श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची नखे पिवळी होणे, त्यांच्या नखांना लवचिकता येणे आणि तोंडवळ्यावरील हास्य बालकासारखे निर्मळ जाणवणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची नखे, मुखमंडल यांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्वरेच्छेने कार्य करून ईश्वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीचा देह आणि तिच्या वापरातील वस्तू यांमध्येही दैवी पालट दिसून येतात. त्यांवर उमटलेली शुभचिन्हे व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांची नखे आणि त्यांचे मुखमंडल यांमध्ये झालेले बुद्धीअगम्य दैवी पालट यांचे शास्त्र या लेखाद्वारे पाहूया.

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या नखांचा रंग पिवळसर होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनुक्रमे डाव्या आणि उजव्या हाताची पिवळी झालेली नखे (उजव्या हाताची नखे डाव्या हाताच्या नखांपेक्षा अधिक पिवळसर झाली आहेत.)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या नखांची वर्ष २०१९ मध्ये काढलेली छायाचित्रे येथे दिली आहेत. या छायाचित्रांवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हातांच्या बोटांतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने आणि त्या ज्ञानस्त्रोताशी तादात्म्य पावल्या असल्याने त्यांच्या हातांची नखे पिवळसर झाली असणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे पिवळसर झाली आहेत. पिवळा रंग हा चैतन्याशी निगडित आहे. सूक्ष्म स्तरावरील चैतन्य स्थूल स्तरावर पिवळ्या रंगात प्रकट होते. वर्ष २०१९ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या ‘सद्गुरुपदा’वर विराजमान होत्या. त्यांच्यासारख्या समष्टी संतांकडून साधक, तसेच समष्टी यांच्यासाठी चैतन्य प्रक्षेपित होत असते. चैतन्याचे प्रक्षेपण हात आणि पाय यांच्या बोटांच्या टोकांकडून अधिक प्रमाणात होते. बोटांच्या टोकांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा परिणाम नखांवरही होत असल्याने आणि चैतन्याचा रंग पिवळा असल्याने नखांचा वाढलेला भाग पिवळसर दिसायला लागतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या हातांची नखे पिवळसर होण्याचे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे वर्ष २००३ ते वर्ष २०१४ पर्यंत त्या सूक्ष्मातील ज्ञान मिळवत होत्या. त्यांना मिळालेले ज्ञान सनातनच्या अनेक ग्रंथांत प्रकाशित झाले आहे. आता त्या ज्ञान मिळवत नसल्या, तरी ज्ञानस्त्रोताशी तादात्म्य पावल्या असल्याने आणि ज्ञानस्त्रोताचा रंग पिवळा असल्याने त्यांची नखे पिवळसर झाली आहेत.

आ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या हाताच्या नखांचा पिवळेपणा डाव्या हाताच्या नखांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येणे : शरिराची उजवी बाजू ही सूर्यनाडीशी संबंधित असते, तर डावी बाजू ही चंद्रनाडीशी संबंधित असते. सूर्यनाडी ही अधिकतर सगुण स्तरावर कार्यरत असते, तर चंद्रनाडी ही अधिकतर निर्गुण स्तरावर कार्यरत असते. उजवा हात हा सूर्यनाडीशी संबंधित असल्याने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उजव्या हातातून प्रक्षेपित होणारे चैतन्य स्थूल रूपात नखांमध्ये अधिक प्रमाणात प्रकट झाले. या तुलनेत निर्गुण स्तरावर कार्यरत असलेल्या चंद्रनाडीशी संबंधित डाव्या हातातून प्रक्षेपित होणारे चैतन्य स्थूल रूपात नखांमध्ये अल्प प्रमाणात प्रकट झाले. त्यामुळे डाव्या हाताच्या नखांपेक्षा उजव्या हाताची नखे अधिक पिवळसर दिसत आहेत.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील वायुतत्त्वामुळे त्यांच्या नखांना पुष्कळ लवचिकता आली असणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तर्जनीचे वाढलेले नख

येथे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तर्जनीच्या बोटांची दोन छायाचित्रे दिली आहेत. पहिल्या छायाचित्रात त्यांनी त्यांच्या तर्जनीचे वाढवलेले नख खाली टेकवले आहे, तर दुसर्‍या छायाचित्रात तर्जनीचे वाढवलेले नख सहजतेने दुमडले गेल्याचे दिसत आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तर्जनीचे वाढलेले नख सहजतेने दुमडले जाणे

या छायाचित्रांवरून लक्षात येते की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नखांना लवचिकता आली आहे. नखांना आलेली लवचिकता ही त्यांच्यातील वायुतत्त्वामुळे आहे. अध्यात्मात जशी आपली उन्नती होते, तसे आपल्यामधील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांपैकी अधिकाधिक उच्च तत्त्वाचे प्रमाण वाढत जाते. त्याप्रमाणेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांच्यामधील वायुतत्त्व वाढले आहे. शरिरातील वायुतत्त्व वाढल्याने होणारे आणखी काही पालट म्हणजे आपली त्वचा मुलायम होते, तसेच आनंद आणि प्रीती वाढल्याने नखे, तसेच त्वचा गुलाबी होते.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.१२.२०२१)


श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तोंडवळ्यावरील हास्य बालकासारखे निर्मळ जाणवणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तोंडवळ्यावरील बालकाप्रमाणे निर्मळ हास्य !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे येथे दिलेले छायाचित्र जुलै २०२१ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी काढले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेव्हा हे छायाचित्र पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘या छायाचित्रात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांच्या तोंडवळ्यावरील हास्य किती निर्मळ आणि एखाद्या बालकासारखे आहे ना !’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तसे म्हणण्याचे कारण मला पुढीलप्रमाणे जाणवले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ आहेत. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक योग्यता पुष्कळ मोठी आहे. प्रत्येक व्यक्ती आरंभी बालक असते. बालकाचे मन अतिशय निर्मळ असते. त्यामुळे ते जेव्हा हसते, तेव्हा त्याचे हास्य आपल्याला अगदी निरागस जाणवते. एखादी व्यक्ती जेव्हा अध्यात्मात उन्नती करून ‘संतपदी’ (७० टक्के आध्यात्मिक पातळीला) पोचते, तेव्हा तिच्यातील चैतन्य वाढते. ती ‘सद्गुरुपदी’ विराजमान (८० टक्के आध्यात्मिक पातळी) झाल्यावर तिच्यामध्ये आनंद जाणवू लागतो. जेव्हा ती अध्यात्मात आणखी पुढे वाटचाल करू लागते, तेव्हा ती शांतीच्या टप्प्याकडे, म्हणजेच निर्गुण स्तराकडे जाऊ लागते. अशी व्यक्ती खरोखरच बालकासारखी असते; कारण तिच्यातील अहंचे प्रमाण अगदी नगण्य झालेले असते. त्यामुळे तिची निर्मळता तिच्या हास्यात आणि वागण्यात दिसून येते. यावरून व्यक्तीचा प्रवास बालकाच्या निर्मळतेतून आरंभ होऊन शेवटी पुन्हा त्या निर्मळतेकडेच होतो, हे लक्षात येते. तसेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात झाले आहे.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (१४.१२.२०२१)


तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांचा देह आणि त्यांच्या वापरातील वस्तू यांतील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या नखांचा रंग पिवळसर होण्यामागे काय कारण आहे ?

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नखांना पुष्कळ लवचिकता येण्यामागे काय कारण आहे ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,

ई-मेल : mav.research2014@gmail.com

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.