वाघेरी (जिल्हा सातारा) येथील तलाठी कार्यालयाला ग्रामस्थांनी लावले कुलूप !
दाखले, उतारे वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर
जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल ! – संपादक
सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – कराड तालुक्यातील वाघेरी येथील तलाठी कार्यालयात तलाठी वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना दाखले आणि उतारे वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी वाघेरी येथील तलाठी कार्यालयाला १३ डिसेंबर या दिवशी कुलूप लावून निषेध व्यक्त केला.
३ वर्षांपासून वाघेरीसह अजून २ गावांचा कारभार एकच तलाठी पहात आहे. मेरवेवाडी आणि पाचुंद ही गावे दुर्गम भागात असल्याने तेथील ग्रामस्थांची दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. तलाठी विविध बैठकींचे कारण देत वाघेरी येथील कार्यालयात आठवडा-आठवडा अनुपस्थित असतात. चुकून उपस्थित झाले, तरी कामात टाळाटाळ करतात. तात्काळ दाखला किंवा उतारा हवा असल्यास कराडलाही बोलावले जाते. दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना कराडला जाणे अशक्य आहे. दाखले आणि उतारे वेळेवर न मिळाल्यामुळे कोणतेही शासकीय साहाय्य वेळेवर मिळत नाही, तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तलाठ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून संतप्त नागरिकांनी कार्यालयाला कुलूप लावले.