ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे !
‘वर्ष २०१३ मध्ये देशाची लोकसंख्या १२१ कोटी असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० कोटी आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या तेवढी असली, तरी यातील ६६ टक्के ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवणही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ९० टक्के ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक, आर्थिक, आरोग्य सुरक्षितता नाही. ७३ टक्के नागरिक निरक्षर असून केवळ शारीरिक श्रम करून ते जगू शकतात. ३९ टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्या आयुष्याला दोष देत एकाकी आयुष्य जगत असतात, अशा प्रकारची माहिती ‘हेल्पेज इंडिया’ या सेवाभावी संस्थेने प्रसिद्ध केली आहे. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
१. वृद्धाश्रम
विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.
२. एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धती यांमुळे समाजाचे विघटन होऊ लागणे
अ. एकत्र कुटुंबपद्धती : ‘ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक जाणिवेचा आविष्कार’ या विषयाचा विचार करण्यापूर्वी सामाजिक जाणिवा पालटत गेल्या. समाज व्यवस्थेमध्ये जोपर्यंत एकत्र कुटुंबपद्धत होती, तोपर्यंत घरातील सर्व निकडी (गरजा) परस्पर सहकार्याने भागत असत. घरात थोड्या प्रमाणात का होईना, सुबत्ता नांदत असे. प्रत्येक जण दुसर्याचा विचार करत होते.
आ. विभक्त कुटुंबपद्धती : यामुळे ‘मी, माझा’ ही भावना बळावत गेली. त्याला आर्थिक कारणही कदाचित् असू शकेल; म्हणून एकमेकांमध्ये दुरावा वाढत गेला आणि परस्पर सहकार्याने होणारी घरगुती कामेही होणे कठीण झाले. अशा प्रकारे समाजाचे विघटन गेल्या काही वर्षांत वाढू लागले.
३. बहुतेक सुशिक्षित कुटुंबात आर्थिक सुरक्षिततेसाठी एकच मुलगा किंवा मुलगी ही भावना रुजणे आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘अंकल’, ‘आन्टी’ यांसारखी दिखाऊ नातीच मुलांना कळू लागणे, या सर्व गोष्टींमुळे समाज घडी विस्कटणे
बहुतेक सुशिक्षित कुटुंबात आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘हम दो, हमारे दो’ वरून ‘हम दो, हमारा एक’ ही भावना रुजली आहे. एकच मुलगा किंवा मुलगी यांना योग्य शिक्षण देऊन मोठे करणे, हाच ध्यास प्रत्येक घरात दिसू लागला आहे. यात काही चूक आहे, असे नाही; पण एकमेकांना जोडणारे नातेसंबंध दुरावत गेले. याही पुढे जाऊन एकमेकांचे नाते कोणते, याचाही विसर पडला. त्यातच पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘अंकल’ (काका), ‘आन्टी’ (मावशी) यांसारखी दिखाऊ नातीच मुलांना कळू लागली. कझिन, ब्रदर या नात्याने मावस आणि मामे भाऊ, चुलत भाऊ आणि आतेभाऊ ही नाती पार विसरून गेली आणि त्यामुळे समाजघडी विस्कटली.
४. वृद्धापकाळात आवश्यक असलेली त्रिसूत्री
अ. वृद्धांनी स्वतःचे मनःस्वास्थ टिकवण्यासाठी नेहमी जागरूक राहून कुटुंब आणि समाजातील सर्वांशी जाणीवपूर्वक चांगले बोलावे.
आ. स्वतःपासून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
इ. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मनःशांती या त्रिसूत्रांची वृद्धापकाळात आवश्यकता असते.
५. ‘मनाची उभारी’ वार्धक्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट
वार्धक्यात ‘मनाची उभारी’ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. मानसिक स्वास्थ्य आणि विचारातील उत्साह यांमुळे या वयातही मनाला एक ताजेपणा रहातो. ती मिळवणे तितकेसे कठीण नाही.
६. नकारात्मक विचारांना मनात स्थान न देणे
आपल्या विचारानुसार प्रकृती कार्य करत असते. वृद्धापकाळात मन प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे; कारण मनाचे रंग विटले की, सारे जगच बेरंगी होऊन जाते. ‘आमची नोंद कोणी घेत नाही’, असे नकारात्मक विचार वृद्धांनी मनात आणू नयेत.
७. नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास स्वतःचे उत्तरायुष्यही सुखाचे होऊ शकणे
आपल्या हाताला नेहमी काही ना काही काम असावे आणि आपले मन प्रसन्न ठेवावे. आपल्याला जमतील तेवढी कामे करण्याचा प्रयत्न या वयातही केला पाहिजे. आपण आपला अहंकार सोडून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. आपल्या आयुष्यातील चांगले अनुभव इतरांना सांगावेत. आवश्यकता असल्यास असेल, तेथे त्यांना मार्गदर्शन करावे. आपण नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर स्वतःचे उत्तरायुष्यही सुखाचे होऊ शकेल, यात शंका नाही. असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर दोन पिढ्यांमधील अंतर न्यून होऊ शकते. ज्येष्ठांना असा विचार करणे सहज शक्य होऊ शकते. त्या दृष्टीने विचार करून वेगवेगळे पर्याय पडताळून पहाणे फार महत्त्वाचे आहे.
८. ज्यांची मुले विदेशात चाकरी करत आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांची व्यथा
अ. एकटेपणाची भावना मनात रुजायला लागणे : आज असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की, त्यातील काही ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात चाकरी करत असतात. अशा वेळी अनेकांच्या मनात एकटेपणाची भावना रुजायला लागते. त्यांना तो एकटेपणा वाटायला लागला की, आपला विदेशातील नातवंडांचा बोबडा स्वर केवळ दूरध्वनीवर ऐकता येतो. त्यांची वाट पहाण्याचा काळ सरता सरत नाही.
आ. मुलांना आपल्यासाठी वेळ नाही, ही बोचरी बोच बोथट होत जाणे : या दिवसांतही ज्येष्ठांना स्वतःच्या आयुष्याचा जमाखर्च पुनःपुन्हा मांडावा लागतो. ज्येष्ठांना त्यांच्या तरुण वयातील रग आठवली की, त्यांना आपल्यासाठी वेळ नाही, ही बोचरी बोच बोथट होत जाते. आपला जोडीदारही आपल्यासोबत थकत चाललेला असतो, हे भानही ज्येष्ठांनी ठेवले पाहिजे.
इ. जसा समाज पालटला, तसे ज्येष्ठांनीही पालटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेही जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल : आज सभोवताली पाहिले, तर लक्षात येते की, समाज पालटला, सिनेमा-नाटक पालटले, त्यातील नात्यांचे संदर्भही पालटले. हे सारं काय आहे ? हे सगळे तरुणांसाठी आहे. यातील ज्येष्ठांसाठी काय आहे ? ज्या वेळी ज्येष्ठ समाजात वावरतो, तेव्हा त्याने या वयास थोडीशी मुरड घातली, तर हे सगळे आपल्यासाठीही आहे, असे त्यांना वाटेल.
९. बहुतांशी वृद्धांचा प्रश्न
वृद्धांसाठी ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात, त्यांच्याकडे साहाय्य मागणार्या वृद्धांचा प्रश्न बहुतांशी कौटुंबिक अवहेलना हा असतो. अवहेलनेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर आई-वडील मुलांच्या घरात रहातात कि मुले आई-वडिलांच्या घरात रहातात ?, हे बहुतेक कुटुंबात अतिशय ज्वालाग्राही सूत्र असते. त्याचे दुसर्या पक्षावर प्रचंड मानसिक दडपण असते. बर्याच कुटुंबांमधून आई-वडिलांनी घर स्वतःच्या नावावर करून द्यावे; म्हणून मुलगा त्यांच्यावर दडपण आणत रहातो, छळही करतो. वृद्ध आई-वडिलांनी रहाते घर मुलांच्या नावे करून देऊ नये, असे नेहमी मत दिले जाते; पण तसे न केल्यासही आई-वडिलांना जगणे नकोसे करणारी मुले असतात.
१०. वृद्धांचे स्वतःचे वागणे काही अंशी अवहेलनेला कारणीभूत असणे
वृद्धांनी घरात असे वागावे की, ते कुटुंबात प्रेमाने सामावून घेतले जातील. यात तरुण पिढीची बाजू अशी असते की, त्यांना आपापले प्रश्न असतात. प्रत्येकाला दैनंदिन जीवनात आपापल्या कामाचे ताणतणाव असतात. वृद्ध लोकांच्या ते लक्षात येत नाहीत किंवा ते समजूनही घेत नाहीत. मुलांजवळ अजिबात वेळ नसतो आणि वृद्ध मंडळी त्यांच्याकडे एकटेपणा घालवण्यासाठी भूणभूण करतात. आपण मुलांसाठी काय काय केले, त्याची उजळणी करत रहातात. काही अंशी वृद्धांचे स्वतःचे वागणे अशा स्थितीला कारणीभूत असते. पुष्कळदा त्या वृद्ध व्यक्तीचा काही कारणाने आलेला राग व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून वैयक्तिक अवहेलना केली जाते.’
– सौ. विमल मधुसूदन खाचणे (संदर्भ : मासिक ‘अपेक्षा’,दीपावली २०१३) (हा लेख वर्ष २०१३ मधील असला, तरी आजही ही स्थिती अशीच आहे. – संपादक)