कुडाळ-वेंगुर्ला रस्त्याच्या कामासाठी देहलीतील शेतकर्यांच्या आंदोलनाप्रमाणे रस्ताबंद आंदोलन करणार !
कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यांतील ६ गावच्या सरपंचांची जिल्हा प्रशासनाला चेतावणी
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी जाणार्या प्रमुख राज्यमार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. या अंतर्गत कुडाळ-वेंगुर्ला हा रस्ता अत्यंत धोकादयक झाला असून वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. या रस्त्याचे काम २६ डिसेबरपर्यंत न झाल्यास कुडाळ-वेंगुर्ला तालुक्याच्या सीमेवर देहलीत झालेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यांतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. याविषयीचे निवेदन १५ डिसेंबरला जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यातील मठ, कुडाळ तिठा ते कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, गवळदेव मंदिरापर्यंतचा १२ कि.मी.चा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र त्याला यश येत नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातील ४ आणि कुडाळ तालुक्यातील २, अशा एकूण ६ गावांतील सरपंचांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भाकडवाड यांच्याद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले.
(सौजन्य : Kokanshahi)
या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी ६ ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी प्रत्यक्ष, तसेच लेखी स्वरूपात वेळोवेळी मागणी केली; मात्र असंवेदनशील, निगरगट्ट कारभार करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे २७ डिसेंबर या दिवशी वेंगुर्ला-कुडाळ रस्ताबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
या वेळी वाडीवरवडेचे सरपंच अमेय धुरी, पालकरवाडी (वेतोरे) सरपंच संदीप चिचकर, मठचे सरपंच तुळशीदास ठाकूर, तसेच नंदन वेंगुर्लेकर, गुरुनाथ दामले, दिलीप प्रभुखानोलकर आदी उपस्थित होते.