केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना लखीमपूर खिरी हिंसाचाराविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी पत्रकाराची कॉलर पकडून केली शिवीगाळ !
ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व आहे, तेच अशा प्रकारचे कायदाद्रोही कृत्य करत असतील, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ? – संपादक
लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथे एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा उपाख्य टेनी यांनी त्यांना लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी प्रश्न विचारणार्या पत्रकाराची कॉलर पकडून धक्काबुक्की केली, तसेच येथे उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ केली. या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. या पथकावरून पत्रकाराने अजय मिश्रा यांना प्रश्न विचारला होता.
अजय मिश्रा यांना पत्रकार, ‘पोलिसांच्या नव्या अहवालामध्ये तुमचा मुलगा आशिष यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली आहे’, असे सांगत असतांना अजय मिश्रा ‘हे असले मूर्खासारखे प्रश्न विचारू नका. तुमचे डोके फिरले आहे का?’ असे सांगत ओरडले. तसेच पत्रकाराच्या हातातील माईक खेचून घेत ‘माईक बंद कर रे’ असेही उद्धटपणे सांगितले. या वेळी त्यांनी पत्रकारांचा ‘चोर’ असा उल्लेख केला.
#LakhimpurKheriCase | पत्रकारों के सवालों पर बुरी तरह भड़के अजय मिश्रा टेनी, देखें वीडियो#LakhimpurKheri #AjayMishra #AshishMishra pic.twitter.com/YBdfpvUNzK
— India TV (@indiatvnews) December 15, 2021
काय आहे लखीमपूर खिरी प्रकरण ?
लखीमपूर खिरी येथे शेतकर्यांकडून तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते. या ठिकाणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा कार्यक्रमानिमित्त येणार असल्याच्या माहितीमुळे शेतकरी त्यांच्यासमोर निदर्शने करण्यासाठी विमानतळावर जात असतांना पाठीमागून आलेल्या महिंद्रा थार या वाहनाने ४ शेतकरी आणि एक पत्रकार यांना चिरडले होते. ही गाडी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांची होती आणि ते या गाडीत होते, असा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त शेतकर्यांनी मिश्रा यांच्या ताफ्यातील गाड्या रोखून काही जणांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला.