दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्त भक्तांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित केला असून तो सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. येथून पुढे काळानुसार आवश्यक असलेला हाच एक नामजप उपलब्ध असणार आहे.
श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.
अ. नामजप म्हणण्याची गती : मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. श्री गुरुदेव दत्त । हा नामजप मध्यम गतीचा आहे. ज्यांना जलद गतीने म्हणायचे आहे, त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीत म्हणावा; पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, असा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या गतीने नामजप करावा.
आ. दोन नामजपांमधील अंतर : ‘एका नामजपानंतर तोच नामजप ऐकण्यापूर्वी मध्ये किती अंतर असावे ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘व्यक्तीच्या प्रकृतीनुसार दोन जपांमधील अंतर अधिक-उणे होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे हा नामजप म्हणतांना हे अंतर आपण पालटू शकतो.’ ध्वनीमुद्रित केलेल्या या नामजपात सर्वसाधारण अंतर ठेवण्यात आले आहे.
सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे सूक्ष्माकडे नेणारा अभ्यास करायला शिकवले जाते. त्यामुळेच अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची प्रगती जलद गतीने होते. ॐ
१. नामजप ऐकण्यासाठी सनातनच्या संकेतस्थळाची मार्गिका : www.sanatan.org/mr/a/824.html
२. ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/Chaitanyavani
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास त्या आम्हाला contact@sanatan.org या ई-मेल पत्त्यावर किंवा ई-मेल नसलेल्यांनी पुढील पत्त्यावर अवश्य कळवावा.
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’ |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |