स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय दृष्टी निर्माण झाल्यासच भारतात ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घोषणा बंद होतील ! – दुर्गेश परुळकर, अध्यक्ष, स्वा. सावरकरप्रेमी मंडळ

‘समाजक्रांतीकारक सावरकर’ या विषयावर स्वा. सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने व्याख्यान !

– संपादक व्यासपीठावर डावीकडून श्री. सुरेश अबादे (उभे असलेले), अधिवक्ता नितीन आपटे, श्री. दुर्गेश परुळकर, श्री. विजय कोल्हटकर

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वेद, उपनिषदे यांचा पूर्ण अभ्यास केला होता. त्यांना भगवद्गीता पूर्ण पाठ होती. आपल्या वेदांमध्ये गृहस्थाश्रम हा समाजाचा पाया आहे, असे सांगितले आहे; पण आपली कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही संकल्पना रूजवली जात आहे. एका भागातील हिंदू संकटात असतांना दुसर्‍या भागातील हिंदूंना झोप लागत नसेल, तरच हा हिंदु समाज एकवटला आहे, असे समजू शकतो. ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय दृष्टी निर्माण होईल, तेव्हा भारतात ‘पाकीस्तान झिंदाबाद’च्या घोषणा बंद होतील, असे परखड मत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळा’चे अध्यक्ष श्री. दुर्गेश परुळकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळ, पुणे यांच्या वतीने १२ डिसेंबर या दिवशी पुणे येथील शैलेश सभागृह येथे ‘समाजक्रांतीकारक सावरकर’ या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्याख्याते अधिवक्ता नितीन आपटे, संस्थापक अध्यक्ष श्री. विजय कोल्हटकर यांनीही या वेळी उपस्थितांना अवगत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश अबादे यांनी केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले ‘जयोस्तुते …’ हे गीत लहान मुलांनी सादर केले. श्री. रमेश वैद्य यांनी सावरकरप्रेमी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात परिचय सांगितला. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली.

श्री. परुळकर पुढे म्हणाले, ‘‘वेदातील ज्ञानाचे अमृत सर्वांना पिऊ द्या’, असा विचार वर्ष १९५३ मध्ये स्वा. सावरकर यांनी पुण्यातील नारद मंदिरातील व्याख्यानात मांडला होता. संकटात असलेल्या माणसाला आपण आपल्या बुद्धीचा वापर करून साहाय्य करणे म्हणजे विज्ञाननिष्ठा आणि साहाय्य न करणे म्हणजे अंधश्रद्धा असे सावरकर म्हणत. स्वा. सावरकर हेच शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहेत. त्यांचे विचार प्रत्येक भारतियापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावर पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची वेळ येईल.’’

स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसुधारक तर होतेच; पण त्याही पलीकडे जाऊन ते क्रांतीकारक होते ! – अधिवक्ता नितीन आपटे

१. स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसुधारक तर होतेच; पण त्याही पलीकडे जाऊन ते क्रांतीकारक होते. त्यांनी आपल्या विचाराने, उच्चाराने, कृतीने केवळ क्रांतीच केली. जन्मापासून मृत्यूपर्यंत केवळ क्रांतीचेच विचार ते करत.

२. स्वा. सावरकरांना माफीवीर म्हणणार्‍यांच्या बौद्धिक क्षमतेविषयी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. सैनिकी प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायला हवे, असेही त्यांनी अनेक वर्षे आधीच सांगितले होते.

३. धर्माविषयी स्वा. सावरकरांचे मत होते की, केवळ काय खावे ? कुठे रहावे ? यावर धर्म अवलंबून नसून असे करण्याने धर्म नष्ट होत नाही. ‘केवळ समाजात जात न सांगता मी हिंदु आहे, असे सांगा’, असे सावरकर म्हणत. हिंदुत्व हा शब्दही स्वा. सावरकरांनी समाजाला दिला.