ अ. शत्रूच्या ब्रिगेडियरने भारतीय ब्रिगेडियरकडे ७ मराठा सैनिकांना भेटण्याची अनुमती मागणे; पण ती नाकारली जाणे : आम्ही शत्रूच्या ब्रिगेडवर आक्रमण करत गेलो. त्यांचे सैनिक घायाळ केले, तर काही जण हुतात्मा झाले. त्यानंतर शत्रूच्या ब्रिगेडियरने भारतीय ब्रिगेडियरची भेट घेतली. त्यांच्यात ‘फ्लॅग मिटींग’ (ध्वज संचलन बैठक) झाली. त्या वेळी शत्रूच्या ब्रिगेडियरने भारतीय ब्रिगेडियर साहेबांना विचारले, ‘तुमच्या भारतीय सैन्यातील ७ मराठा सैनिक आम्हाला दाखवता का ? मला त्यांना केवळ ५ मिनिटे भेटायचे आहे.’ भारतीय ब्रिगेडियर म्हणाले, ‘आमच्या ब्रिगेडमध्ये ‘७ मराठा’ नाहीत.’ तेव्हा पाकिस्तानचे ब्रिगेडियर म्हणाले, ‘आम्ही त्यांना ओळखतो. ते आमच्यावर दिवसा आक्रमण करायचे. त्यांची सर्व माहिती आमच्याकडे आहे; पण आम्हाला त्यांना ५ मिनिटे भेटू द्या.’ अर्थात् भारतीय ब्रिगेडियर साहेबांनी त्यांना भेटण्याची अनुमती दिली नाही.
७. युद्धानंतर पाकिस्तानने लिहिलेल्या इतिहासात ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ची नोंद घेऊन कौतुक करणे
या युद्धानंतर पाकिस्तानने जो इतिहास लिहिला, त्यात त्यांनी ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ची नोंद घेतली. त्यात म्हटले आहे, ‘७ मराठा सैनिकांनी कांतानगर पूल आणि पाचागड यांवर परत परत आक्रमण केले. त्यांनी अतिशय चांगले काम केले.’ या कांतानगर आणि पाचागड या दोन लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फंट्रीचे ३१ सहकारी हुतात्मा झाले अन् १२५ हे गंभीररित्या घायाळ झाले होते. अर्ध्याहून अधिक लोक घायाळ झाल्यावरही सैनिक लढाई करत राहिले. या युद्धामध्ये सैनिकांना सैन्याच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
– (निवृत्त) ब्रिगेडियर महाजन, पुणे