हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत प्रवास आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार अविरत प्रवास करणार्‍या आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.१२.२०२१) या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी ५१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तुझ्या चरणी आई-बाबांचा (पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे सनातनच्या ९० व्या संत आणि पू. सदाशिव नारायण परांजपे सनातनचे ८९ वे संत यांचा) शिरसाष्टांग नमस्कार ! हे रामराया, तुझेच सगुण रूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी आम्हा उभयतांचे कोटीशः प्रणाम !

तिरुपती मंदिराच्या परिसरात डावीकडून सौ. सायली सिद्धेश करंदीकर, सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे आणि पू. (श्री.) सदाशिव परांजपे

१. ‘लहानाची मोठी करतांना वळण लावण्याच्या नादात कन्या (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) दैवी आहे’, हे कळलेच नाही आणि तेव्हा ‘ही बालिका दैवी आहे’, हे सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले भेटलेच नव्हते !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तुझे गुणवर्णन आम्ही कोणत्या शब्दांत करावे ?’, हेच आम्हाला कळत नाही. तू लहानपणापासून अनंत दैवी गुण आम्हाला दाखवलेस; पण ते आम्हाला आकलन झाले नाहीत. आमची तेवढी क्षमताच नव्हती. तुला लहानाची मोठी करतांना आम्ही तुला अनंत वेळा शिक्षा केली, मारले आणि तुझ्या मनासारखे काही केले नाही. तुला वळण लावण्याच्या नादात ‘तू दैवी आहेस’, हे आम्हाला कळलेच नाही. त्यासाठी आम्हाला ‘दुर्दैवी’ म्हटले, तरी चालेल; कारण तेव्हा आम्हाला ‘तू दैवी बालक आहेस !’, हे सांगणारे परात्पर गुरुदेव डॉ. आठवले भेटले नव्हते.

पू. सदाशिव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

आम्हाला जसे जमले, तसे आम्ही तुला लहानाचे मोठे केले. तुझा विवाह देवाने दैवी व्यक्तीशीच (सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांच्याशी) करून दिला. गुरुदेवांनी तुम्हा दोघांना आपल्या चरणांशी घेतले आणि आपल्या दैवी कार्याला प्रारंभ झाला.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महर्षींच्या आज्ञेनुसार चालू असलेला आध्यात्मिक दैवी दौरा !

२ अ. पूर्वी संत महात्म्यांनीसुद्धा भारतभर भ्रमण करून त्यांनी जगदोद्धारासाठी आयुष्य वेचणे आणि त्याप्रमाणेच तूही महर्षींच्या आज्ञेनुसार दिवस-रात्र प्रवास करत असतेस ! : महर्षि तुला अन् तुझ्या समवेत असणार्‍या साधकांना आध्यात्मिक दौर्‍यासाठी पाठवतात. तू महर्षींच्या आज्ञेनुसार साधकांच्या रक्षणासाठी, हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी आणि रामराज्याची स्थापना होण्यासाठी अखंड अनेक तीर्थक्षेत्रांना जातेस अन् सर्वांसाठी देवतांचा आशीर्वाद घेतेस. तू रामराज्यासाठी अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यज्ञ-याग करतेस. पूर्वी अनंत संत महात्म्यांनीसुद्धा, उदा. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी यांनी अध्यात्मप्रसार करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी भ्रमण केले आहे. त्यांनी जगदोद्धारासाठी आयुष्य वेचले आहे. त्याप्रमाणेच देवाने तुझे नियोजन केले आहे. तू महर्षींच्या आज्ञेनुसार अखंड दिवस-रात्र प्रवास करत असतेस.

२ आ. देवाने या दैवी दौर्‍यात धर्मप्रसारासाठी आणि ‘सनातन संस्थे’ला आशीर्वाद मिळण्यासाठी अनेक अवघड यात्रा करवून घेणे, तुझ्या समवेत असणारे साधकसुद्धा दैवीच असणे आणि त्या प्रत्येक साधकाच्या अंगी एक वेगळाच गुण असून तो गुरुदेवांनीच दिलेला असणे : या दैवी दौर्‍यात धर्मप्रसारासाठी आणि ‘सनातन संस्थे’ला आशीर्वाद मिळण्यासाठी देवाने तुझ्याकडून कैलास-मानसरोवर, अमरनाथ, लेह-लडाख, चार धाम आदी अनेक अवघड यात्रा करवून घेतल्या आहेत. तुझ्या समवेत असणारे साधकसुद्धा दैवीच आहेत. ते तुझे पाच पांडवच असून ते तुझी अगदी आईप्रमाणे काळजी घेतात. त्यांचासुद्धा या गुरुकार्यात फार मोठा सहभाग आहे. सहस्रो किलोमीटर अव्याहत ९ वर्षे गाडी चालवून प्रवास करणे खरोखरच कठीण आहे. यात सतत परात्पर गुरुदेवांचा आशीर्वाद आणि बळ असल्याविना हे साध्य होणे शक्य नाही. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना गुरुकृपेने ९ भाषा अवगत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वांशी सहजगत्या संवाद साधता येतो. तुझ्या समवेत असणार्‍या प्रत्येक मुलाच्या अंगी एक वेगळाच गुण आहे आणि तो गुरुदेवांनीच दिला आहे.

२ इ. ‘गुरूंचे धर्मप्रसाराचे कार्य झोकून देऊन करणे’, हे एकच ध्येय असणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! : तू आज या तीर्थक्षेत्राला, तर उद्या त्या तीर्थक्षेत्राला जातेस; परंतु तुला कधीच या गोष्टीचा शीण किंवा कंटाळा येत नाही. गुरूंचे धर्मप्रसाराचे कार्य झोकून देऊन करणे, हे तुझे एकच ध्येय आहे. ‘एक स्त्री असून एवढे कार्य समर्थपणे पार पाडतेस’, याचे आम्हाला कौतुक वाटते. तुझ्यासारखी दैवी मुलगी देवाच्या कृपेने आम्हाला लाभली.

२ ई. ‘अखंड दैवी दौरा करणे’, हे देशकार्यासाठी घेतलेले व्रतच आहे आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडणारच’, असे सांगणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! : काही वेळा आम्हा दोघांना असे वाटते, ‘तू थोड्या दिवसांसाठी इकडे यावेस. इथे राहून विश्रांती घ्यावीस; कारण आमची माया आड येते ना ?’ तूच मला शेवटी समजावून सांगतेस, ‘‘अगं आई, मी छान आहे. मला काहीही त्रास होत नाही.’’ ‘की घेतले न हे व्रत अंधतेने ।’ हे आमचे देशकार्यासाठी घेतलेले व्रतच आहे आणि आम्ही ते शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडणारच.’’

२ उ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत केलेली दक्षिण भारत यात्रा आयुष्यातील अविस्मरणीय यात्रा ! : आम्ही मागील मासात तुझ्या समवेत केलेल्या प्रवासात याची अनुभूती घेतली. नोव्हेंबर ३०.११.२०२१ ते ८.१२.२०२१ पर्यंत तू आमचे (पती सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, मुलगी सौ. सायली करंदीकर आणि आम्ही दोघे आई-वडील (पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे आणि पू. (श्री.) सदाशिव नारायण परांजपे) या सर्वांचे नियोजन रामेश्वर, रामसेतू, मीनाक्षी, मदुराई, कांचीपुरम्, कुंभकोणम्, तिरुअण्णामलई, तिरुपती बालाजी, चेन्नई या दक्षिण भारत-यात्रेसाठी केलेस. खरोखरच ती आयुष्यातील अविस्मरणीय यात्रा झाली.

२ ऊ. गुरुदेवांच्या कृपेने सगळीकडे देवदर्शन छान घडणे आणि ‘सगळीकडे देवळातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी पुजार्‍यांची श्रद्धा किती आहे ?’, हे अनुभवता येणे : तू स्वतः ‘श्रावण बाळ’ झालीस आणि आम्हाला यात्रा घडवलीस. आम्हाला चालवत नाही; म्हणून तू आम्हाला चाकांच्या आसंदीतून (‘व्हिल चेअर’वरून) घेऊन गेलीस. काही वेळा तूसुद्धा ती आसंदी ढकललीस. गुरुदेवांच्या कृपेने सगळीकडे देवदर्शन छान घडले. ‘तू स्वतः श्रीचित्‌‌शक्ति आहेस, हे बाहेर कुणाला सांगावे लागत नाही. तुला पाहिल्यावरच सर्वांना ते कळते. ‘सगळीकडे देवळातून गुरुदेवांच्या आणि तुझ्या चरणी पुजार्‍यांची श्रद्धा किती आहे ?’, हे अनुभवल्यावरच आम्हाला कळले. ‘गुरुकार्याचा सगळीकडे कसा प्रसार होत आहे ?’, हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजले.

२ ए. पूर्वी पुष्कळ यात्रा करूनही शांतपणे दर्शन कधीच घेता न येणे आणि या यात्रेत देवाची कृपा अन् त्याचे नियोजन अनुभवता येणे : आम्हाला सगळीकडे देवापुढे शांतपणे उभे राहून दर्शन घेता आले आणि संस्थेच्या कार्यासाठी अभिषेक करता आले. आम्ही यापूर्वी पुष्कळ यात्रा केल्या; पण असे शांतपणे दर्शन कधीच घेता आले नाही. आता देवाला शांतपणे जवळून न्याहाळता आले. त्याला डोळे भरून बघता आले आणि त्याचे रूप डोळ्यांत साठवता आले. हे गुरुदेवांच्या कृपेने आणि तू समवेत असल्यामुळे साध्य झाले. अंजली, तुझ्या रूपात देवच आमच्या समवेत होता; म्हणून आम्हाला प्रवासात कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. त्या वेळी देवाची एवढी मोठी कृपा होती की, ‘आम्ही प्रवासाहून आल्यानंतर लगेचच तिकडे वादळ झाले आणि महापूर आला. तिरुपतीला, तर सगळे वाहूनच गेले. आमच्यावर केवढी ही देवाची कृपा आणि नियोजन ! म्हणतात ना, ‘देव तारी, त्याला कोण मारी ।’

२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ही गुढी परमेश्वर त्रिजगतात पसरवेल आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद देईल ! : आम्ही आठ दिवस प्रवास करून कंटाळलो. तू एवढा प्रवास कसा करत असशील ?’, याची देवाने आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती दिली. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ याप्रमाणे तुझे कार्य चालू आहे. प्रवासात तुला पुष्कळ वेळा ‘हॉटेल’मध्ये रहावे लागते. असेल ते आणि मिळेल ते, खावे लागते, तरी तुझी कधीही तक्रार नव्हती. एक स्त्री असल्यामुळे तुला बारीक-सारीक अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. सगळीकडे माणसे आपलीशी करावी लागतात. काही चांगली आणि काही वाईटही भेटतात; पण गुरुकृपेने तुला समर्थपणे उभे रहाता येते. तुझी खरोखरच कमाल आहे. लोकांना नुसते इकडे जातात आणि तिकडे जातात, एवढेच दिसते; पण त्यामागचे तुझे कष्ट अनुभवल्याविना प्रवासाची वैशिष्ट्ये कुणालाच कळणार नाहीत. देवाला सगळे काही कळते. तो सतत तुझ्या पाठीशी उभा आहेच. आपल्या गुरुदेवांच्या कार्याची ही गुढी परमेश्वर त्रिजगतात पसरवेल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘हे गुरुदेवा, तुम्हीच आम्हाला अशी दैवी कन्या दिलीत. तिचे पालन-पोषण करणारे तुम्हीच आहात. त्या तुमच्या लेकराचा सर्वतोपरी सांभाळ करणारे तुम्ही समर्थ आहात. आम्ही कशाला काळजी करायची ? आम्ही नाममात्र आहोत. गुरुदेवा, आमची योग्यता नसतांना हे ‘सौ. अंजलीरूपी फळ’ तुम्ही आमच्या पदरात टाकलेत; पण आम्ही ते नुसते झेलले. त्याचा सांभाळ करणारे तुम्हीच आहात. ‘या लेकराला तिच्या प्रवासात तुम्ही एक ढाल बनून तिच्या पाठीशी उभे आहात; म्हणून ती इतका दैवी प्रवास करते. याची जाणीव आमच्या भोळ्या मनाला सतत असू दे.’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी केलेली क्षमायाचना आणि प्रार्थना !

‘देवा, आमची माया सतत उफाळून वर येते. ‘काळजी करायची नाही’, असे ठरवले, तरी केली जाते. ‘सतत माया आड येते आणि असे बोलले जाते’, यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. आम्हाला या गोष्टीसाठी बळ द्या आणि तुम्हाला अपेक्षित असे कार्य तिच्याकडून करवून घ्या. तिच्यात क्षमता निर्माण करा.’ हे तुम्हाला सांगणे, म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतल्यासारखे होईल.

‘सौ. अंजली, तुला तुझ्या आई-बाबांकडून नमस्कार ! तू अध्यात्मात मोठी मोठी हो. सनातनची गुढी आकाशापर्यंत नेण्याचे कार्य तुझ्याकडून अविरत घडू दे. देव तुला बळ देऊ दे. आता मागे वळून बघू नको. पुढे पुढे चालत रहा. परात्पर गुरुदेव तुला म्हणत आहेत, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’

– पू. (श्री.) सदाशिव नारायण परांजपे (वय ७८ वर्षे) आणि (पू.) सौ. शैलजा परांजपे (वय ७३ वर्षे), रामनाथी, फोंडा, गोवा. (७.१२.२०१२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक