तरुणींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्यालाही संमती

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाने तरुण आणि तरुणी यांच्यासाठी विवाहाचे किमान वय एकसमान म्हणजेच २१ वर्षे करण्यास संमती दिली आहे. यासमवेतच निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकही संमत करण्यात आले आहे. ते संसदेत संमत झाल्यानंतर मतदान ओळखपत्राला आधार कार्डशी जोडण्यासह नव्या मतदारांना नोंदणीसाठी अधिक संधी मिळतील. ही दोन्ही विधेयके संसदेच्या याच अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे.

तरुणींच्या विवाहाच्या किमान वयावर विचार करण्यासाठी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. १० सदस्यांच्या कृती दलाने देशातील विचारवंत, कायदेतज्ञ आणि नागरिक संघटना यांच्या नेत्यांशी विचारविनिमय केला होता. याविषयीचा अहवाल गेल्यावर्षी डिसेंबर मासामध्ये सरकारला सोपवण्यात आला होता. कृती दलाने विवाहाचे वय २१ वर्षे ठेवण्याविषयी ४ कायद्यांत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.

निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडणार

निवडणूक आयोगाने ‘मतदार कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी जोडण्याची शिफारस केली आहे. जेणेकरून मतदार सूची पारदर्शक आणि अचूक करता येईल. बनावट मतदार वा एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार सूचीमध्ये नोंदणी करणारे मतदारही यामुळे वगळता येतील. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या रहाण्याच्या शहरांत मत देता येण्याची आयोगाची इच्छा या नव्या विधेयकामुळे साकार होऊ शकेल. १ जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण करणार्‍या तरुणांना वर्षभरात ४ वेळा मतदार सूचीमध्ये नाव नोंदवण्याची मुभा देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. सध्या त्यांना वर्षातून एकदाच ही संधी मिळते.