वर्ष २०२२ पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
नवी देहली – जगभरात वर्ष २०२२ पर्यंत कोरोना महामारी संपुष्टात येईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या संघटनेच्या १०० वैज्ञानिकांनी एक अहवाल सिद्ध केला आहे. यात हा दावा करण्यात आला आहे. याविषयी संघटनेच्या महासंचालकांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, वर्ष २०२२ पर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या शून्य होईल. वर्ष २०२२ मध्ये कोरोना समूळ नष्ट होणार नाही; मात्र ही महामारी रहाणार नाही. ही महामारी केवळ ताप, सर्दी या आजारांसारखी असेल. पुढील ३-४ मासांत कोरोनावर शेकडो औषधे बाजारात येतील. वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत कोरोना अशा स्थितीत पोचेल, जसा वर्ष २०१८ मध्ये स्पॅनिश फ्लू आणि वर्ष २००९ मध्ये स्वाईन फ्लू होता. जग ‘मास्क’ मुक्त होईल; मात्र आजारी व्यक्तींना मास्क घालणे बंधनकारक असेल. महामारी जरी नष्ट झाली, तरी सामाजिक आव्हाने कायम असणार आहेत.