देहाला वेदना होत असतानांही शेवटच्या क्षणापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारे कै. (श्री.) श्रीकांत भट !
देहाला वेदना होत असतानांही शेवटच्या क्षणापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारे कै. (श्री.) श्रीकांत भट (वय ६२ वर्षे) !
अकोला येथील साधक श्री. श्रीकांत भट यांचे ४.१२.२०२१ या दिवशी निधन झाले. १६.१२.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यांच्या आजारपणात रुग्णालयात भरती केल्यावर त्यांची पत्नी श्रुती श्रीकांत भट यांनी अनुभवलेली गुरुकृपा, कै. भट यांच्याविषयी पत्नी आणि त्यांची भावजय यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
लेखिका – श्रीमती श्रुती श्रीकांत भट (कै. श्रीकांत भट यांच्या पत्नी), अकोला
‘श्री. श्रीकांत भट हे सप्टेंबर २०१९ पासून रुग्णाईत असून एप्रिल २०२१ पर्यंत त्यांना ‘डायलिसीस’ (मूत्रपिंड निकामी झाल्यावर हा उपचार करतात. यात यंत्राद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर काढून शुद्ध रक्त शरिरात पुरवले जाते.) चालू होते. उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता न्यून होणे यांसाठी त्यांना २०.११.२०२१ या दिवशी अतिदक्षता विभागात भरती केले होते. तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ (मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे) झाल्याचे कळले. रुग्णालयात भरती केल्यापासून त्यांच्या निधनाच्या वेळेपर्यंत मी अनुभवलेली श्री गुरूंची असीम कृपा कृतज्ञतापूर्वक त्यांच्याच चरणी अर्पण करते.
१. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भक्तीसत्संग चालू असतांना कै. भट यांना आलेल्या अनुभूती
१ अ. भक्तीसत्संगामध्ये श्री. भट पूर्णवेळ भावावस्थेत असणे आणि त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रूधारा वहाणे : ‘१८.११.२०२१ या दिवशी वैकुंठचतुर्दशी होती, हे आम्हाला ठाऊक नव्हते; परंतु दुपारी भक्तीसत्संग चालू झाला आणि त्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी वैकुंठचतुर्दशीचा उल्लेख केला. तेव्हा श्री. भट यांना ‘एम्.आर्.आय्’ करतांना संत तुकाराम महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घडल्याचा उलगडा झाला. त्यामुळे आम्हा उभयतांना पुष्कळ आनंद झाला. ‘त्या क्षणापासून श्री. भट यांच्या अंतरंगात भक्तीधारेचा उगम झाला’, असे मला जाणवले. दोन घंटे चालणार्या या भक्तीसत्संगामध्ये श्री. भट पूर्णवेळ भावावस्थेत होते. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रूधारा वहात होत्या.
१ आ. श्री. भट यांना भक्तीसत्संग वैकुंठलोकात चालला असल्याचे जाणवणे आणि सत्संग संपला, तरी श्री. भट भावावस्थेत असणे : ते म्हणाले, ‘‘आजचा भक्तीसत्संग वैकुंठलोकात चालला आहे. काय आनंद आहे !’’ ‘परात्पर गुरु डॉक्टर, पांडुरंग, तुकोबाऽऽ’ असे श्री. भट यांचे स्मरण आणि तोंडाने बोलणेही चालू होते. ‘पांडुरंगा, मला उचल आणि माझ्यासाठी तू वैकुंठचतुर्दशीचा दिवस ठरव. मला या जगण्यात आता काही स्वारस्य राहिलेले नाही. तू मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घे. मला तुकोबांसारखा भक्त बनव. दुसरा तुकोबा घडव’, असे म्हणून ते पुष्कळ रडत होते. ४.३० वाजता सत्संग संपला, तरी ते त्याच भावावस्थेत होते.
२. स्वप्नात साईबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आलेले दिसणे, साईबाबांनी झोळीतील विभूती काढून डोक्याला लावणे आणि नंतर डोकेदुखी थांबून शांत झोप लागणे
१८.११.२०२१ या दिवशी रात्रभर श्री. भट यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. पहाटे चार वाजता त्यांचा डोळा लागला. तेव्हा स्वप्नात त्यांना साईबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आलेले दिसले. साईबाबांनी त्यांच्या झोळीतील विभूती काढून डोक्याला लावली. त्यानंतर साईबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हातात हात घालून निघून गेले. नंतर त्यांची डोकेदुखी थांबली आणि त्यांना चांगली झोप लागली.
३. ‘डायलिसीस’साठी रुग्णालयात गेल्यावर तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नामजपाचे महत्त्व श्री. भट यांनी सांगणे
श्री. भट यांना आठवड्यातून दोन वेळा ‘डायलिसीस’ला जावे लागे. तेथील प्रमुख आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि कुलदेवता यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले आणि त्यांनीही नामजप चालू केला.
४. श्री. भट हे अतीदक्षता विभागात असतांना पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत) यांच्याशी बोलणे होत होते. त्यामुळे मला (सौ. भट यांना) सतत चैतन्य मिळत होते आणि ताण निघून जात होता.
५. पू. पात्रीकरकाका आणि व्यष्टी आढावासेवक यांनी सकारात्मक दृष्टीकोन देऊन पुष्कळ साहाय्य करणे आणि श्री. भट यांच्या निधनानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर हे भेटण्यासाठी आल्यावर पुष्कळ चैतन्य मिळणे
४.१२.२०२१ या दिवशी पहाटे ४ वाजता त्यांची प्रकृती ढासळल्याचा निरोप मिळाल्यावर माझ्या मनाची घालमेल झाली. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘मला स्थिर रहाता येऊ दे.’ या संपूर्ण कालावधीत पू. पात्रीकरकाका आणि माझे व्यष्टी आढावासेवक यांनी सकारात्मक दृष्टीकोन देऊन ‘श्री. भट यांची सेवा हीच तुमची आताच्या घडीची साधना आहे’, असे सांगून मला पुष्कळ साहाय्य केले.
निधनानंतर प.पू. भक्तराज महाराज यांचा मोठा मुलगा पू. नंदूदादा कसरेकर हे मला भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे मला पुष्कळ चैतन्य मिळाले; म्हणून एवढ्या दुःखद प्रसंगी मी स्थिर राहू शकले. मी सनातनमध्ये नसते, तर हे मला कधीच शक्य झाले नसते. यासाठी दयेचा सागर असलेले परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
लेखिका – सौ. अंजली विनायक भट (कै. श्रीकांत भट यांची भावजय) वणी, यवतमाळ
देहाला वेदना होत असतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावर प्रसन्नता जाणवणे आणि ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानातच असणे : ‘सद्गुरुसारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी’ या उक्तीप्रमाणे ते परात्पर गुरु डॉक्टर यांच्या अनुसंधानातच होते. देहाला वेदना होत असतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावर प्रसन्नता जाणवत होती. त्यांनी अनेक सत्संग घेतले. त्यामुळे बरेच जण जोडले गेले. सनातनच्या साधकांकडून पुष्कळ शिकायला मिळते. ‘परात्पर गुरु डॉक्टर एवढे महान आहेत की, श्री. भट देहाने नसले, तरी त्यांच्याकडून परात्पर गुरु डॉक्टर निर्गुणातून सेवा करून घेतीलच’, असे मला वाटते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १३.१२.२०२१)
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |