भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांचे आमदारकीचे त्यागपत्र : ‘आप’मध्ये प्रवेश करण्याच्या सिद्धतेत
‘जे स्वार्थासाठी, म्हणजे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातात, ते केवळ पक्षद्रोहीच नसून राष्ट्रद्रोहीही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात. पक्षद्रोहींना ओळखू न शकणारे त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या पक्षांतील उत्तरदायी राज्य करण्याच्या क्षमतेचे आहेत का ?
पणजी, १६ डिसेंबर (वार्ता.) : भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचे त्यागपत्र सुपुर्द केले. भाजपला सोठचिठ्ठी देऊन त्या ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एलिना साल्ढाणा यांच्या त्यागपत्रामुळे विधानसभेची संख्या आता ३५ वर आली आहे. आमदारकीचे त्यागपत्र देणार्या भाजपच्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. सलग २ वेळा त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.
एलिना साल्ढाणा या रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधातील आंदोलनात लोकांसमवेत सक्रीय सहभागी झाल्या होत्या. विरोध असूनही काम चालूच ठेवल्याने त्या सरकारवर अप्रसन्न आहेत. मोले अभयारण्यात होणार्या वादग्रस्त ३ प्रकल्पांनाही त्यांनी विरोध केला आहे; मात्र या विरोधाची सरकारने नोंद घेतली नाही. एलिना साल्ढाणा वर्ष २०१२ मध्ये पर्रीकर सरकारच्या काळात पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर मंत्री होत्या. अभयारण्याच्या ‘बफर झोन’विषयी पर्रीकर यांनी त्यांना अंधारात ठेवून काही निर्णय घेतले होते आणि यामुळे त्या वेळी काही काळ त्या नाराज होत्या. सध्या भाजप शासनातील मंत्री माविन गुदिन्हो यांच्याशी त्यांचा उघड संघर्ष चालू होता.
भाजप आता तत्त्वांचा पक्ष राहिलेला नाही !
भाजप आता तत्त्वांचा पक्ष राहिलेला नाही. १५ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका बैठकीत एका मोठ्या नेत्याने केलेल्या विधानावरून मी व्यथित झाले. माझे पती दिवंगत माथानी साल्ढाणा यांनी पक्षाची तत्त्वे आणि ध्येयधोरणे पाहून पक्षात प्रवेश केला होता; मात्र तो भाजप आता राहिलेला नाही. आज भाजपात कोणीही प्रवेश करतो ? कुणी पक्ष सोडून जातो ? कुणाचा पायपोस कुणालाच राहिलेला नाही. पक्षाचे जुने कार्यकर्ते दुखावले आहेत आणि त्यांचे खच्चीकरण चालले आहे. रेल्वे दुपदरीकरणाला होत असलेला विरोध रास्त आहे; कारण दुपदरीकरण झाल्यास अनेक लोकांची अर्धी घरे, कुंपणे मोडून टाकावी लागणार आहेत. मोले अभयारण्यात येऊ घातलेले ३ प्रकल्पही अन्यायकारक आहेत. मतदारांकडे चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे.’’
एलिना साल्ढाणा यांना वर्ष २०१७ मध्ये निवडणूक जिंकणे कठीण होते : मुरगावच्या चारही जागा भाजप जिंकणार ! – मावीन गुदिन्हो, पंचायतमंत्री
वर्ष २०१७ मध्ये एलिना साल्ढाणा यांना कुठ्ठाळी मतदारसंघातून भाजपच्या आमदार या नात्याने निवडून येणे खूप कठीण झाले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप मुरगाव तालुक्यातील वास्को, दाभोळी, मुरगाव आणि कुठ्ठाळी या चारही मतदारसंघांत निवडणूक जिंकणार आहे, असे मत पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी व्यक्त केले. एलिना साल्ढाणा यांनी आमदारकीचे त्यागपत्र दिल्याच्या घटनेवर ते बोलत होते. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मी एलिना साल्ढाणा यांच्याशी संपर्क साधू शकलेलो नाही. मी त्यांच्याशी याविषयी बोलणार आहे.’’