वृद्धापकाळात वृद्धांनी कसे वागावे ?, याविषयी काही सोपी सूत्रे

प्रतिकात्मक छायाचित्र

२१ व्या शतकाकडे वाटचाल करतांना जवळ जवळ ८० टक्के जनता (मुले, मुली) आपल्या जन्मदात्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले, त्यांनाच आपण मोठेपणी वा विवाह झाल्यावर म्हणा, त्यांचा द्वेष तिरस्कार करतो किंवा विसरतोही; पण त्या वेळी मात्र आपण हे विसरून जातो की, ‘आपणसुद्धा केव्हा तरी म्हातारे किंवा वृद्ध होऊ ?’ आई-वडिलांना जी म्हातारपणी मुलांकडून अपेक्षा असते, ती पूर्ण होत नाही.

याकरता मी तर असे सांगेन की, यापुढे जे आई-वडील होणार आहेत, जे झालेले आहेत आणि ज्यांच्या हातात अद्यापपर्यंत सर्व अधिकार आहेत, त्या आई-वडिलांनी जर पुढील दक्षता घेतली, तर आपल्यावर म्हातारपणी ज्या समस्या निर्माण होतात, त्या आपोआपच सुटण्यास साहाय्य होईल.

वृद्धापकाळात असे वागावे

१. प्रत्येक गोष्टीकडे, तसेच स्वत:च्या वृद्धत्वाकडे तटस्थ दृष्टीने पहावे. मानसिक गुंतवणूक न्यून करण्याचा प्रयत्न करावा.

२. आपण आतापर्यंत घालवलेल्या आयुष्यातील स्वतःचे अधिकार, मान-सन्मान उतारवयात इतरांवर गाजवू नयेत. त्यामुळे अकारण संघर्ष ताण आणि दु:ख निर्माण होईल.

३. आपण कुटुंबात इतरांवर भार होऊन जगू नये. आपल्याला शक्य असतील, ती लहान-मोठी कामे आपण स्वतः करावीत.

४. स्वतःच्या वागणुकीमध्ये एक प्रकारचा लवचिकपणा ठेवावा. सर्व प्रकारचे दायित्व मुलावर सोपवावे. मुलांनी विचारले, तरच सल्ला द्यावा. अनाहुत सल्ला देऊ नये.

५. स्वत:च्या तरुणपणी पाळल्या जाणार्‍या रूढी, समजुती, संस्कार वृद्धपणी (पालटत्या जीवनाचा विचार करून) तरुणांवर लादू नये. तसेच नवीन पिढीला नावे न ठेवता त्यांच्याशी सुसंवाद साधावा.

६. कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तरी आपण स्वतःची संपूर्ण गंगाजळी (साठवलेला पैसा) मुलांना वा त्यांच्यासाठी देऊ नये. अशा प्रकारचे औदार्य पुढे त्रासदायक ठरू शकते.

७. समाजात अजूनही स्वत: कमावून वृद्धापकाळासाठी पैसे साठवून ठेवणार्‍या स्त्रिया अल्प आहेत. तरी पतीने सर्व गंगाजळी मुलांना देऊन स्वत:च्या पत्नीला आश्रित बनवू नये.

८. स्वत:च्या न्यून झोपेविषयी, तसेच बाहेरील वाढत्या गतीमान जीवनाविषयी आणि कुटुंबातील लहान मोठ्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनाविषयी जास्त चिंता करू नये.

९. घरातील लोकांना स्वतःची कोणतीही अडचण होऊ न देण्यासाठी स्वतःचे सर्व कार्यक्रम वेळप्रसंगी पूर्णपणे पालटण्याची मानसिक सिद्धता ठेवावी.

१०. निसर्ग सौंदर्यात रमायला शिकावे. प्रतिदिन सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरायला जावे. यातून मानसिक आनंद आणि व्यायाम दोन्हीही साधेल.

११. दिवसातील बराच वेळ आध्यात्मिक वाचन, मनन, चिंतन आणि ध्यान यांसाठी द्यावा. इतर गोष्टींना कमी महत्त्व द्यावे.

१२. सतत ध्यानातून आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील रहावे.

१३. जेवणात शक्यतो भात, पोळी, भाकरी, गोड तेलकट पदार्थांचे प्रमाण न्यून करून भाज्या, कोशिंबीर, फळे, दुध, ताक, दही यांचे प्रमाण वाढवावे.

१४. शारीरिक स्वच्छता, मानसिक आणि भावनिक पावित्र्य बाळगावे.

१५. झाडावर नवनवीन फुटणार्‍या हिरव्यागार पालवीचा विचार करून मन आनंदित ठेवावे. पिकलेली पाने गळायचीच.

– श्री. दिलीप हिरालाल हेडा, सटाणा, जिल्हा नाशिक.

(साभार : अक्कलकोट स्वामीदर्शन)