सातारा स्थायी समिती सभेत केवळ २० मिनिटांत ३९७ विषयांना अनुमती
केवळ २० मिनिटांमध्ये ३९७ विषयांना अनुमती देणे म्हणजे सभा ही केवळ नावासाठीच घेत आहेत का ? अशा प्रकारे सभा घेणारे लोकप्रतिनिधी अन्य वेळी कसा कारभार करत असतील ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक
सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेची नुकतीच स्थायी समिती सभा पार पडली. या सभेत पटलावर ४०० विषय ठेवण्यात आले होते. त्यातील ३ विषय रहित करत केवळ २० मिनिटांच्या सभेत ३९७ विषयांना अनुमती देण्यात आली.
कोरोनाच्या निर्बंधामुळे अनुमाने साडेनऊ मासानंतर नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. बहुतांश कामांना निधी उपलब्ध नसतांना तसेच त्याच्या टिपण्या परिपूर्ण नसतांनाही विषयांना अनुमती दिल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये चालू होती. वास्तविक या कार्यकाळातील ही शेवटचीच सभा म्हणावी लागेल. त्यामुळे या सभेत सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा अपेक्षित होती; मात्र विरोधी पक्ष नेते यांनीही तुरळक प्रश्न विचारून मौन बाळगले.
या सभेत शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक देखभालीचे काम करणार्या ‘सातारा इलेक्ट्रिकल’ या आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात आले. याविषयी एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पालिका मुख्याधिकार्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये तांत्रिक व्यवस्था आणि उपलब्ध मनुष्यबळ यांमध्ये तफावत आढळून आली होती. प्रभाग क्रमांक १५ मधील काँक्रीटचा रस्ता आणि गटार दुरुस्तीचे काम हे दोन विषय निधीअभावी रहित करण्यात आले, तसेच सदरबझार येथील सुमित्राराजे उद्यानासमोरील जागेत आयलंड विकसित करण्याचा विषय जागा अरुंद असल्यामुळे रहित करण्यात आला.